युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
क्रीडा विभागाचा वर्ष अखेर आढावा
चीनमधल्या हांगझू इथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत 28 सुवर्ण पदकांसह 107 पदके पटकावत भारताने केली ऐतिहासिक कामगिरी
आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धेत 29 सुवर्ण पदकांसह 111 पदकांची कमाई करत भारतीय पथकाची शानदार कामगिरी
भारताने आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या 141 व्या सत्राचे मुंबईत केले आयोजन
पहिल्या खेलो इंडिया पॅरा क्रीडा स्पर्धांचे दिल्लीत आयोजन
37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांची गोव्यात यशस्वी सांगता
Posted On:
19 DEC 2023 5:09PM by PIB Mumbai
2023 या वर्षात अनेक आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये भारतीय क्रीडापटूची चमकदार कामगिरी पाहायला मिळाली
- चीनमधल्या हांगझू इथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत पदकांसह 107 पदके (28 सुवर्ण, 38 रौप्य,41 कांस्य) पटकावत भारताने ऐतिहासिक कामगिरी केली. भारताच्या चमूने याआधी 2018 मधला देशाचा 70 पदकांचा विक्रम मोडीत काढला. भारतासाठी अॅथलिटनी सर्वात जास्त म्हणजे 29 पदकांची कमाई केली तर धनुर्विद्या आणि नेमबाजीमध्ये अनुक्रमे 9 आणि 22 पदके मिळाली.
- भारतीय अॅथलिटनी ऑगस्ट 2023 मध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरीचे दर्शन घडवले. नीरज चोप्राने प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या जागतिक अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत भारतासाठीचे पहिले सुवर्णपदक पटकावले. जागतिक अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या 4 X 400 मीटर रिले चमूने उत्तम कामगिरी करत अंतिम स्पर्धेत 5 वे स्थान प्राप्त केले मात्र अंतिम फेरीत पोहोचण्यापूर्वी या चमूने नवा आशियाई विक्रम केला. बुद्धीबळामध्ये फिडे विश्वचषक स्पर्धेत आर प्रज्ञानानंद याने, जागतिक क्रमवारीत प्रथम स्थानावर असलेल्या मॅग्नस कार्लसन याला कडवी झुंज देत उपविजेतेपद प्राप्त केले.
- बर्लिन इथे 17 ते 25 जून 2023 या काळात झालेल्या विशेष ऑलिम्पिक जागतिक ग्रीष्मकालीन क्रीडा स्पर्धा 2023 मध्ये 280 जणांच्या भारतीय पथकाने 76 सुवर्ण,75 रौप्य आणि 51 कांस्य पदकांसह 202 पदके मिळवली.
- सात्विक साईराज रेड्डी आणि चिराग शेट्टी ही जोडी, प्रतिष्ठेची स्विस खुली बॅडमिंटन चषक स्पर्धा जिंकणारी पहिली भारतीय जोडी ठरली. भारतात भोपाळ इथे झालेल्या आयएसएसएफ रायफल/पिस्तोल जागतिक चषक स्पर्धा 2023 मध्ये यजमान भारताने 7 पदके मिळवत ( 1 सुवर्ण,1 रौप्य, 5 कांस्य ) पदकतालिकेत दुसरे स्थान प्राप्त केले.
2023 मध्ये भारताने आयोजित केलेले आंतरराष्ट्रीय कार्यक्रम :
- प्रतिष्ठेच्या एफआयएच ओदिशा हॉकी पुरुष जागतिक विश्वचषक स्पर्धा 2023, भुवनेश्वर –रुरकेला या स्पर्धेच्या राष्ट्रव्यापी चषक दौऱ्याचा ओदिशाच्या मुख्यमंत्र्यांनी 5 डिसेंबरला प्रारंभ केला. 13 राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातून प्रवास केलेल्या या दौऱ्याची 25 डिसेंबरला ओदिशामध्ये समाप्ती झाली. 13 जानेवारी 2023ला स्पर्धांचा प्रारंभ झाला आणि अंतिम सामना 29 जानेवारी 2023 खेळवण्यात आला.
