पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांच्या हस्ते उत्तर प्रदेशात वाराणसी येथे 19,150 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचा कोनशीला समारंभ आणि लोकार्पण


वाराणसी- नवी दिल्ली वंदे भारत एक्स्प्रेस गाडीला झेंडा दाखवून केले रवाना

स्मार्ट सिटी अभियानाअंतर्गत एकात्मिक प्रवासी पास यंत्रणेची केली सुरुवात

“काशीच्या नागरिकांनी केलेल्या कार्याची जेव्हा प्रशंसा होते तेव्हा मला अत्यंत अभिमान वाटतो”

“जेव्हा काशीची भरभराट होते तेव्हा उत्तरप्रदेशची भरभराट होते आणि जेव्हा उत्तर प्रदेश समृध्द होतो तेव्हा आपला देश समृद्ध होतो”

“काशीसह संपूर्ण देश विकसित भारताच्या उभारणीच्या निर्धाराशी वचनबद्ध आहे”

“मोदींच्या हमीची गाडी ही संकल्पना अत्यंत लोकप्रिय होत आहे कारण या उपक्रमाच्या माध्यमातून नागरिक सरकारपर्यंत नव्हे तर सरकार नागरिकांपर्यंत पोहोचत आहे”

“यावर्षी बनास डेरीने उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांना एक हजार कोटी रुपयांहून अधिक रक्कम अदा केली आहे”

“पूर्वांचलाचे हे संपूर्ण क्षेत्र गेली अनेक दशके दुर्लक्षित राहिले होते, मात्र आता महादेवाच्या कृपेने मोदी तुमच्या सेवेला हजर”

Posted On: 18 DEC 2023 5:56PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 18 डिसेंबर 2023

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशात वाराणसी येथे 19,150 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांची  कोनशीला बसवली  आणि  लोकार्पण केले.

या प्रकल्पांमध्ये इतर अनेक रेल्वे प्रकल्पांसह 10,900 कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या नवीन पंडित दीनदयाळ उपाध्याय नगर- नवीन भौपूर समर्पित फ्रेट मार्गिका प्रकल्पाचा समावेश आहे. पंतप्रधानांनी नव्याने उद्घाटन झालेल्या फ्रेट मार्गिका येथे वाराणसी-नवी दिल्ली वंदे भारत एक्स्प्रेस गाडी, डोहरीघाट-मऊ मेमू रेल्वे या गाड्यांना हिरवा झेंडा दाखवून रवाना केले. त्यांनी बनारस लोकोमोटीव्ह वर्क्स येथे उत्पादित दहा हजाराव्या इंजिनाला देखील झेंडा दाखवून रवाना केले. पंतप्रधान मोदी यांनी यावेळी, 370 कोटी रुपयांहून अधिक निधी खर्च करून बांधण्यात आलेल्या शिवपूर-फुलवारिया-लहरतारा ग्रीन फिल्ड मार्ग तसेच दोन रेल्वे पुलांचे उद्घाटन देखील केले. पंतप्रधानांच्या हस्ते आज उद्घाटन करण्यात आलेल्या इतर महत्त्वाच्या प्रकल्पांमध्ये 20 रस्त्यांचे बळकटीकरण आणि विस्तारीकरण; कैथी गावातील संगम घाट रस्ता तसेच पंडित दीनदयाळ उपाध्याय रुग्णालयाच्या निवासी इमारतीचे बांधकाम, पोलीस लाईन आणि भूल्लनपूर येथील पीएसी मध्ये दोनशे आणि दीडशे खाटांची क्षमता असलेल्या दोन बहुमजली बराक इमारती, 9 ठिकाणी बांधण्यात आलेले स्मार्ट बस निवारे आणि आलईपूर येथे उभारण्यात आलेले 132 किलोवॅट क्षमतेचे उपकेंद्र या प्रकल्पांचा समावेश आहे.  याशिवाय, त्यांनी स्मार्ट सिटी अभियानाअंतर्गत एकात्मिक प्रवासी पास यंत्रणेची सुरुवात देखील केली.

