कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
सुशासन दिनानिमित्त केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी मिशन कर्मयोगीच्या विस्तारित आवृत्तीचा केला प्रारंभ
Posted On:
25 DEC 2023 4:47PM by PIB Mumbai
सुशासन दिनानिमित्त केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी आज नवी दिल्लीत एका कार्यक्रमात मिशन कर्मयोगीच्या विस्तारित आवृत्तीचा प्रारंभ केला. आय. जी. ओ. टी. कर्मयोगी मंचावर सुरू करण्यात आलेली तीन नवीन वैशिष्ट्ये म्हणजे माय आय. जी. ओ. टी., संमिश्र कार्यक्रम (ब्लेंडेड प्रोग्राम्स) आणि क्युरेटेड प्रोग्राम्स. केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार); पंतप्रधान कार्यालय, कार्मिक, सार्वजनिक तक्रारी, निवृत्तीवेतन, अणुऊर्जा आणि अंतराळ राज्यमंत्री यांनी 12 विशिष्ट क्षेत्रांची क्षमता निर्माण करणारे ई-शिक्षण अभ्यासक्रमही सुरू केले. डॉ. जितेंद्र सिंह यांनी विकास (व्हेरिएबल अँड इमर्सिव्ह कर्मयोगी अॅडव्हान्स्ड सपोर्ट) नावाचा एक नवीन संमिश्र शिक्षण कार्यक्रम देखील सुरू केला.
सामान्य माणसाला वेळेवर सेवा देण्यासाठी तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करण्याचे आवाहन डॉ. जितेंद्र सिंह यांनी यावेळी केले. सरकारी सेवकांनी डिजिटल क्रांतीच्या क्षमतेचा वापर करणे आणि डिजिटल प्रशासन पुढे नेण्याचे साधन म्हणून अद्ययावत माहिती तंत्रज्ञानातील नवकल्पनांचा स्वीकार करणे आवश्यक आहे असे त्यांनी सांगितले. ई-प्रशासन आणि कागदरहित कार्यालयावर भर दिला जात आहे, त्यामुळे प्रशासनात निर्णयप्रक्रियेचा अखंड प्रवाह निर्माण झाला आहे असेही त्यांनी सांगितले .
तंत्रज्ञानाच्या इष्टतम वापरावर भर देताना डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले की, सरकारी सेवकांनी डिजिटल क्रांतीच्या क्षमतेचा वापर करणे आणि डिजिटल प्रशासन पुढे नेण्याचे साधन म्हणून अद्ययावत माहिती तंत्रज्ञान नवकल्पना स्वीकारणे आवश्यक आहे.
मिशन कर्मयोगी भविष्यातील नागरी सेवकांना अधिक तंत्रज्ञान-सक्षम, नाविन्यपूर्ण, पुरोगामी आणि पारदर्शक बनवून त्यांना तयार करण्यावर लक्ष केंद्रित करते. "तंत्रज्ञान ही सुशासनाची गुरुकिल्ली आहे. तंत्रज्ञान पारदर्शकतेला आणि त्यामुळे जबाबदारीला चालना देते, जे सुशासनाचे मूलभूत वैशिष्ट्य आहे ", असे डॉ. जितेंद्र सिंग म्हणाले.
"गेल्या नऊ वर्षांत पंतप्रधानांनी सुरू केलेल्या नागरिक केंद्रित सुधारणांमुळे 'प्रशासन सुलभ' झाले आहे. त्यामुळे आपण नागरिकांसाठीच्या 'जीवन सुलभते' कडे वळलो आहोत" असे ते म्हणाले. सरकारी सेवेत रुजू होणाऱ्या महिलांच्या वाढत्या संख्येचे कौतुक करताना केंद्रीय मंत्री म्हणाले की, महिलांनी सरकारी यंत्रणेत नेतृत्वाची भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे.
नागरिक-केंद्रित, कार्यक्षम आणि पारदर्शक प्रशासनाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि सेवा वितरण सुधारण्यासाठी केंद्र सरकार 2014 पासून आपले प्रिय माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या सन्मानार्थ देशव्यापी 'सुशासन सप्ताह/दिवस' साजरा करत आहे.
***
S.Kane/V.Ghode/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1990279)
Visitor Counter : 149