संरक्षण मंत्रालय
एनसीसी अर्थात राष्ट्रीय छात्र सेना स्थापनेचा 75वा वर्धापनदिन साजरा; केंद्रीय संरक्षण सचिवांनी राष्ट्रीय युध्द स्मारकापाशी हुतात्म्यांना वाहिली श्रद्धांजली
या समारंभात एनसीसीतील मुलींच्या वाद्यवृंदाने राष्ट्रभक्तीपर संगीताचे केले सादरीकरण
Posted On:
25 NOV 2023 11:21AM by PIB Mumbai
नवी दिल्ली 25 नोव्हेंबर 2023
वर्ष1948 मध्ये स्थापन झालेली राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी) ही जगातील सर्वात मोठी गणवेशधारी संघटना येत्या 26 नोव्हेंबर 2023 रोजी संघटनेचा 75 वा वर्धापन दिन साजरा करत आहे. ही संघटना तरुण-तरुणींमध्ये शिस्त, नेतृत्व आणि अढळ राष्ट्रवादासारख्या महत्त्वाच्या मूल्यांचा सन्मान करण्याची परंपरा कायम ठेवत संस्मरणीय कार्य करत आहे.
या अत्यंत महत्त्वाच्या टप्प्याच्या स्मरणार्थ केंद्रीय संरक्षण सचिव गिरीधर अरमाने यांनी आज, 25 नोव्हेंबर 2023 रोजी, नवी दिल्ली येथील राष्ट्रीय युध्द स्मारकापाशी जाऊन संपूर्ण एनसीसी समुदायाच्या वतीने हुतात्म्यांना पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.
राष्ट्रउभारणीच्या कार्यात एनसीसीने दिलेल्या योगदानाचा ठळक उल्लेख करत केंद्रीय संरक्षण सचिव गिरीधर अरमाने म्हणाले, “एनसीसी ही संघटना आज अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचली आहे. गेल्या 75 वर्षांमध्ये ही प्रतिष्ठित संघटना तिच्या नैतिकतेच्या बळावर ठाम उभी राहिली आणि तरुणांमध्ये एकता आणि शिस्तीचे प्रतिक म्हणून उदयाला आली.” एनसीसीने मिळवलेल्या अमर्याद यशाबद्दल या संघटनेची प्रशंसा करत अरमाने यांनी भविष्यात या संघटनेला लागेल ती मदत करण्याचे आश्वासन दिले.
या समारंभाचा अविभाज्य भाग म्हणून नवी दिल्लीच्या कमला नेहरु महाविद्यालयाच्या एनसीसीच्या पथकातील 26 प्रतिभावंत विद्यार्थिनींच्या वाद्यवृंदाने राष्ट्रभक्तीपर संगीताच्या धून वाजवून या पवित्र प्रसंगाला चैतन्य आणि देशभक्तीचा रंग दिला.
गेल्या सात दशकांमध्ये राष्ट्र उभारणीच्या कार्यात निभावलेल्या अविभाज्य भूमिकेचा एनसीसीला प्रचंड अभिमान आहे. लाखो एनसीसी छात्रांचे चरित्र घडवण्यात आणि त्यांच्यात कर्तव्य भावना रुजवून आपल्या देशाचे भविष्यातील नेते तयार करण्यात संघटनेने महत्त्वाची भूमिका निभावली आहे.
सामाजिक विकास, आपत्तीमधील मदतकार्य, पर्यावरण संवर्धन आणि समाजसेवा अशा वैविध्यपूर्व उपक्रमांमध्ये सक्रियपणे सहभागी असलेल्या एनसीसीने समाजाच्या वस्त्रावर स्वतःचा ठळक ठसा उमटवला आहे. उद्याच्या प्रसंगासाठी पूर्वतयारी म्हणून एनसीसीच्या मुलामुलींनी गेले दोन आठवडे ‘स्वच्छता हीच सेवा’ हे सपूर्ण भारतभर चालवले जाणारे स्वच्छता आणि जागरूकता अभियान हाती घेतले. या अभियानात कचरामुक्त भारताचे उद्दिष्ट साध्य करण्याच्या उद्देशाने अनेक प्रभावी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्याचबरोबर, या कार्यात योगदान म्हणून एनसीसीमधील 15 लाखांहून अधिक मुलामुलींनी 1 ऑक्टोबर 2023 रोजी, एक तासभर ‘श्रमदान’ उपक्रम राबवला.
75 व्या वर्धापनदिनाच्या या ऐतिहासिक प्रसंगी, भविष्यात समाज तसेच राष्ट्र-उभारणीच्या कार्यात योगदान देणारे विद्यार्थी घडवण्याप्रती समर्पित राहण्याचा एनसीसीचा निर्धार कायम आहे.या विशेष प्रसंगी, देशभरात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांच्या शृंखलेत रक्तदान अभियान, संचलने, पुष्पचक्र अर्पण समारंभ तसेच एनसीसीच्या यशोगाथा आणि नैतिक मूल्ये यांचे दर्शन घडवणारे सांस्कृतिक कार्यक्रम आणि जनजागृती मोहिमा यांचा समावेश आहे.
***
S.Nilkanth/Sanjana C/CYAdav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1979694)
Visitor Counter : 158