राष्ट्रपती कार्यालय

राष्ट्रपतींच्या उपस्थितीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या 111 वा दीक्षांत समारंभ संपन्न

Posted On: 02 DEC 2023 12:32PM by PIB Mumbai

 

महाराष्ट्रातील नागपूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या 111 व्या दीक्षांत समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज (2 डिसेंबर 2023) सहभागी झाल्या.

कोणत्याही देशाच्या विकासात, संशोधन आणि नवोन्मेष महत्त्वाची भूमिका बजावतात, असे राष्ट्रपती यावेळी म्हणाल्या. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ संशोधन, नवोन्मेष आणि तंत्रज्ञान विकासाला प्रोत्साहन देत आहे याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. या विद्यापीठातील प्राध्यापक सदस्यांना भारतीय पेटंट कार्यालयाने 60 हून अधिक पेटंट मंजूर केल्याचे त्यांनी नमूद केले. विद्यार्थ्यांमध्ये स्टार्ट-अप संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी विद्यापीठात इनक्युबेशन सेंटर आहे. स्थानिक समस्या आणि गरजा लक्षात घेऊन नवोन्मेष आणि संशोधन करण्याचे आणि त्या नवकल्पनांची अंमलबजावणी करण्याचे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यी आणि शिक्षकांना केले.

आज संपूर्ण जग हे एक जागतिक गावच झाले आहे, असे राष्ट्रपती म्हणाल्या. कोणतीही संस्था जगापासून तुटून राहू शकत नाही. त्यांनी नागपूर विद्यापीठाला आंतरशाखीय अभ्यास आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याला प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले. संशोधन आणि नवोन्मेष एकमेकांशी

सामायिक करूनच आपण जगासमोरील आव्हानांचा सामना करू शकतो यावर त्यांनी भर दिला.

कोणत्याही संसाधनांचा उपयोगही केला जाऊ शकतो किंवा त्याचा गैरवापरही केला जाऊ शकतो असे तंत्रज्ञानाच्या वापराबाबत बोलताना राष्ट्रपती म्हणाल्या. तंत्रज्ञानाच्या बाबतीतही हेच लागू होते. जर आपण त्याचा योग्य वापर केला तर तो देशासाठी आणि समाजासाठी फायदेशीर ठरेल आणि जर आपण त्याचा गैरवापर केला तर तो मानवतेसाठी हानिकारक ठरेल. आज कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर आपले जीवन सोपे करत आहे. पण डीपफेकसाठी त्याचा वापर करणे हा समाजासाठी धोका आहे. नैतिक शिक्षण आपल्याला मार्ग दाखवू शकते असे त्यांनी सांगितले.

औपचारिक पदवी मिळवणे हा शिक्षणाचा शेवट नाही, विद्यार्थ्यांनी जिज्ञासू राहिले पाहिजे आणि शिकत राहिले पाहिजे. आज  तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात झपाट्याने बदल होत आहेत, तेव्हा सतत शिकत राहणे आणखी महत्त्वाचे ठरते असे राष्ट्रपतींनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले.

विद्यार्थी हे देश आणि समाजाची संपत्ती आहेत. भारताचे भविष्य त्यांच्या खांद्यावर आहे. त्यांच्या आयुष्यात प्रतिकूल परिस्थिती येऊ शकते परंतु त्यांनी त्यांस घाबरू नये. ज्ञान आणि आत्मविश्वासाने अशा परिस्थितींचा सामना करावा, प्रियजनांच्या संपर्कात राहावे आणि आपल्या क्षमतेवर विश्वास ठेवावा असा सल्ला राष्ट्रपतींनी विद्यार्थ्यांना दिला.

राष्ट्रपतींचे भाषण पाहण्यासाठी कृपया येथे क्लिक करा -

***

M.Iyengar/V.Ghode/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1981868) Visitor Counter : 93