शिक्षण मंत्रालय
तेलंगणात सम्माक्का सारक्का केंद्रीय आदिवासी विद्यापीठ स्थापन करण्यासाठी केंद्रीय विद्यापीठे (सुधारणा) विधेयक - 2023 .राज्यसभेत मंजूर
प्रादेशिक आकांक्षा पूर्ण करण्यासाठी, दर्जेदार शिक्षण वृद्धिंगत करण्यासाठी आणि आदिवासी समुदायांमध्ये संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी सम्माक्का सारक्का केंद्रीय आदिवासी विद्यापीठाची स्थापना – धर्मेंद्र प्रधान
Posted On:
14 DEC 2023 8:46AM by PIB Mumbai
राज्यसभेने 13 डिसेंबर 2023 रोजी तेलंगणा राज्यातील मुलुगु येथे सम्माक्का सारक्का केंद्रीय आदिवासी विद्यापीठ स्थापन करण्यासाठी केंद्रीय विद्यापीठ कायदा, 2009 मध्ये आणखी सुधारणा करण्याच्या उद्देशाने केंद्रीय विद्यापीठे (सुधारणा) विधेयक - 2023 मंजूर केले. लोकसभेने हे विधेयक 7 डिसेंबर 2023 रोजी मंजूर केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली तेलंगणातील जनतेला दिलेले आणखी एक वचन पूर्ण झाले आहे, असे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राज्यसभेत या विधेयकावरील चर्चेला उत्तर देताना सांगितले. हे विधेयक मंजूर करण्यासाठी त्याच्या बाजूने मतदान करणाऱ्या सर्व खासदारांचे त्यांनी आभार मानले. हे विधेयक मंजूर झाल्याने देशाची उच्च शिक्षणाची उपलब्धता आणि दर्जा सुधारण्याची सामूहिक बांधिलकी दिसून येते, असेही ते म्हणाले.
प्रधान पुढे म्हणाले की, हे विद्यापीठ भविष्य काळात प्रादेशिक आकांक्षा पूर्ण करेल, शिक्षणाची गुणवत्ता वाढवेल आणि आदिवासी समुदायांमध्ये आदिवासी कला, संस्कृती, चालीरीती आणि पारंपारिक ज्ञान प्रणाली यासारख्या विषयांच्या संशोधनाला चालना देईल, असेही ते म्हणाले. राज्यातील आदिवासी बंधू भगिनींसाठी हे विद्यापीठ प्रगतीचे केंद्र ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
केंद्रीय शैक्षणिक संस्था (शिक्षक संवर्गातील आरक्षण) कायदा, 2019 मुळे SC/ST/OBC/EWS च्या आरक्षणाचे अधिकार सुनिश्चित केले गेले आहेत, असे त्यांनी सांगितले.
या वेळी त्यांनी जादुई पिटारा सारख्या उपक्रमांचा समावेश असलेल्या बालवाटिका उपक्रमाविषयी माहिती दिली. 3-5 वर्षांच्या मुलांमध्ये शिकवण्याच्या आणि शिकण्याच्या पद्धती रुजवण्यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. शाळांमध्ये कौशल्यावर आधारित शिक्षण आणि प्रशिक्षण सुरू करण्यात आले आहे, असेही ते म्हणाले.
प्रधान यांनी नव्या शैक्षणिक धोरणाच्या आंतरराष्ट्रीय स्वीकृतीवरही प्रकाश टाकला. इराणमध्ये हे धोरण लागू करण्यासाठी नवे शैक्षणिक धोरण 2020 चे पर्शियन भाषांतर केले आहे आणि मॉरिशसने त्यांच्या देशात राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (NCERT) सारखी संस्था विकसित करण्यासाठी भारताकडून सहकार्य मागितले आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
या विद्यापीठाची स्थापना सुमारे 889.07 कोटी रुपये खर्चून करण्यात आली आहे. विद्यापीठात 5 पद्धती आणि 11 विभागांतर्गत पदवी, पदव्युत्तर आणि डॉक्टरेट स्तरावरील अभ्यासक्रम चालवले जाणार आहेत. या आदिवासी विद्यापीठाच्या सुरुवातीच्या सात वर्षांच्या कार्यकाळात एकूण 2790 स्नातक आणि स्नातकोत्तर विद्यार्थी शिक्षण घेऊ शकतील असा प्रस्ताव आहे. या विद्यापीठाच्या स्थापनेमुळे प्राध्यापक आणि शिक्षकेतर पदांच्या स्वरूपात थेट रोजगार निर्माण होईल. याशिवाय, आउटसोर्सिंग किंवा कंत्राटी पद्धतीने रोजगाराचे आणखी मार्गही निर्माण होतील. याचा परिणाम म्हणून अनेक सेवा आणि व्यावसायिक क्रियाद्वारे अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण होतील आणि आसपासच्या क्षेत्रांचा विकास होईल.
तेलंगणातील आदिवासी समुदायांच्या संरक्षणासाठी अवतरलेल्या आदि पराशक्तीचे प्रकटीकरण मानल्या जाणार्या आई आणि मुली, सम्माक्का आणि सरलाम्मा (ज्या सामान्यत: सरक्का म्हणून ओळखल्या जातात) यांच्या नावावरून या विद्यापीठाचे नाव “सम्माक्का सरक्का केंद्रीय आदिवासी विद्यापीठ” ठेवण्यात आले आहे.
***
NM/S.Mukhedkar/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1986142)
Visitor Counter : 186