- भारतात मोटार स्पर्धांच्या विकासाला वाव मिळावा यादृष्टीने महत्वपूर्ण ठरलेल्या आणि मानाच्या स्पर्धांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मोटोजीपी मालिकेत पहिल्या मोटोजीपी भारत स्पर्धांचे नोएडा इथे बुद्ध आंतरराष्ट्रीय मंडल इथे आयोजन करण्यात आले. मोटोजीपी ही जगातली सर्वोच्च मोटारसायकल रस्ते स्पर्धा असून या स्पर्धेत 11 संघांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या 22 स्वारांनी चषकासाठी झुंज दिली त्यामध्ये इटलीच्या मार्को बेझेची याने बाजी मारत पहिली मोटो जीपी भारत स्पर्धा जिंकली.
- भारताने आयबीए महिला जागतिक मुष्टियुद्ध चषक स्पर्धा 2023 चे नवी दिल्लीत मार्च 23 मध्ये आयोजन केले. भारतीय महिला मुष्टियुद्धपटूनी (लव्हलीना बोर्गोहेन, निखत झरीन,नीतू घन्घास आणि स्वीटी बुरा ) विविध वजनी गटात 4 सुवर्णपदके प्राप्त करत या स्पर्धेतला उत्तम संघ म्हणून भारताला मान मिळवून दिला.
- या वर्षात शांघाय सहकार्य संघटनेचे (एससीओ) अध्यक्षपद भारत भूषवत असल्याच्या निमित्ताने, युवा आणि क्रीडा मंत्रालयाने, 13 ते 15 मार्च 2023 या काळात नवी दिल्लीत क्रीडा मंत्र्यांची तीन दिवसीय बैठक आणि एससीओ तज्ञ कार्यकारी गटाची बैठक आयोजित केली होती.यामध्ये कझाकस्तान,किर्गीस्तान, रशिया,उझबेकिस्तान,भारत,पाकिस्तान,चीन आणि तझाकिस्तान हे देश सहभागी झाले. सहभागी देशांच्या प्रतिनिधींनी निखळ क्रीडास्पर्धाप्रती आपल्या कटीबद्धतेचा आणि क्रीडा शिक्षण आणि क्रीडा शास्त्र यांच्या विकासासाठी समन्वयात्मक मंचाचा पुनरुच्चार केला.
- भारताने, 40 वर्षानंतर, आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीचे (आयओसी) 141 वे सत्र मुंबईत आयोजीत केले. आयओसी सत्र म्हणजे ऑलिंपिक चळवळीच्या सर्वोच्च जागतिक प्रशासकीय मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा होय.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 14 ऑक्टोबर 2023 ला या सत्राचे उद्घाटन केले. आयओसीने घेतलेला महत्वाचा निर्णय म्हणजे लॉस एंजिलीस ऑलिंपिक स्पर्धा 2028 मध्ये क्रिकेटचा समावेश करण्यासाठी दिलेली मंजुरी.
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे गोव्यात यशस्वी आयोजन : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे, गोव्यातल्या पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडीयमवर 26 ऑक्टोबर 2023 ला उद्घाटन केले. सर्व राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांचे प्रतिनिधित्व करणारे 10,000 पेक्षा जास्त क्रीडापटू,प्रशिक्षक आणि अधिकारी यात सहभागी झाले. 228 पदके पटकावत महाराष्ट्र पदक तालीकेच्या सर्वोच्च स्थानी राहिला त्यानंतर सेनादल आणि हरियाणाने स्थान मिळवले.
केंद्र सरकारची मंत्रालये तसेच विभाग, विविध राज्य सरकारे, परदेशातील भारतीय मंडळे, शैक्षणिक संस्था यांच्यासह विविध भागधारकांच्या सक्रीय सहभागातून संपूर्ण देशभर राष्ट्रीय क्रीडा दिन 2023 साजरा करण्यात आला.
फिट इंडिया अभियानाअंतर्गत झालेले कार्यक्रम:
- फिट इंडिया प्रश्नमंजुषा कार्यक्रमाच्या 2 यशस्वी भागांनंतर 29 ऑगस्ट 2023 रोजी तिसरी खेलो इंडिया प्रश्नमंजुषा स्पर्धा सुरू करण्यात आली.
