आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ.मनसुख मांडवीय यांच्या हस्ते एनबीईएमएसच्या कार्डीओपल्मनरी रिससायटेशन (सीपीआर) जागरुकता कार्यक्रमावर आधारित देशव्यापी सार्वजनिक जनजागृती मोहिमेचा प्रारंभ


हृदयविकाराचा झटका आलेल्या रुग्णाला तातडीने उपचार मिळणे अत्यावश्यक असते म्हणून यासंदर्भात जाणीव निर्माण करणे तसेच सीपीआरचे पुरेसे प्रशिक्षण देणे अत्यंत महत्त्वाचे आहे: केंद्रीय मंत्री डॉ.मनसुख मांडवीय

देशभरातील 20 लाखांहून अधिक व्यक्ती सीपीआर प्रशिक्षणात सहभागी झाल्या

Posted On: 06 DEC 2023 3:30PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 6 डिसेंबर 2023

हृदयविकाराचा झटका आलेल्या रुग्णाला तातडीने उपचार मिळणे अत्यावश्यक असते म्हणून यासंदर्भात जाणीव निर्माण करणे तसेच सीपीआरचे पुरेसे प्रशिक्षण देणे अत्यंत महत्त्वाचे आहे असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ.मनसुख मांडवीय यांनी केले आहे. एनबीईएमएस अर्थात राष्ट्रीय वैद्यकीय विज्ञान परीक्षा मंडळाने नवी दिल्ली येथे आज आयोजित केलेल्या  कार्डीओपल्मनरी रिससायटेशन (सीपीआर) जागरुकता कार्यक्रमावर आधारित देशव्यापी सार्वजनिक जनजागृती मोहिमेचा प्रारंभ करताना ते बोलत होते. यावेळी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रा.एसपीसिंह बाघेल तसेच डॉ.भारती प्रवीण पवार हे देखील उपस्थित होते.
 
20 लाख व्यक्तींनी आज या देशव्यापी मोहिमेत भाग घेतला. या प्रशिक्षणाची सुलभता दर्शवणाऱ्या विहित मार्गदर्शक सूचनांचे पालन करत आणि या प्रशिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करत केंद्रीय मंत्र्यांनी देखील या कार्यक्रमात भाग घेतला.


 
हृदयविकारासंबंधी सर्वसामान्य जनतेला प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने सुरु केलेल्या या उपक्रमाची प्रशंसा करत केंद्रीय मंत्री मांडवीय म्हणाले, “आपण आपल्या हृदयाचे आरोग्य चांगले राखणे तसेच दैनंदिन जीवनात समतोल आहार आणि व्यायामाचा समावेश करून तंदुरुस्तीप्रती व्यापक दृष्टीकोन स्वीकारणे  अत्यंत महत्त्वाचे आहेच. मात्र, हृदयविकाराचा झटका आलेल्या एखाद्या व्यक्तीच्या सान्निध्यात असताना, जर सीपीआर तंत्राचे प्रशिक्षण घेतलेले असेल तर आपल्याला त्या व्यक्तीचा जीव वाचवता येईल. हा अत्यंत प्रशंसनीय प्रयत्न आणि आणि मी त्याबद्दल संबंधितांचे अभिनंदन करतो.”

सदर उपक्रम आणि एनबीईएमएसचे प्रयत्न यांचे कौतुक करताना केंद्रीय आरोग्य मंत्री म्हणाले, “हृदयविकाराने पीडीत व्यक्तीला तातडीने मदत मिळणे अत्यंत महत्त्वाचे असते. त्यामुळे, सर्वसामान्य जनतेमध्ये यासंबंधी पुरेशी माहिती आणि प्रशिक्षण याविषयी जागरूकता वाढवणे खूप महत्त्वाचे आहे, जेणेकरून आपण एखाद्याचा जीव वाचवू शकू.” ते पुढे म्हणाले, “आज एनबीईएमएसने राष्ट्रीय पातळीवर हा जनजागृती कार्यक्रम आयोजित केला आहे आणि हा कार्यक्रम देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत या प्रशिक्षणाविषयी जागरुकता अधिक वाढवण्यासाठी तसेच या उपक्रमाची पोहोच सुधारण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरेल.”  
 
राष्ट्रीय पातळीवर आयोजित करण्यात आलेला हा पहिलाच सीपीआर जागरुकता कार्यक्रम आहे. या अभियानादरम्यान विद्यार्थी, व्यावसायिक तसेच निमवैद्यकीय कर्मचाऱ्यांसह सर्व सहभागींना ऑनलाईन माध्यमाच्या सहाय्याने एका बैठकीत सदर प्रशिक्षण देण्यात आले.या कार्यक्रमात सामान्य जनतेची मानसिक गुंतवणूक आणि सहभाग यांची प्रशंसा करत केंद्रीय मंत्री डॉ.मांडवीय यांनी सर्वांना हे प्रशिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन दिले. “कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही वेळी हृदयविकाराचा झटका येऊ शकतो आणि अशावेळी योग्य पद्धतींचा वापर करून जीव वाचवण्यासाठी वाढीव ज्ञान आणि प्रशिक्षण यांचा मोठा उपयोग होऊ शकतो,” ते म्हणाले.


कार्यक्रमस्थळी उपस्थित प्रशिक्षित डॉक्टरांनी उपस्थितांना सीपीआर तंत्राची माहिती दिली आणि सहभागींच्या प्रश्नांची उत्तरे दिली. प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी झालेल्यांना एनबीईएमएस संस्थेतर्फे सहभाग प्रमाणपत्र देखील देण्यात आले. खालील लिंकमध्ये सीपीआर प्रशिक्षण तंत्र दाखवणारा व्हिडिओ दिला आहे:

एनबीईएमएसचे अध्यक्ष डॉ.अभिजात शेठ, उपाध्यक्ष डॉ. निखील टंडन, डॉ.एस. एन. बासू, एनबीईएमएसच्या प्रशासकीय मंडळाचे सदस्य डॉ.एस. एन. बासू तसेच डॉ.राकेश शर्मा यांच्यासह वरिष्ठ सरकारी अधिकारी देखील यावेळी उपस्थित होते.
 


Jaydevi PS/S.Chitnis/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 


(Release ID: 1983069) Visitor Counter : 158