पंतप्रधान कार्यालय

विकसित भारत संकल्प यात्रेच्या लाभार्थ्यांशी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधताना पंतप्रधानांनी केलेले भाषण

Posted On: 09 DEC 2023 10:13PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 9 डिसेंबर 2023

नमस्कार!

मोदींची हमी देणाऱ्या वाहनांसाठी प्रत्येक गावात जो उत्साह दिसतो आहे तो भारताच्या कानाकोपऱ्यात दिसतो आहे. मग ते उत्तर असो, दक्षिण असो, पूर्व असो, पश्चिम असो किंवा अगदी लहान गाव किंवा मोठे गाव असो आणि काही गोष्टी समजल्यानंतर मी पाहिले आहे की, या वाहनाचा मार्ग जरी नसला तरीही लोक येऊन गावाच्या रस्त्यावर वाहन उभे करतात आणि सर्व माहिती घेतात, हे विलक्षण आहे. आणि मी काही लाभार्थींशी संवाद साधला आहे मला सांगण्यात आले की, या यात्रे दरम्यान 1.5 लाखाहून अधिक लाभार्थींना त्यांचे अनुभव कथन करण्याची संधी मिळाली आणि हे अनुभव नोंदवलेही गेले आहेत. आणि गेल्या 10-15 दिवसात गावातील लोकांच्या भावना काय आहेत, योजनांचे लाभ  मिळाले  आहेत का, त्यांची पूर्ण अंमलबजावणी झाली आहे की नाही हे मी वेळोवेळी पाहिले आहे. त्यांना सर्व तपशील माहीत आहेत. जेव्हा मी तुमच्या चित्रफिती पाहतो, तेव्हा माझ्या गावातील लोक त्यांच्यासाठी उपलब्ध असलेल्या सरकारी योजनांचा योग्य प्रकारे  उपयोग कसा करतात हे पाहून मला खूप आनंद होतो.आता बघा कुणाला कायमस्वरूपी घर मिळाले  तर त्याला असे  वाटते की आयुष्याची  एक नवीन सुरुवात झाली आहे. एखाद्याला  नळाद्वारे पाणी मिळाले  तर त्याला वाटते की आजपर्यंत आपण पाण्यासाठी त्रासात  जगत होतो, आज आपल्या घरात पाणी पोहोचले आहे.एखाद्याला शौचालय मिळाले तर त्याला इज्जत  घर मिळाले असे वाटते.आणि जुन्या काळी केवळ प्रथितयश लोकांच्या घरात शौचालय असायचे, आता आमच्या घरात शौचालय आहे. त्यामुळे तो सामाजिक प्रतिष्ठेचाही विषय बनला आहे.आता तर आपल्या घरात शौचालये असतात. त्यामुळे तो सामाजिक प्रतिष्ठेचाही विषय बनला आहे.कुणाला मोफत उपचार मिळाले आहेत, कुणाला मोफत रेशन मिळाले आहे, कुणाला गॅस जोडणी मिळाली  आहे, कुणाला वीज जोडणी मिळाली  आहे, कुणी बँक खाते उघडले आहे, कुणाला पीएम किसान सन्मान निधी,कुणाला पीएम पीक विम्याचा लाभ मिळाला आहे, काहींना पीएम स्वानिधी योजनेद्वारे मदत मिळाली आहे, काहींना पीएम स्वामित्व  योजनेद्वारे मालमत्ता  कार्ड मिळाले आहेत, म्हणजे मी योजनांची नावे सांगितली तर, मी पाहत होतो, भारताच्या कानाकोपऱ्यात गोष्टी पोहोचल्या आहेत. देशभरातील खेड्यापाड्यातील कोट्यवधी  कुटुंबांना आपल्या सरकारच्या कोणत्या ना कोणत्या योजनेचा नक्कीच फायदा झाला आहे. आणि जेव्हा हा लाभ मिळतो तेव्हा एखाद्याचा  विश्वास वाढतो. आणि जेव्हा या विश्वासाने जेव्हा  छोटासा लाभ जरी मिमिळाला तरी  जीवन जगण्यासाठी एक नवे बळ मिळते. आणि त्यासाठी त्यांना वारंवार कोणत्याही सरकारी कार्यालयात जाण्याची गरज पडली नाही. भीक मागण्याची जी  मनःस्थिती असायची ती आता गेली आहे. सरकारने लाभार्थ्यांची ओळख निश्चित केली  आणि नंतर त्यांना लाभ देण्यासाठी पावले उचलली. म्हणूनच आज लोक म्हणतात मोदींची हमी म्हणजे हमी, पूर्णत्वाची हमी.