- मुंबईत 23 आणि 30 जुलै रोजी वार्षिक फिट इंडिया प्रश्नमंजुषा कार्यक्रमाच्या राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धा घेण्यात आल्या आणि विजेती राज्ये /केंद्रशासित प्रदेश यांना केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्र्यांच्या हस्ते गौरवण्यात आले.
स्वच्छ भारत उपक्रमाचे स्मरण म्हणून, चौथ्या फिट इंडिया फ्रीडम रन शर्यतीचे नाव बदलून फिट इंडिया स्वच्छता फ्रीडम रन 4.0 असे ठेवण्यात आले आणि 1 ऑक्टोबर 2023 रोजी नवी दिल्ली येथील मेजर ध्यानचंद स्टेडीयममध्ये या स्पर्धेची सुरुवात करण्यात आली. फिट इंडिया स्वच्छता फ्रीडम रन 4.0 हा उपक्रम 1 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर 2023 या कालावधीत राबवण्यात आला आणि 31 ऑक्टोबर 2023 रोजी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीदिनी आयोजित युनिटी रन मध्ये विलीन करण्यात आला. या काळात, शारीरिक तंदुरुस्तीसाठी कोणत्याही स्वरूपातील व्यायाम करण्यासाठी 30 मिनिटे समर्पित करण्यासाठी तसेच सक्रीय जीवनशैलीचा स्वीकार करून भारताला निरोगी, स्वच्छ आणि आरोग्यपूर्ण देश बनवण्याच्या दृष्टीने वचनबद्ध राहण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहित करण्यात आले.
खेलो इंडिया योजनेअंतर्गत आयोजित विविध कार्यक्रम:
- दिव्यांग खेळाडूंमध्ये असलेली प्रतिभा ओळखून युवा आणि आकांक्षित दिव्यांग खेळाडूंसाठी संधी निर्माण करण्याच्या संकल्पनेतून दिल्लीत 10 डिसेंबर ते 17 डिसेंबर 2023 या काळात दिव्यांगांसाठीच्या पहिल्या खेलो इंडिया क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. या स्पर्धांमध्ये 105 पदकांसह हरियाणा राज्याचा संघ अव्वल ठरला तर दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर अनुक्रमे उत्तर प्रदेश आणि तामिळनाडू या राज्यांनी बाजी मारली.
- यावर्षी उत्तर प्रदेशात 25 मे ते 3 जून या कालावधीत तिसऱ्या खेलो इंडिया विद्यापीठ क्रीडास्पर्धांचे (केआययूजी) यशस्वी आयोजन करण्यात आले. देशभरातील 200 हून अधिक विद्यापीठांमध्ये शिक्षण घेणाऱ्या सुमारे 4700 खेळाडूंनी या स्पर्धांमध्ये भाग घेतला. यावर्षीच्या केआययूजी स्पर्धेत लखनौ, वाराणसी, गोरखपूर आणि नोइडा या चार शहरांमध्ये 21 क्रीडा प्रकारांचे आयोजन करण्यात आले होते.पंजाब विद्यापीठाने 26 सुवर्ण पदकांसह एकूण 69 पदकांची कमाई करत पदकतालिकेत सर्वोच्च स्थान पटकावले. त्याखालोखाल, अमृतसर येथील गुरु नानक देव विद्यापीठ आणि कर्नाटकमधील जैन विद्यापीठ यांनी स्थाने मिळवली. यावर्षी प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या जल क्रीडा प्रकारांच्या स्पर्धांमुळे यंदाच्या केआययूजी स्पर्धा विशेष लक्षणीय ठरल्या.
- आंतरराष्ट्रीय महिला दिन 2023 निमित्त आयोजित करण्यात आलेल्या “खेलो इंडिया दस का दम” या उपक्रमाअंतर्गत देशभरात आयोजित करण्यात आलेल्या दीड हजारांहून अधिक क्रीडा स्पर्धांमध्ये 1 लाखाहून अधिक महिलांनी भाग घेतला. या कार्यक्रमाने पूर्वी आयोजित करण्यात आलेल्या खेलो इंडिया महिला लीग स्पर्धांतील यशाला पाया मिळवून दिला. त्या लीग स्पर्धांमध्ये विभागीय तसेच राष्ट्रीय पातळीवरील 240 खेळांच्या विविध प्रकारांमध्ये 23,000 महिला खेळाडूंनी भाग घेतला होता.
