माहिती आणि प्रसारण मंत्रालय
54 व्या इफ्फीमध्ये केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते ‘व्हीएफएक्स’ आणि ‘टेक पॅव्हेलियन’ चे उद्घाटन
उदयोन्मुख -अद्ययावत तंत्रज्ञान आत्मसात करून, भारत चित्रपटनिर्मिती पश्चात कराव्या लागणा-या उद्योगाचे केंद्र बनत आहे: माहिती आणि प्रसारण मंत्री
"व्हीएफएक्स आणि टेक पॅव्हेलियनमुळे भारतातील ‘पोस्ट प्रोडक्शन’ उद्योग आणखी वृध्दिंगत होईल"
गोवा/मुंबई, 21 नोव्हेंबर 2023
केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांच्या हस्ते आज गोव्यात 54 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा (इफ्फी) भाग म्हणून ‘व्हीएफएक्स’ म्हणजेच व्हिज्युअल इफेक्टस- दृष्यात्मक प्रभाव टाकणारे तंत्रज्ञान आणि ‘ टेक पॅव्हेलियन’ चे उद्घाटन करण्यात आले. इफ्फीमध्ये एनएफडीसीच्या वतीने ‘फिल्म बाजार’ च्या इतिहासात प्रथमच ‘व्हीएफएक्स’ आणि टेक पॅव्हेलियन स्थापन करण्यात आले आहे. यामध्ये अॅनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, व्हर्च्युअल रिअॅलिटी आणि सीजीआय या क्षेत्रामध्ये चित्रपट निर्मिती करताना तंत्रज्ञान अत्यंत गतिमान, एकमेकांमध्ये सहजतेने मिसळून जाणारे आणि अत्याधुनिक प्रगती साधते, याचे दर्शन या ‘टेक पॅव्हेलियन’ मध्ये झाले.
माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी सिने म्युझियम, अॅमेझॉन प्राइम आणि नेटफ्लिक्सचे ‘व्ह्यूइंग झोन’ यासह पॅव्हेलियनच्या विविध विभागांचे उद्घाटन केले तसेच पाहणी केली. मंत्र्यांनी सोनीच्या फुल फ्रेम सिनेमा लाइन कॅमेऱ्यांचे प्रात्यक्षिक घेतले आणि ‘ 75 क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमारो’ उपक्रमांतर्गत निवडलेल्या तरुण चित्रपट निर्मात्यांशी संवाद साधला. टेक पॅव्हेलियनच्या ‘ बुक टू बॉक्स’ विभागातील निवडक लेखकांशीही त्यांनी संवाद साधला.
यावेळी ठाकूर म्हणाले की, देशातील प्रसार माध्यमांची आणि मनोरंजन अर्थव्यवस्था अभूतपूर्व आहे. या क्षेत्रामध्ये 10 व्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर पोहोचण्याइतकी वृध्दी भारताने केली आहे, असे सांगून ते म्हणाले, ''देशातील चित्रपट आणि माध्यम सामग्रीमध्ये असलेली प्रतिभा आणि परिमाण पाहता, भारत लवकरच जगातील तिसरा सर्वात मोठा प्रसार माध्यम आणि मनोरंजन उद्योग बनेल.'’
भारतातील चित्रपट निर्मितीमध्ये नवीन तंत्रज्ञानाचा वापर वाढत आहे आणि नवकल्पनांचाही स्वीकार केला जात आहे, असे सांगून मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले, ‘’याबरोबरच आमच्या तरुण मुलांची प्रतिभा आणि आमच्या उद्योगातील प्रमुख मंडळींनी आणलेल्या नाविन्यामुळे भारत हे एक चित्रपटाचे चित्रीकरण आणि चित्रनिर्मिती पश्चात कार्यासाठी सर्वाधिक मागणी असलेले स्थान बनले आहे.''
नवीन तंत्रज्ञानाच्या वापराविषयी भूमिका अधोरेखित करताना मंत्री म्हणाले, ''भारत हा कथाकथन करणारा देश आहे आणि लोकही तल्लीन होवून कथा ऐकत असतात. इथले लोक सर्जनशील आणि मूळ सामग्री पसंत करणारे आहेत; आणि तशीच ती वापरतातही.'' मंत्री पुढे म्हणाले की, सामग्री निर्मात्यांनी माध्यमांमध्ये सतत विकसित होत असलेल्या तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे आणि मनोरंजनासोबतच प्रेक्षकांना माहिती देण्यावर आणि शिक्षित करण्यावर भर देऊन चित्रपट निर्मिती केली पाहिजे.
याप्रसंगी मंत्री अनुराग ठाकूर पुढे म्हणाले, ''भारत हे पोस्ट-प्रॉडक्शनचे – म्हणजेच चित्रनिर्मिती पश्चात करावयाच्या कार्याचे केंद्र आहे, नव्याने स्थापन झालेल्या व्हीएफएक्स आणि टेक पॅव्हेलियन यांच्यामुळे चित्रपट निर्मितीपश्चातच्या उद्योग कार्यामध्ये आणखी वाढ होईल.''
सर्जनशील आणि ‘ एआय स्पेस’ मधील तज्ञ आभासी जग तयार करून, बुद्धिमान पात्रांची रचना करून आणि कॅमेऱ्याच्या पलीकडे असलेली जादू दाखवतील तसेच याचा वेगळा, वैयक्तिक अनुभव सामायिक करून चित्रपटनिर्मितीमधील शक्यता आणि प्रगती उलगडून दाखवणे शक्य होणार आहे.
या वर्षातील काही प्रतिष्ठित, सहभागी ब्रँड्समध्ये ‘Google Arts and Culture’ , ‘Netflix’ आणि ‘Amazon’ यांचा समावेश आहे.
यावेळी ठाकूर यांच्यासमवेत माहिती आणि प्रसारण खात्याच्या अतिरिक्त सचिव नीरजा शेखर, आणि मंत्रालयाचे सहसचिव (चित्रपट), आणि एनएफडीसीचे व्यवस्थापकी संचालक प्रिथुल कुमार उपस्थित होते.
* * *
PIB Mumbai | R.Aghor/S.Bedekar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBPanaji /PIBPanaji /pib_goa pibgoa[at]gmail[dot]com /PIBGoa
(Release ID: 1978510)
Visitor Counter : 148