माझ्या कुटुंबियांनो

आजपर्यंत सरकारी योजनांशी संलग्न होऊ न  शकलेल्या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठीविकसित  भारत संकल्प यात्रा हे एक उत्तम माध्यम बनले आहे. ही यात्रा सुरू होऊन अजून महिनाही उलटलेला  नाही. दोन-तीन आठवडेच  झाले असले तरी ही यात्रा 40 हजारांहून अधिक ग्रामपंचायती आणि अनेक शहरांमध्ये पोहोचली आहे. इतक्या  कमी कालावधीत 1.25 कोटींहून अधिक लोकांनी मोदींची  हमी देणाऱ्या   वाहनापर्यंत पोहोचून त्यांचे स्वागत केले, ते  समजून घेण्याचा प्रयत्न केला, त्याच्याशी जोडले जाण्याचा  प्रयत्न केला आणि ही यात्रा  यशस्वी करण्याचे काम केले, ही मोठी गोष्ट आहे. या हमी देणाऱ्या  वाहनांचे  लोक कौतुक आणि स्वागत करत आहेत. आणि मला सांगण्यात आले आहे की ,अनेक ठिकाणी कार्यक्रम सुरू होण्यापूर्वीच अनेक प्रकारचे उपक्रम पूर्ण केले जात आहेत. मी पाहतो आहे की, असे  कार्यक्रम ज्यामध्ये कोणी मोठा नेता नाही, केवळ  भारताला पुढे न्यायचे  आहे, आपल्या गावाला पुढे घेऊन  जायचे आहे, आपल्या कुटुंबाला पुढे घेऊन जायचे  आहे, सरकारी योजनांचा लाभ घेऊन पुढे वाटचाल करायची  आहे. अशाच एका संकल्पासाठी  हे हमी वाहन येण्यापूर्वी गावकऱ्यांनी केलेल्या कामाची माहिती मला मिळाली आहे.  उदाहरणार्थ, काही गावात आठवडाभर मोठी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली, कारण मोदींची  हमी देणारे वाहन येणार आहे , असे म्हणत संपूर्ण गाव स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले. काही गावात सकाळी एक तास प्रभातफेरी काढत  गावोगावी जाऊन जनजागृती करत असल्याचे सांगण्यात आले.काही ठिकाणी जेव्हा शाळांमध्ये प्रार्थना सभा होतात तेव्हा तेथील जागरूक शिक्षक विकसित भारत म्हणजे काय आणि स्वातंत्र्याला  100 वर्षे पूर्ण होत असताना  कशाप्रकारची वाटचाल करायची आहे  याबद्दल बोलतात. ही मुले 25-30 वर्षांची, 35 वर्षांची झाल्यावर त्यांचे भविष्य काय असेलहे सर्व विषय आजकाल शाळेत चर्चिले जात आहेत. म्हणजे जे शिक्षक जागरूक आहेत ते लोकांनाही शिक्षित करत आहेत. आणि शाळकरी मुलांनी हमी वाहनाच्या  स्वागतासाठी अनेक गावात सुंदर रांगोळ्या काढल्या आहे. काही लोकांनी रंगांची रांगोळी काढली नाही, तर   गावातून फुले, पाने, झाडे घेऊन सुकी पाने आणि हिरव्या  पानांचा वापर करून अतिशय सुंदर रांगोळी काढली, लोकांनी चांगल्या घोषणा लिहिल्या आहेत, काही शाळांमध्ये घोषवाक्य लिहिण्याच्या स्पर्धा घेण्यात आल्या आहेत. मला सांगण्यात आले की, काही गावात हमी  वाहन आल्यावर हे वाहन ज्या दिवशी येणार होते त्याच्या एक दिवस आधी संध्याकाळी लोकांनी प्रत्येक घराच्या दाराबाहेर दिवे लावले, जेणेकरून संपूर्ण गावात हमी वाहनाचे वातावरण तयार होईल.

