सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय

संभव हा दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय कार्यक्रम दिव्यांग बांधवांच्या सक्षमीकरणासाठीच्या आमची बांधिलकी पुन्हा निर्माण करण्यामधील एक महत्त्वाचा टप्पा आहे- अपूर्व चंद्रा, माहिती आणि प्रसारण सचिव


दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय कार्यक्रम ‘संभव-2023’ मध्ये दिव्यांग कलाकारांचा उत्साही सहभाग

Posted On: 18 NOV 2023 8:51PM by PIB Mumbai

‘संभव-2023’ या दिव्यांग कलाकारांच्या दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय कार्यक्रमाचे 18 आणि 19 नोव्हेंबर 2023 रोजी दिल्लीमध्ये असोसिएशन फॉर लर्निंग परफॉर्मिंग आर्ट्स अँड नॉर्मेटिव्ह ऍक्शन(A.L.P.A.N.A.) या संस्थेने आयोजन केले आहे. भारताबरोबरच ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, भूतान, इंडोनेशिया, इराण, म्यानमार, नेपाळ, रशिया, श्रीलंका आणि थायलंड या देशांमधील कलाकार या दोन दिवसीय कार्यक्रमात सहभागी झाले. या कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी या देशांमधील विविध कलाकारांनी त्यांच्या कलेच्या सादरीकरणाद्वारे त्यांच्या प्रतिभेचे दर्शन घडवले. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव अपूर्व चंद्रा या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

या कार्यक्रमात बोलताना अपूर्व चंद्रा यांनी असोसिएशन फॉर लर्निंग परफॉर्मिंग आर्ट्स अँड नॉर्मेटिव्ह ऍक्शन(A.L.P.A.N.A.) या संस्थेच्या कामाची प्रशंसा केली. या संस्थेने अनेक आव्हाने असूनही यावर्षी ‘संभव’ चे आयोजन करून समावेशक कलांच्या उत्सवाची ही परंपरा पुढे सुरू ठेवली आहे, असे ते म्हणाले. गेल्या काही वर्षात ‘संभव’ च्या वाढीमुळे केवळ भारतातीलच नव्हे तर जगभरातील दिव्यांग कलाकारांसाठी हा एक वैशिष्ट्यपूर्ण मंच बनला आहे, असे चंद्रा यांनी नमूद केले.  

दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी सरकार खूप मोठ्या प्रमाणात भर देत आहे, अशी माहिती त्यांनी दिली. ‘संभव’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून जागतिक समाजात समावेशक विकासाला चालना देण्यामध्ये आपल्या देशाच्या भूमिकेचे दर्शन घडत आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वसुधैव  कुटुंबकम् म्हणजे संपूर्ण जग हे एक कुटुंब आहे हा दृष्टीकोन प्रदर्शित होत आहे, असे त्यांनी सांगितले.

कोविड महामारीने देखील जगभरातील दिव्यांग कलाकारांच्या मनोधैर्यावर कोणताही परिणाम झाला नाही आणि ‘संभव’ चे आयोजन करण्यामध्ये ‘अल्पना’ ने आपले कामकाज सुरूच ठेवले, असे ते म्हणाले.

‘संभव’ च्या माध्यमातून हे कलाकार आपल्या गुणवत्तेचे दर्शन घडवत आहेत आणि  कोणत्याही प्रकारचे अडथळे किंवा अपंगत्वामुळे आपल्या प्रयत्नांवर किंवा धैर्यावर कोणताही परिणाम होत नाही हे संपूर्ण जगासमोर सिद्ध करत आहेत. ‘अल्पना’ ही संस्था एक वैशिष्ट्यपूर्ण एकात्मिक संस्था आहे जिथे दिव्यांग आणि बिगर दिव्यांग असे दोन्ही प्रकारचे विद्यार्थी नृत्य, संगीत, चित्रकला, पेंटिंग आणि इतर विविध कलाकुसरीच्या कामांचे कोणत्याही वर्गीकरणाविना प्रशिक्षण घेतात.

18 आणि 19 नोव्हेबर 2023 रोजी आयोजित होत असलेल्या ‘संभव’ या कार्यक्रमात वेबिनार, आर्ट अँड क्राफ्ट कार्यशाळा,योग कार्यशाळा, योगशास्त्रावरील परिसंवाद, नृत्य आणि संगीत उपचारावरील कार्यशाळा, दिव्यांग कलाकारांनी रेखाटलेली चित्रे आणि तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन, प्रशिक्षक, संशोधक आणि आठ देश आणि भारताच्या विविध भागातील हितधारक यांचा समावेश आहे.

***

MI/Shailesh P/CY

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1977967) Visitor Counter : 94