पंतप्रधानांनी या कार्यक्रमादरम्यान, चित्रकुट जिल्ह्यातील 4,000 कोटी रुपये खर्चाचा आणि 800 मेगावॅट क्षमतेचा सौर पार्क, 1050 कोटी रुपये खर्चून मिर्झापूर येथे बांधण्यात येत असलेले नवे पेट्रोलियम तेल टर्मिनल, 900 कोटी रुपयांचा खर्च असलेल्या वाराणसी-भदोही राष्ट्रीय महामार्ग 731बी (पॅकेज-2) चे रुंदीकरण; जल जीवन अभियानाअंतर्गत 280 कोटी रुपयांच्या खर्चासह कार्यान्वित होणाऱ्या 69 ग्रामीण पेयजल योजना आणि आरोग्य क्षेत्रातील इतर प्रकल्पांसह एकूण 6500 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांची  कोनशीला बसवली.

याप्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना देव दिवाळीच्या काळात सर्वाधिक दिवे उजळवून गिनीज जागतिक विक्रमाची नोंद करणाऱ्या वाराणसीच्या नागरिकांचे पंतप्रधानांनी अभिनंदन केले.हा चित्ताकर्षक देखावा अनुभवण्यासाठी ते प्रत्यक्षात हजर राहू शकले नसले तरीही त्या दरम्यान वाराणसीला भेट देऊन गेलेल्या सन्माननीय परदेशी पाहुण्यांकडून आणि पर्यटकांकडून यासंदर्भात वेळोवेळी माहिती घेतल्याचे पंतप्रधान म्हणाले.वाराणसी आणि तेथील नागरिकांनी केलेल्या कार्याची प्रशंसा ऐकून अत्यंत अभिमान वाटल्याची भावना पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केली. “काशीच्या नागरिकांनी केलेल्या कार्याची जेव्हा प्रशंसा होते तेव्हा मला अत्यंत अभिमान वाटतो,” पंतप्रधान म्हणाले. भगवान महादेवाची भूमी असलेल्या काशीच्या भूमीच्या सेवेप्रती समर्पण कधीच पुरेसे होऊ शकत नाही अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

“जेव्हा काशीची भरभराट होते तेव्हा उत्तरप्रदेशची भरभराट होते आणि जेव्हा उत्तर प्रदेश समृध्द होतो तेव्हा आपला देश समृद्ध होतो,” असे सांगून पंतप्रधान म्हणाले की सुमारे 20,000 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांच्या कार्याचे उद्घाटन आणि कोनशीला समारंभ करताना मनात हाच विश्वास जागृत होता. या प्रकल्पांमध्ये वाराणसीमधील गावांना पाणीपुरवठा, बीएचयु ट्रॉमा सेंटरमध्ये अतिदक्षता सेवा विभाग, रस्ते, रेल्वे, विमानतळ, वीजपुरवठा, सौर उर्जा, गंगा नदीवरील घाट आणि इतर क्षेत्रांतील विकास प्रकल्प यांचा समावेश असल्याचा उल्लेख करून पंतप्रधान मोदी यांनी सांगितले की, या प्रकल्पांमुळे या भागातील विकासाला वेग येईल. काशी-कन्याकुमारी तमिळ संगमम या गाडीला काल झेंडा दाखून रवाना केल्याचा उल्लेख करून ते म्हणाले की आज वाराणसी-नवी दिल्ली वंदे भारत एक्स्प्रेस आणि दोहरी घाट-मऊ मेमू गाड्यांची सेवा आज सुरु करण्यात आली. आजच्या प्रकल्पांबद्दल पंतप्रधानांनी सर्वांचे अभिनंदन केले.