विकसित  भारत संकल्प यात्रेचे स्वागत करण्यासाठी आपल्या  पंचायतींनी प्रत्येक गावात चांगल्या स्वागत समित्या स्थापन केल्या आहेत हे जाणूनही  मला छान वाटले.  गावातील सर्व वडीलधारी मंडळी, समाजातील सर्व स्तरातील लोकांचा स्वागत समित्यांमध्ये समावेश करण्यात आला आहे. आणि स्वागत समितीचे लोक स्वागताची जय्यत तयारी करत आहेत आणि जबाबदारी सांभाळत आहेत. मोदींच्या हमी  वाहनाची घोषणा एक-दोन दिवस आधीच केली जात आहे. आता मी प्रयत्न केला आहे की जरा  एक-दोन दिवस आधी  सगळ्यांना सांगा की  वाहन  अमूक तारखेला येईल, ते  या तारखेला येईल, या वेळी येईल. यामुळे   गावकऱ्यांचा इतका  उत्साह असेल तर आधीच माहिती मिळाली  तर ते आणखी तयारी करू शकतील आणि ज्या गावात वाहन जात नाहीत, त्या आजूबाजूच्या दोन-चार पाच किलोमीटर अंतरावरील छोट्या छोट्या  गावातील लोकांनाही आपण बोलावू शकतो. या योजनेत शाळकरी मुलांपासून वृद्धांपर्यंतचाही समावेश केला जात आहे. आणि मी पाहिले आहे  की तिथे सेल्फी पॉइंट बनवले आहेत, लोक खूप सेल्फी घेत आहेत आणि अगदी गावातील माता भगिनी मोबाईल फोन वापरत आहेत, सेल्फी घेत आहेत आणि हे सेल्फी अपलोड करत आहेत.

मी पाहतोय की लोक खूप आनंदी आहेत. आणि मला समाधान आहे की ही यात्रा जसजशी देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचत आहे जनतेचा उत्साह आणखी वाढत आहे. ओडिशातील विविध ठिकाणी लोक पारंपारिक आदिवासी नृत्य करतात जे आपल्या आदिवासी कुटुंबांमध्ये पारंपारिक आहे. अशी अप्रतिम नृत्ये सादर केली जात आहेत, त्यांचे स्वागत होत आहे. पश्चिम खासी टेकडीवरील काही लोकांनी मला छायाचित्रे पाठवली, दृष्यफीती पाठवल्या, पश्चिम खासी टेकडीवरील रामब्राय येथे झालेल्या कार्यक्रमादरम्यान स्थानिक लोकांनी अतिशय सुंदर सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला, नृत्याचे आयोजन केले.

