वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

दुसऱ्या व्हॉईस ऑफ ग्लोबल शिखर परिषदेला केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी केले संबोधित


पुरवठा साखळ्या अधिक मुक्त, सुरक्षित, विश्वासार्ह आणि लवचिक बनवण्यासाठी, सर्व देशांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज केली व्यक्त

दक्षिणेतील देशांमधले सहकार्य भविष्यातील व्यापाराचा पाया अधिक बळकट करेल: गोयल

Posted On: 17 NOV 2023 9:31PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 17 नोव्हेंबर 2023

जागतिक पुरवठा साखळ्या अधिक मुक्त, सुरक्षित, विश्वासार्ह, स्थिर आणि न्याय्य  होण्यासाठी, ग्लोबल साऊथ मधील देशांनी परस्पर सहकार्य आणि एकत्रित कृती करण्याची गरज असून त्याद्वारे ही साखळी व्यवस्था अधिक लवचिक बनवता येईल,असे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, तसेच ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण, वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी म्हटले आहे. ते आज दुसऱ्या व्हॉईस ऑफ ग्लोबल साऊथ शिखर परिषदेत बोलत होते.

कोविड 19 महामारीचे संकट, हवामान बदलाचा प्रभाव आणि वाढते भू राजकीय तणाव, या सर्व घटकांमुळे जागतिक पुरवठा साखळ्या विस्कळीत झाल्या असून त्यांची स्थिती नाजूक झाली आहे. ह्या विस्कळीतपणामुळे, अन्न आणि आरोग्य सुरक्षेची मोठी आव्हाने निर्माण झाली असून, जीवनमानाचा खर्च वाढला आहे, तसेच शाश्वत विकास उद्दिष्टे गाठण्याच्या वेगावरही विपरीत परिणाम झाला आहे. जगासमोरील महत्वाच्या आव्हानांपैकी, बहुतांश आव्हाने, ग्लोबल साऊथने निर्माण केलेली नसली, तरीही, त्यांचा सर्वाधिक फटका मात्र, याच देशांना बसतो आहे, असे  यथोचित निरीक्षण, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोंदवले होते, असे गोयल यांनी सांगितले. जेव्हा जेव्हा जग उपाययोजनांचा विचार करेल, तेव्हा तेव्हा, आपला सामूहिक आवाज ऐकला जायलाच हवा, यावरही पंतप्रधानांनी भर दिल्याचे त्यांनी सांगितले.

भारताने सप्टेंबर महिन्यात एक पृथ्वी, एक कुटुंब, आणि एक भविष्य या संकल्पनेच्या आधारावर, ग्लोबल साऊथच्या पाठिंब्याने, जी-20 शिखर परिषदेचे यशस्वी आयोजन केले होते, हे गोयल यांनी नमूद केले. आपल्या अध्यक्षपदाच्या कारकीर्दीत, भारताने ग्लोबल साऊथ चा आवाज बुलंद करण्यासाठी महत्वाचा हस्तक्षेप केला, आफ्रिकन युनियनला जी-20 चा स्थायी सदस्य बनवण्यासह, जी-20 च्या निष्कर्ष आराखड्यात ग्लोबल साऊथ साठी ठोस कृतिशील तरतुदी समाविष्ट करण्यापर्यंतच्या भारताच्या प्रयत्नांचा त्यांनी उल्लेख केला. या प्रयत्नांमुळेच, आफ्रिकन महासंघ आता जी20 चा कायम सदस्य असेल, असेही ते म्हणाले ग्लोबल साऊथ चा आवाज अधिक बळकट करण्यासाठी आणि आपले भविष्य तसेच मानवतेसाठी एकत्र येण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

भारताच्या जी 20 अध्यक्षपदाच्या कार्यकाळात, ग्लोबल मूल्य साखळीच्या मॅपिंग साठी जी-20 आराखडा स्वीकारण्यात आला, ज्याद्वारे जी-20 अधिक लवचिक आणि सर्वसमावेशक होईल.

ग्लोबल साऊथशी संबंधित पहिली गरज म्हणजे, ग्लोबल मूल्य साखळ्या लक्षात घेऊन, जिथे प्रत्येक देश केवळ त्यांचा सहभाग वाढविण्यावरच लक्ष केंद्रित करू शकत नाही, तर मूल्य साखळीत पुढे जाऊन त्यांच्या सहभागाची गुणवत्ता सुधारण्यावरही लक्ष केंद्रित करू शकतो, यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे, असे गोयल यांनी नमूद केले. यामुळे त्यांना जीव्हीसीएसच्या उच्च मूल्यवर्धित भागांमध्ये सर्वात मोठा वाटा घेण्यास मदत होईल, दुसरे म्हणजे, जीव्हीसीएसला नैसर्गिक आणि मानवनिर्मित असे दोन्ही धक्के सहन करण्याची क्षमता मिळेल आणि तिसरे म्हणजे, आपल्या सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांचा आंतरराष्ट्रीय बाजार आणि व्यापारात उत्तम समन्वय निर्माण होईल. आणि चौथे, तसेच शेवटचे म्हणजे, यामुळे, आपल्याला लॉजिस्टिक पायाभूत सुविधामधल्या त्रुटी बघता येतील. या त्रुटी भरून काढल्या तर ग्लोबल साऊथ चा जागतिक व्यापरातील सहभाग आणि एकात्म होणे वाढेल, असे ते म्हणाले. जर आपण या सगळ्यावर एकत्रित काम केले, तर, आपला व्यापार समग्र विकास आणि समृद्धी आणि विशेषतः शाश्वत विकास उद्दिष्टे साध्य उद्दिष्टे साध्य करण्यावर परिणाम करू  शकणाऱ्या परिवर्तनीय प्रभावांना आपण गती देऊ शकू, असे गोयल म्हणाले. 

भारताच्या अध्यक्षतेखालील G 20 ने डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांच्या प्रणालींसाठी G 20 आराखडा आणला आहे, असेही गोयल यांनी सांगितले.

 

N.Chitale/R.Aghor/P.Malandkar

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 



(Release ID: 1977760) Visitor Counter : 86