“विकसित भारताच्या संकल्पपूर्तीसाठी  संपूर्ण देशासह काशी कटिबद्ध आहे”,असे सांगत  विकसित भारत संकल्प यात्रा हजारो गावे आणि शहरांमध्ये पोहोचली असून तिथे  नागरिक या यात्रेशी   जोडले जात आहेत, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.मोदी यांनी वाराणसीतील विकसित भारत संकल्प यात्रेत सहभागी होण्याचा उल्लेख केला आणि   व्हीबीएसवाय वाहनाला  लोक ‘मोदी की गॅरंटी की गाडी’ म्हणून संबोधत आहेत, याकडे त्यांनी लक्ष  वेधले. “सरकारी योजनांमध्ये पात्र असलेल्या सर्व पात्र नागरिकांचा समावेश करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे”, असे सांगत नागरिक सरकारपर्यंत नव्हे तर   सरकार  नागरिकांपर्यंत पोहोचत आहे, यावर पंतप्रधानांनी भर दिला. “मोदी की गॅरंटी गाडी सुपरहिट आहे”, असे पंतप्रधान म्हणाले. याआधी वंचित राहिलेले हजारो लाभार्थी वाराणसीमध्ये विकसित भारत संकल्प यात्रेशी  जोडले गेले आहेत.त्यांनी विकसित भारत संकल्प यात्रे दरम्यान मिळालेल्या आयुष्मान कार्ड, मोफत शिधापत्रिका, पक्की घरे, नळाच्या पाण्याची जोडणी, आणि उज्ज्वला गॅस जोडणी यांसारख्या लाभांची  उदाहरणे दिली . “विकसित भारत संकल्प  यात्रेने  इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा लोकांमध्ये विश्वास निर्माण केला आहे” या विश्वासामुळे भारताला 2047 पर्यंत विकसित राष्ट्र बनवण्याचा संकल्प अधिक बळकट झाला आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले. पंतप्रधानांनी अंगणवाडीमधील  मुलांच्या आत्मविश्वासाबद्दल प्रचंड समाधान व्यक्त केले आणि त्यांच्या विकसित भारत संकल्प यात्रेच्या  भेटीदरम्यान  चंदा देवी या लाभार्थी आणि लखपती दीदी यांच्याशी झालेल्या संवादाबद्दल आनंद व्यक्त केला. विकसित भारत संकल्प यात्रेमधून  शिकण्याच्या अनुभवावर प्रकाश टाकत, "विकसित भारत संकल्प यात्रा    हे सार्वजनिक क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी एक चालते फिरते  विद्यापीठ आहे.", असे पंतप्रधान म्हणाले.

पंतप्रधानांनी शहराच्या सुशोभिकरणाच्या फायद्यांकडे लक्ष वेधले.  श्रद्धा आणि पर्यटनाचे केंद्र म्हणून काशीचे वैभव दिवसेंदिवस वाढत आहे, असे ते म्हणाले.नूतनीकरणानंतर 13 कोटींहून अधिक भाविकांनी काशी विश्वनाथ धाम येथे दर्शन घेतल्याने पर्यटनामुळे रोजगाराचे नवीन मार्ग निर्माण होत आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. परदेशात जाण्याचे नियोजन करण्यापूर्वी 15 देशांतर्गत स्थळांना भेट देण्याबाबत त्यांनी लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून लोकांना केलेल्या आवाहनाची आठवण करून दिली.लोक देशांतर्गत पर्यटनाकडे वळत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. स्मार्ट सिटी अभियाना  अंतर्गत एकात्मिक  पर्यटक पास प्रणाली आणि शहराची माहिती देण्यासाठी पर्यटन संकेतस्थळ  ‘काशी’ च्या  प्रारंभासह  पर्यटन सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी उचललेल्या पावलांबद्दल पंतप्रधानांनी सांगितले. गंगा घाट, अत्याधुनिक बस निवारे, विमानतळ आणि रेल्वे स्थानकावरील सुविधांच्या नूतनीकरणाचे काम सुरू झाल्याचाही त्यांनी उल्लेख केला.

रेल्वेशी संबंधित प्रकल्पांची माहिती देताना, पंतप्रधान मोदी यांनी  समर्पित पूर्व आणि पश्चिम मालवाहतूक मार्गिका , नवीन पंडित दीनदयाल  उपाध्याय नगर-न्यू  भाऊपूरचे उद्घाटन याबद्दलही सांगितले. स्थानिक कारखान्यात तयार झालेले 10000 वे रेल्वे इंजिन सुरू झाल्याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला.

सौरऊर्जेच्या क्षेत्रात डबल  इंजिन असलेल्या सरकारचे  प्रयत्नही त्यांनी नमूद केले. चित्रकूटमधील 800 मेगावॅट सौर ऊर्जा पार्क हे उत्तर प्रदेशमध्ये  विश्वासार्ह  वीज पुरवठ्यासाठीच्या  आमच्या वचनबद्धतेचे उदाहरण आहे, असे ते म्हणाले. देवराई आणि मिर्झापूरमधील सुविधांमुळे पेट्रोल डिझेल, जैव -सीएनजी आणि इथेनॉल प्रक्रियेच्या संदर्भात राज्यातील पेट्रोलियम उत्पादनांची गरज भागवली जाईल, असे पंतप्रधान म्हणाले.