अंदमान आणि लक्षद्वीप खूप दूरदूरपर्यंत कोणीही विचारत नाही असे भाग, इतका मोठा नेत्रदीपक कार्यक्रम लोक करत आहेत आणि अतिशय नजाकतीने केला जात आहे. कारगिल इथे जिथे आता तर बर्फ पडला आहे तिथेही स्वागत कार्यक्रमात कोणतीही कमतरता दिसत नाही. मला आतात सांगण्यात आले की एका कार्यक्रमात, आत्ता सांगितले की  आसपासचे लोक इतक्या मोठ्या संख्येने आलेत, छोटसे गाव होते, परंतु चार-साडे चार हजार लोक जमा झाले. अशी असंख्य उदाहरणे रोज पहायला मिळत आहेत. दृष्यफीती बघायला मिळत आहेत, संपूर्ण सोशल मीडिया त्याने भरला आहे. मी म्हणेन की या कामांची आणि तयारीची मला कदाचित पूर्ण माहितीही नसेल.  लोकांनी खूप वैविध्य भरले आहेत, त्यात बरेच नवीन रंग आणि नवीन उत्साह भरला आहे.  मला असे वाटते की कदाचित एक मोठी यादी बनवावी जेणेकरून हमीचे वाहन जिथे पोहोचणार आहे, तिथे लोकांना तयारी करण्यासाठी उपयोगी पडेल. या सर्व सूचना आणि लोकांनी जे केले आहे त्या अनुभवांचा त्यांनाही उपयोग होईल.  त्यामुळे त्याची यादी तयार करून ती पोहोचली तर गावागावांत उत्साह वाढण्यास उपयोग होईल. ज्या भागात हे हमीचे वाहन पोहोचणार आहे त्या भागातील लोकांनाही यामुळे मदत होणार आहे. ज्यांना काही करायचे आहे पण काय करावे हे माहित नाही. त्यांना कल्पना येईल.

मित्रांनो,

मोदींची हमी असलेले वाहन जेव्हा येईल तेव्हा गावातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत ते वाहन पोहोचले पाहिजे, यासाठी सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे.  तासाभरासाठी हातातलं शेतातील काम सोडायला हवं.  लहान मुले, वयस्कर, वडिलधारी मंडळींसह सर्वांनाच घेऊन गेले पाहिजे, कारण आपल्याला देशाला पुढे न्यायचे आहे. जेव्हा हे होईल तेव्हाच आपण प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत पोहोचू शकू, तरच 100 टक्के लोकांपर्यंत पोहचण्याचा संकल्प पूर्ण होईल.  आपल्या प्रयत्नांचा परिणाम प्रत्येक गावात दिसून येत आहे.  मोदींची हमी असलेले वाहन आल्यानंतर, सुमारे 1 लाख नवीन लाभार्थ्यांनी उज्ज्वला योजनेंतर्गत मोफत गॅस कनेक्शनसाठी अर्ज केला आहे. काही गावे अशी आहेत जसे मी आता बोलत होतो. आपल्या बिहारमधील प्रियांका जी सांगत होत्या, की माझ्या गावात सर्वांपर्यंत ते पोहोचले आहे, परंतु काही गावे अशी आहेत की जिथे फक्त एक किंवा दोन लोक उरले आहेत तेव्हा ते ऐकून मला बरे वाटले.

त्यामुळे हे वाहन पोहोचल्यावर तेही शोधून शोधून त्यांना देत आहेत. या यात्रेदरम्यान 35 लाखांहून अधिक आयुष्मान कार्डही घटनास्थळी देण्यात आले आहेत. आणि आयुष्मान कार्ड म्हणजे, एका प्रकारे, कोणत्याही आजारी व्यक्तीला चांगले जीवन जगण्याची मोठी संधी मिळण्याची हमी ठरते. ज्या प्रकारे हमीचे वाहन पोहचल्यावर लाखो लोक आरोग्य तपासणी करुन घेत आहेत आणि त्यासोबतच सर्व राज्यांमध्ये आरोग्य शिबिरे आयोजित केली जात आहेत याचा मला आनंद आहे. त्यामुळे गावागावात मोठमोठे डॉक्टर येत आहेत, प्रणाली, यंत्रणा येत आहेत त्यामुळे प्रत्येकाची वैद्यकीय तपासणी होत आहे. शरीराची तपासणी केली असता काही कमतरता आहे की नाही हे कळते. हे सुद्धा सेवेचे मोठे कार्य आहे, असे मला वाटते, यातून समाधान मिळते. मोठ्या संख्येने लोक आता आयुष्मान आरोग्य मंदिरांमध्ये जात आहेत, ज्यांना पूर्वी आरोग्य आणि निरामयता केंद्र म्हटले जात होते, आता लोक त्यांना आयुष्मान आरोग्य मंदिरे म्हणू लागले आहेत आणि तेथे विविध प्रकारच्या चाचण्या केल्या जात आहेत

