संरक्षण मंत्रालय

सिंधुदुर्ग येथे भारतीय नौदलाच्या कार्यान्वयन प्रात्यक्षिक 2023 चे आयोजन


‘जलमेव यस्य, बलमेव तस्य’

‘सागरावर ज्याचे नियंत्रण, तो सामर्थ्यवान’

Posted On: 29 NOV 2023 5:30PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 29 नोव्हेंबर 2023

भारतीय नौदल 04 डिसेंबर 2023 रोजी भारताच्या पश्चिम सागरी किनाऱ्यावरील सिंधुदुर्ग किल्ल्याजवळच्या समुद्रात नौदलाची जहाजे आणि विमानांच्या प्रात्यक्षिके  करून नौदलाची क्षमता आणि कार्यान्वयन क्षमतेचे दर्शन घडवेल.

नौदल प्रमुख अ‍ॅडमिरल आर हरी कुमार यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला तारकर्ली समुद्रकिनारी केंद्र आणि राज्य सरकारचे वरिष्ठ अधिकारी, लष्करी अधिकारी आणि स्थानिक नागरिक उपस्थित राहतील. आपल्या समृद्ध सागरी इतिहासाचा गौरव करणे आणि वसाहतवादी प्रथांचा  त्याग करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे.

मराठा शासक छत्रपती शिवाजी महाराज यांनी 1660 मध्ये बांधलेला, सिंधुदुर्ग किल्ला भारताच्या समृद्ध सागरी इतिहासाची साक्ष देतो, आणि नौदलाची प्रात्याक्षिके सादर करण्यासाठी आवश्यक गरजा पूर्ण करतो. 

1971 च्या युद्धादरम्यान भारतीय नौदलाने कराची बंदरावर ‘ऑपरेशन ट्रायडेंट’ अंतर्गत केलेल्या साहसी आक्रमणाच्या स्मृतीप्रीत्यर्थ  भारतीय नौदल 4 डिसेंबर रोजी नौदल दिन साजरा करते. नौदलाच्या जवानांचे शौर्य आणि धैर्य तसेच प्रतिकूल परिस्थितीत अशक्य ते साध्य करण्याचा त्यांचा संकल्प साजरा करण्यासाठी, हे प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमात भारतीय नौदलाची अत्याधुनिक जहाजे आणि विमाने सर्वसामान्य जनतेला आणि ऑनलाइन दर्शकांना  थेट प्रक्षेपणाद्वारे दाखवली जातील.

या कार्यक्रमात भारतीय नौदलाच्या 20 युद्धनौकांसह मिग 29K आणि LCA सह नौदलाची 40 विमाने प्रमुख आकर्षण ठरतील. त्याशिवाय भारतीय नौदलाचे मरीन कमांडोज हल्ल्यांचे प्रात्यक्षिक दाखवतील. इतर प्रमुख आकर्षणांमध्ये नौदल बँडचे सादरीकरण, ड्रिल आणि एससीसी कॅडेट्सचे हॉर्न पाईप नृत्य यांचा समावेश असेल. धक्क्यावरील जहाजांवर रोषणाई करून कार्यक्रमाचा समारोप होईल. सिंधुदुर्ग किल्ल्यावर लेझर शो होईल.

भारतीय नौदल, नौदलाच्या तळाव्यतिरिक्त अशा  दिमाखदार कार्यक्रमाचे प्रथमच आयोजन करत आहे. सिंधुदुर्ग किल्ला मुंबईपासून 550 किमी आणि गोवा येथील नौदल तळापासून सुमारे 135 किमी अंतरावर आहे. या प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यासाठी राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासनासह नौदलाने सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत.

व्यापकता वाढवणे, नागरिकांमध्ये सागरी चेतना जागवणे आणि राष्ट्रीय सुरक्षेप्रती  नौदलाच्या योगदानावर प्रकाश टाकणे, हे नौदल दिनाच्या आयोजनाचे उद्दिष्ट आहे.

 

N.Chitale/R.Agashe/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1980833) Visitor Counter : 311