विकसित भारताची पूर्व आवश्यकता  म्हणून नारी शक्ती, युवा शक्ती, शेतकरी आणि गरिबांच्या विकासावर पंतप्रधानांनी भर दिला.“माझ्यासाठी याच  केवळ चार जाती आहेत आणि त्यांना बळकट केल्याने देश बळकट होईल”, यावर मोदी यांनी भर दिला. या विश्वासाने पंतप्रधान म्हणाले की,  सरकारने शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य दिले आहे आणि    पीएम किसान सन्मान निधी सारख्या योजनांचा उल्लेख करत   शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 30,000 कोटी रुपये वर्ग करण्यात आले आहेत, किसान क्रेडिट कार्ड, नैसर्गिक शेतीवर भर, आणि किसान ड्रोन यामुळे  खतांची फवारणी करणे सोपे होईल, असे त्यांनी सांगितले. त्यांनी  बचत गटांशी संबंधित महिलांना प्रशिक्षण देणाऱ्या नमो ड्रोन दीदी कार्यक्रमाबद्दलही सांगितले.  

बनास डेअरी 500 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक करत असलेल्या आगामी आधुनिक बनास डेअरी प्रकल्पाचा  संदर्भ देत आणि डेअरी पशुधन वाढवण्यासाठी मोहीम राबवत  असल्याचे सांगत  बनारसच्या शेतकऱ्यांसाठी बनास डेअरी वरदान ठरेल. लखनौ आणि कानपूरमध्ये बनास डेअरीची संयंत्र सुरू आहेत, असे पंतप्रधान म्हणाले. यावर्षी बनास डेअरीने उत्तर प्रदेशाच्या 4 हजारांहून अधिक गावांतील शेतकऱ्यांना एक हजार कोटींहून अधिक रक्कम दिली आहे. आजच्या कार्यक्रमात बनास डेअरीने लाभांश म्हणून उत्तरप्रदेश दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात 100 कोटींहून अधिक रुपये जमा केले, असे त्यांनी सांगितले. 

आपल्या भाषणाच्या शेवटी, पंतप्रधानांनी विश्वास व्यक्त केला की वाराणसीमधे वाहत असलेला विकासाचा प्रवाह, या संपूर्ण प्रदेशाला नव्या उंचीवर घेऊन जाईल. पूर्वांचलचा प्रदेश गेली कित्येक दशके दुर्लक्षित राहिला असला, तरी आता महादेवाच्या आशीर्वादाने मोदी सरकारने या प्रदेशाची सेवा करण्याचे काम हाती घेतले आहे, असेही त्यांनी सांगितले. येत्या काही महिन्यांत देशात सर्वसाधारण निवडणुका होणार असल्याचं नमूद करत,  ते म्हणाले की आपल्या तिसऱ्या कार्यकाळात, भारताला जगातली तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनवण्याचं वचन आम्ही दिलं आहे. “आज जर मी ही गॅरेंटी देऊ शकत असेन, तर ती केवळ तुमच्यामुळे, काशीमधल्या माझ्या या सगळ्या कुटुंबामुळेच. कारण तुम्ही कायम माझ्या बाजूने उभे राहिलात, माझ्या संकल्पांना बळ देत राहिले आहात.” असे पंतप्रधान शेवटी म्हणाले.

या कार्यक्रमाला, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य, उत्तर प्रदेश सरकारमधील इतर मंत्री यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

 

पार्श्वभूमी :

गेल्या नऊ वर्षांत पंतप्रधानांनी वाराणसी प्रदेशात परिवर्तन घडवून आणण्यावर आणि वाराणसी तसेच, आसपासच्या प्रदेशात राहणाऱ्या लोकांचे जीवनमान सुलभ करण्यावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. या दिशेने आणखी एक पाऊल उचलत पंतप्रधानांनी आज, सुमारे 19,150 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचे लोकार्पण आणि पायाभरणी केली.