मित्रांनो,

केंद्र सरकार आणि देशातील जनता यांच्यात थेट नाते आहे, भावनिक नाते आहे आणि जेव्हा मी म्हणतो, तुम्ही माझे कुटुंबीय आहात, तेव्हा माझ्या कुटुंबातील सदस्यांपर्यंत पोहोचण्याचा तुमच्या सेवकाचा हा नम्र प्रयत्न आहे. मी या गाडीच्या माध्यमातून तुमच्या गावी येत आहे. कारण, मी तुमच्या सुख-दुःखाचा सोबती व्हावे, तुमच्या आशा-आकांक्षा समजून घ्याव्यात, त्या पूर्ण करण्यासाठी मी संपूर्ण सरकारची शक्ती पणाला लावावी. आमचे सरकार मायबाप सरकार नाही, तर आमचे सरकार हे वय झालेल्या बापाचे सेवक सरकार आहे. लहान मूल जशी आई-वडिलांची सेवा करते, तशीच सेवा हा मोदी तुमचीही करतो.  आणि माझ्यासाठी, गरीब, वंचित, ते सर्व लोक ज्यांना कोणी विचारत नाही, ज्यांच्यासाठी सरकारी कार्यालयांचे दरवाजेही बंद आहेत, ज्यांना कोणी विचारत नाही, मोदी त्यांना सर्वात आधी विचारतात.  मोदी नुसते विचारत नाहीत तर मोदी त्यांची पूजाही करतात. माझ्यासाठी देशातील प्रत्येक गरीब व्यक्ती व्हीआयपी आहे. देशाची प्रत्येक आई, बहीण आणि मुलगी माझ्यासाठी व्हीआयपी आहे. देशातील प्रत्येक शेतकरी माझ्यासाठी व्हीआयपी आहे.देशातील प्रत्येक तरुण माझ्यासाठी व्हीआयपी आहे.

माझ्या कुटुंबीयांनो,

देशात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालांची आजही बरीच चर्चा होत आहे. मोदींच्या हमीत दम असल्याचे या निवडणूक निकालांनी स्पष्ट केले आहे. मोदींच्या हमीवर एवढा विश्वास ठेवणाऱ्या सर्व मतदारांचा मी आभारी आहे.

पण मित्रांनो,

आपल्या विरोधात उभ्या राहिलेल्यांवर देश विश्वास का ठेवत नाही, हाही प्रश्न आहे.किंबहुना खोट्या घोषणा करून काही साध्य होणार नाही, हे साधे सत्य काही राजकीय पक्षांना समजलेले नाही. निवडणूक सोशल मीडियावर नाही तर लोकांमध्ये जाऊन जिंकायची असते. निवडणुका जिंकण्यापूर्वी जनतेची मने जिंकणे आवश्यक असते. सार्वजनिक विवेकाला कमी लेखणे योग्य नाही. काही विरोधी पक्षांनी राजकीय स्वार्थाऐवजी सेवेची भावना सर्वोच्च ठेवली असती आणि सेवेच्या भावनेला आपले काम मानले असते, तर देशातील मोठी लोकसंख्या गरिबी, संकटे, दु:खात जगली नसती. अनेक दशके सरकारे चालवणाऱ्यांनी प्रामाणिकपणे काम केले असते तर मोदींना आज जी हमी द्यावी लागतेय ती 50 वर्षांपूर्वीच पूर्ण झाली असती.