- मध्य प्रदेशातील भोपाळ येथे असलेल्या अप्पर लेक भागात 11 फेब्रुवारी 2023 रोजी पाचव्या वर्षीच्या खेलो इंडिया युवा स्पर्धांचा यशस्वी समारोप झाला.या स्पर्धांमध्ये 56 सुवर्णपदकांसह एकूण 161 पदकांची कमाई करून महाराष्ट्र राज्य पदक तालिकेत अव्वल स्थानी राहिले. हरियाणा आणि मध्य प्रदेश या राज्यांनी त्याखालोखाल स्थान मिळवले.
- गुलमर्ग येथे 10 फेब्रुवारी 2023 रोजी तिसऱ्या खेलो इंडिया हिवाळी स्पर्धांचे उद्घाटन झाले. दिनांक 14 फेब्रुवारी 2023 रोजी संपन्न झालेल्या या स्पर्धांमध्ये जम्मू आणि काश्मीरच्या संघाने सर्वोत्कृष्ट कामगिरी केली. या संघाने 26 सुवर्णपदकांसह एकूण 76 पदके जिंकून पदक तालिकेत पहिले स्थान मिळवले. या स्पर्धेत महाराष्ट्राचा संघ दुसऱ्या तर हिमाचल प्रदेशचा संघ तिसऱ्या स्थानी राहिला. या प्रसंगी, केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्र्यांच्या हस्ते इलेक्ट्रॉनिक पद्धतीने 40 खेलो इंडिया केंद्रांच्या कार्याची सुरुवात करण्यात आली.
आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठीच्या निकषांमध्ये सुधारणा:
- प्रमुख क्रीडा स्पर्धांमध्ये उतरण्याची तयारी करण्यासाठी केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय देशातील खेळाडूंना सर्वतोपरी मदत करत आहे. आंतरराष्ट्रीय क्रीडास्पर्धांसाठी परदेशी जाणाऱ्या क्रीडापटूंना तेथे उत्तम दर्जाची निवास तसेच भोजन व्यवस्था पुरवता यावी यासाठी विद्यमान निकषांच्या कक्षेत राहून, खेळाडूंना तेथील राहण्या-खाण्याच्या खर्चासाठी मंजूर असलेल्या निधीच्या मर्यादेत वाढ करण्यात आली आहे. मान्यताप्राप्त क्रीडास्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी परदेश प्रवास करणाऱ्या खेळाडूंना आता तेथील खर्चासाठी प्रतिदिन 250 डॉलर्सचा निधी देण्यात येणार आहे. यापूर्वी हा निधी 150 डॉलर्स इतका होता. त्यासोबतच, आपल्या खेळाडूंना अत्याधुनिक क्रीडाविषयक पायाभूत सुविधा, खेळांची साधने, सर्वोत्कृष्ट प्रशिक्षण तसेच मदतनीस कर्मचारीवर्ग सुलभतेने उपलब्ध असेल याची सुनिश्चिती करण्यासाठी खेळाडूंना सर्वांगीण पातळीवर पाठबळ पुरवले जात आहे.
‘नो युवर मेडिसिन’ नामक वेब पोर्टल आणि मोबाईल अॅप्लिकेशनची सुरुवात
- खेळाडूंनी वापरण्यासाठीच्या आणि प्रतिबंधित नसलेल्या पौष्टिक पूरक आहाराच्या स्वीकारासाठी सुरु केलेल्या मोहिमेला आणखी मजबूत करण्यासाठी ‘नो युवर मेडिसिन’ नामक वेब पोर्टल आणि मोबाईल अॅप्लिकेशन सुरु करण्यात आले. हे अॅप खेळाडूंना औषधे आणि पूरक आहाराचा वापर करण्यासाठी माहितीवर आधारित निवड करण्याची क्षमता प्रदान करेल. या उपक्रमामुळे आता खेळाडूंना अशा प्रकारच्या डिजिटल पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या निवडक देशांच्या गटात भारत समाविष्ट झाला आहे.
***
SonalT/NilimaC/SanjanaC/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1988571)
Visitor Counter : 310