सुमारे 10,900 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या न्यू पंडित दीनदयाल उपाध्याय नगर- न्यू भाऊपूर समर्पित मालवाहू मार्गिका प्रकल्पाचेही पंतप्रधानांनी उद्घाटन केले. उद्घाटन होत असलेल्या  रेल्वे प्रकल्पांमध्ये बलिया-गाझीपूर शहर रेल्वे मार्ग दुपदरीकरण प्रकल्प, इंदारा-दोहरीघाट रेल्वे मार्ग गेज परिवर्तन प्रकल्प यांचा समावेश आहे.

पंतप्रधानांनी वाराणसी-नवी दिल्ली वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेन, दोहरीघाट- मऊ मेमू ट्रेन आणि लाँग हॉल मालगाड्यांच्या जोडीला नव्याने उद्घाटन केलेल्या समर्पित मालवाहतूक मार्गिकेवरून हिरवा झेंडा दाखवला. बनारस लोकोमोटिव्ह वर्क्सने बनवलेल्या 10,000 व्या लोकोमोटिव्हला देखील त्यांनी हिरवा झेंडा दाखवला.

पंतप्रधानांनी, 370 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या दोन उड्डाणपूलांसह ग्रीनफील्ड शिवपूर-फुलवारिया-लहरतारा रस्त्याचे उद्घाटन केले. यामुळे वाराणसी शहराच्या उत्तर आणि दक्षिण भागांमधील वाहतूक सुलभ होईल आणि पर्यटकांची सोय होईल. पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या  इतर प्रमुख प्रकल्पांमध्ये 20 रस्त्यांची सुधारणा आणि रुंदीकरण, कैथी गावातील संगम घाट रस्ता आणि पंडित दीनदयाल उपाध्याय रुग्णालय परिसरात  निवासी इमारतींचे बांधकाम यांचा समावेश आहे.

याव्यतिरिक्त, पोलिस कर्मचाऱ्यांच्या घरांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी, पोलिस लाइन आणि पीएसी भुल्लनपूरमधील दोन 200 आणि 150 खाटांच्या बहुमजली बॅरेक इमारती, नऊ ठिकाणी बांधण्यात आलेले स्मार्ट बस शेल्टर आणि अलईपूर येथे बांधण्यात आलेल्या 132 किलोवॅट सबस्टेशनचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

स्मार्ट सिटी अभियानांतर्गत, पर्यटकांच्या तपशीलवार माहितीसाठीचे संकेतस्थळ आणि एकीकृत पर्यटक पास प्रणाली पंतप्रधानांनी सुरू केली. एकीकृत पासमुळे श्री काशी विश्वनाथ धाम, गंगा क्रूझ आणि सारनाथच्या प्रकाश आणि ध्वनी कार्यक्रमासाठी एकल प्लॅटफॉर्म तिकीट आरक्षण उपलब्ध होईल, ज्यात एकात्मिक क्यू. आर. कोड सेवाही उपलब्ध असतील.

6500 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध प्रकल्पांची पायाभरणीही पंतप्रधानांनी केली. अक्षय ऊर्जा स्रोतांचे उत्पादन वाढवण्यासाठी पंतप्रधानांनी चित्रकूट जिल्ह्यात सुमारे 4000 कोटी रुपये खर्च करून 800 मेगावॅट क्षमतेच्या सौर उद्यानाची पायाभरणी केली. पेट्रोलियम पुरवठा साखळी वाढवण्यासाठी ते मिर्झापूर येथे 1050 कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या नवीन पेट्रोलियम तेल टर्मिनलच्या बांधकामाची पायाभरणी देखील त्यांनी केली.

पंतप्रधानांनी आज ज्या प्रकल्पांची पायाभरणी केली त्यामध्ये 900 कोटी रुपयांहून अधिक खर्चून वाराणसी-भदोही राष्ट्रीय महामार्ग 731 बी (पॅकेज-2) चे रुंदीकरण प्रकल्प; 280 कोटी रुपये खर्चून जल जीवन अभियानांतर्गत 69 ग्रामीण पेयजल योजना; बीएचयू ट्रॉमा सेंटरमध्ये 150 खाटांच्या क्षमतेच्या क्रिटिकल केअर युनिटचे बांधकाम;  आठ गंगा घाटांचे पुनर्विकास कार्य, दिव्यांग निवासी माध्यमिक शाळेचे बांधकाम यांचा समावेश आहे.

 

 

 

 

 

 

 

 

* * *

N.Chitale/Sanjana/Sonal C/Radhika/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1987832) Visitor Counter : 72