माझ्या कुटुंबीयांनो,

विकसित भारत संकल्प यात्रा सुरू आहे, त्यातही आपली नारीशक्ती मोठ्या प्रमाणात सामील होत आहे, आपल्या माता-भगिनी सामील होत आहेत.  मोदींच्या हमीच्या वाहनासोबत त्यांचे छायाचित्र घेण्याचीही त्यांच्यात स्पर्धा आहे. तुम्ही बघा, गरिबांसाठी 4 कोटींहून अधिक घरे बांधली गेली आहेत, कोणी कल्पना करू शकेल का की आपल्या देशात इतक्या कमी वेळात 4 कोटी घरे गरिबांना उपलब्ध झाली आहेत आणि माझा सर्वात मोठा आनंद म्हणजे 4 कोटी घरे उपलब्ध झाली आहेत त्यातही 70 टक्के लाभार्थी महिला आहेत. म्हणजे एका गावात 10 घरे बांधली गेली असतील तर त्यातील 7 पक्की घरे माऊलीच्या नावावर नोंदवली जातात. ज्यांच्या नावावर यापूर्वी एक रुपयाचीही मालमत्ता नव्हती.  आज, मुद्रा कर्जाच्या प्रत्येक 10 लाभार्थ्यांपैकीही 7 महिला आहेत.  काहींनी दुकाने-ढाबा उघडला, काहींनी शिवणकाम आणि भरतकाम सुरू केले, काहींनी सलून आणि पार्लर सुरू केले आणि असे अनेक व्यवसाय सुरू केले. आज देशातील 10 कोटी भगिनी प्रत्येक गावातील बचत गटांशी निगडित आहेत.

हा गट या भगिनींना अतिरिक्त कमाईचे साधन उपलब्ध करून देत आहे, त्यांना देशाच्या प्रगतीत सहभागी होण्याची थेट संधी देत आहे. महिलांच्या कौशल्य विकासाकडे सरकार लक्ष देत आहे. आणि मी एक संकल्प केला आहे , आयुष्यभर रक्षाबंधनाचे इतके सण साजरे करून कदाचित कोणताही भाऊ असा संकल्प करू शकत नाही जो मोदींनी केला आहे. मोदींनी संकल्प केला आहे की मला माझ्या गावात या बचत गट चालवत आहेत ना , यातील माझ्या दोन कोटी भगिनींना मला लखपती दीदी बनवायचे आहे. त्या अभिमानाने उभ्या राहतील आणि म्हणतील मी लखपती दीदी आहे. माझे उत्पन्न एक लाख रुपयांपेक्षा अधिक आहे. आता काही दिवसांपूर्वीच आम्ही देशात, कारण या दीदींना मी वंदन करतो, त्यांना प्रणाम करतो कारण मी त्यांच्या शक्तीचा आदर करतो आणि म्हणूनच सरकारने एक योजना बनवली आहे - 'नमो ड्रोन दीदी' , लोक थोडक्यात त्याला 'नमो दीदी ' म्हणतात.  ही ‘नमो ड्रोन दीदी’ आहे किंवा कुणी तिला ‘नमो दीदी’ म्हणू शकते, हे अभियान  सुरू करण्यात आले आहे. या मोहिमेद्वारे सुरुवातीला आम्ही 15 हजार बचत गटातील ज्या भगिनी आहेत, त्यांना प्रशिक्षण देऊ, त्यांना नमो ड्रोन दीदी बनवू, त्यानंतर त्यांना ड्रोन दिले जातील आणि गावांमध्ये जसे ट्रॅक्टरद्वारे शेतीचे काम केले जाते त्याप्रमाणे औषधे फवारणीचे काम असेल, खत फवारणीचे काम असेल, पिके पाहण्याचे काम असेल, पाणी पोहोचले की नाही हे पाहण्याचे काम असेल, ही सर्व कामे आता ड्रोन करू शकते. आणि गावात राहणाऱ्या आमच्या बहिणी आणि मुलींनाही ड्रोन उडवण्याचे प्रशिक्षण दिले जाईल. या प्रशिक्षणानंतर बहिणी आणि मुली 'नमो ड्रोन दीदी' म्हणून ओळखल्या जातील, ज्यांना लोक सामान्य भाषेत 'नमो दीदी' म्हणतात. ' दीदी को नमो’  ही चांगली गोष्ट आहे, प्रत्येक गावात लोकांनी दीदींना वंदन केले तर ही 'नमो दीदी' देशाची कृषी व्यवस्थेला आधुनिक तंत्रज्ञानाने तर जोडेलच, शिवाय त्यांना उत्पन्नाचे अतिरिक्त साधनही मिळेल, आणि यामुळे शेतीत खूप मोठा बदल होणार आहे. 'आपली शेती ही वैज्ञानिक असेल, आधुनिक असेल, तंत्रज्ञानवाली असेल आणि जेव्हा ती माता-भगिनी करतात ना तेव्हा सर्वजण हे मान्य करतात.

माझ्या कुटुंबियांनो,

नारीशक्ती असो, युवा शक्ती असो, शेतकरी असो किंवा आपले गरीब बंधू-भगिनी असो, विकास भारत संकल्प यात्रेला त्यांनी दिलेला पाठिंबा अद्भुत आहे. या यात्रेदरम्यान, प्रत्येक गावात खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी कार्यरत असलेले आमचे एक लाखाहून अधिक युवा खेळाडू, एक लाखाहून अधिक खेळाडूंना पुरस्कार देऊन  सन्मानित करण्यात आले आहे, हे ऐकून मला खूप आनंद झाला. युवा खेळाडूंना क्रीडाविश्वात पुढे जाण्यासाठी यामुळे मोठे प्रोत्साहन मिळणार  आहे. तुम्ही पाहिले असेलच , लोक नमो ऍप  डाउनलोड करतात. त्याचप्रमाणे गावागावांतले तरुणही 'माय भारत चे  स्वयंसेवक'  बनत आहेत. ज्या उत्साहाने आपली मुले-मुली 'माय  भारत स्वयंसेवक'च्या रूपात सहभागी होत आहेत, आपली युवा शक्ती सहभागी होत आहेत आणि नोंदणी करत आहेत, त्यांची ताकद  गावाच्या बदलासाठी आणि देशातल्या बदलासाठी भविष्यात खूप उपयुक्त ठरणार आहे. भारताचा संकल्प ते अधिक मजबूत करत आहेत. या सर्व स्वयंसेवकांना मी दोन कामे देतो, जे 'माय भारत' बरोबर नोंदणीकृत आहेत, त्यांनी त्यांच्या मोबाईलवर नमो अॅप  डाऊनलोड करावे आणि त्यात विकसित भारताचे दूत असे एक काम  सुरू केले आहे. विकसित भारताचे दूत म्हणून तुम्ही तुमची नोंदणी करा. या विकसित भारताचे दूत म्हणून तुम्ही जबाबदारी घ्या आणि त्यात नमूद केलेली कामे करा. दररोज 10-10 नवीन लोक तयार करा आणि एक चळवळ तयार करा.  महात्मा गांधींच्या काळात सत्याग्रहात सामील झालेल्या लोकांसारखे आपण आहोत. तसेच आपल्याला विकसित भारताचे स्वेच्छा दूत तयार करायचे आहेत जे विकसित भारत बनवण्यासाठी आवश्यक ती कामे करतील.

दुसरे म्हणजे भारत तर विकसित होईल, मात्र माझी तरुण पिढी दुर्बल आहे आणि दिवसभर टीव्हीसमोर बसलेली असते . दिवसभर ती मोबाईलकडे पाहत राहते आणि हात पाय देखील हलवत नाही. त्यामुळे जेव्हा देश समृद्धीकडे वाटचाल करेल आणि माझा युवक सक्षम झाला नाही तर देशाची प्रगती कशी होईल, कोणाला उपयोगी पडेल, आणि म्हणूनच माझी तुम्हाला आणखी एक विनंती आहे, जसे नमो अॅपवर विकसित भारताच्या दूताचे काम आहे , त्याचप्रमाणे आपण फिट इंडिया चळवळीचे गावा - गावात वातावरण निर्माण करायचे आहे. आणि मी माझ्या देशातील तरुणांना सांगतो, ते मुलगे असो किंवा मुली, त्यांनी शारीरिकदृष्ट्या बळकट असले पाहिजे, ते सुस्त  नसावेत. कधी-कधी दोन-चार किलोमीटर चालत जावं लागलं तर बस किंवा टॅक्सी शोधायची ,असं नाही. अहो, हिंमत असलेल्यांची गरज आहे, माझ्या युवा भारतच्या स्वयंसेवकांनी ते पुढे नेले पाहिजे आणि फिट इंडियासाठी मला तुम्हाला चार गोष्टी सांगायच्या आहेत. या चार गोष्टींना नेहमी प्राधान्य द्या. हे नक्की करा, एक-  जास्तीत जास्त पाणी प्यायला हवे. दिवसभरात थोडे-थोडे पाणी प्यायले पाहिजे, ते शरीरासाठी खूप आवश्यक असते. फिट इंडियासाठी माझे तरुणांना हे आवाहन आहे. दुसरे -पोषण, आपली भरड धान्ये किती चांगली ताकद देतात.  चला भरड धान्ये खाण्याची सवय लावूया. तिसरे – पहिले  – पाणी, दुसरे – पोषण, तिसरे – पहलवानी .  पहलवानी म्हणजे थोडा व्यायाम करा, कसरत करा , धावा, थोडे खेळा , झाडावर लटका, उतरा, बसा आणि चौथे - पुरेशी झोप. पुरेशी झोप शरीरासाठी खूप आवश्यक आहे. फिट इंडियासाठी प्रत्येक गावात या चार गोष्टी तर करू शकता. त्यासाठी गावात नव्या व्यवस्थेची गरज नाही. हे बघा, निरोगी शरीरासाठी आपल्या आजूबाजूला खूप काही आहे, त्याचा आपण लाभ घ्यायचा आहे. या चार गोष्टींकडे लक्ष दिल्यास आपले युवक निरोगी राहतील आणि जर आपले युवक निरोगी असतील आणि जेव्हा भारत विकसित होईल तेव्हा या युवकांना त्याचा जास्तीत जास्त लाभ घेण्याची संधी मिळेल. त्यामुळे त्याच्या तयारीमध्ये हे देखील आवश्यक आहे. विकसित भारतासाठी नोटा हव्या, पैसे हवे, किंवा पैसे मिळवणे असे नाही तर अनेक प्रकारची कामे करायची आहेत. आज मी या एका कामाबद्दल सांगितले आणि ते म्हणजे फिट इंडियाचे काम. माझे युवक , माझी मुले-मुली निरोगी असावीत. आपल्याला कोणतीही लढाई लढण्यासाठी जायचे नाही, परंतु कोणत्याही रोगाशी लढण्यासाठी पूर्ण ताकद असायला हवी. चांगले काम करण्यासाठी दोन-चार तास जास्त काम करावे लागले  तर पूर्ण ताकद असली पाहिजे.

माझ्या कुटुंबियांनो,

या संकल्प यात्रेत आपण जी काही शपथ घेत आहोत ती केवळ काही वाक्ये नाहीत. उलट हे आपले जीवन मंत्र बनले पाहिजेत. सरकारी कर्मचारी असोत, अधिकारी असोत, लोकप्रतिनिधी असोत किंवा सामान्य नागरिक असोत, आपण सर्वांनी पूर्ण निष्ठेने सहभागी व्हायचे आहे. सर्वांनी प्रयत्न केले , तरच भारताचा विकास होईल. विकसित भारताचे स्वप्न आपल्याला पूर्ण करायचे आहे, ते सर्वांनी  मिळून पूर्ण करायचे आहे.  मला खूप बरे वाटले, आज मला देशभरातील माझ्या लाखो कुटुंबीयांशी थेट बोलण्याची संधी मिळाली. हा कार्यक्रम इतका उत्तम आहे , इतका अप्रतिम आहे की काही दिवसांनी मला असे वाटते की, जर मला वेळ मिळाला तर मी यात्रेदरम्यान तुम्हा सर्वांबरोबर पुन्हा सहभागी होईन आणि ज्या गावात यात्रा जाईल त्या गावातील लोकांशी पुन्हा बोलण्याची संधी मिळेल. माझ्याकडून तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा.धन्यवाद !

S.Tupe/Sonal C/Vinayak/Sushama/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1984990) Visitor Counter : 96