ग्रामीण विकास मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

दीनदयाल अंत्योदय योजना - राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियान आणि सिडबी  यांच्यात सामंजस्य करार,  महिलांच्या नेतृत्वाखालील उद्योगांच्या प्रवासात एक महत्त्वपूर्ण टप्पा


महिला उद्योजकांच्या क्षमता वाढीसाठी एक विश्वसनीय  आणि संवेदनशील पाठबळ  संरचना स्थापित करणार्‍या मूलभूत  क्रियाकलापांचे दर्शन घडवणे, हा या सहकार्याचा प्राथमिक केंद्रबिंदू

Posted On: 09 NOV 2023 1:23PM by PIB Mumbai

 

ग्रामीण विकास मंत्रालयाअंतर्गत असलेले दीनदयाल अंत्योदय योजना -  राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियान (डीएवाय -एनआरएलएम) आणि भारतीय लघुद्योग  विकास बँक (सिडबी) यांनी एका ऐतिहासिक सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली.  देशातील  महिलांच्या नेतृत्वाखालील उद्योगांच्या प्रवासात हा एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे.  दोन वर्षांचा कालावधी असणार्‍या या सामंजस्य करारावर आज डीएवाय -एनआरएलएम आणि सिडबी यांनी ग्रामीण विकास सचिव शैलेश कुमार सिंह आणि सिडबीचे अध्यक्ष व  व्यवस्थापकीय संचालक शिवसुब्रमण्यम रमण  यांच्या उपस्थितीत स्वाक्षरी केली. डीएवाय -एनआरएलएमच्या वतीने ग्रामीण उपजीविका अतिरिक्त सचिव  चरणजित सिंग यांनी दस्तऐवजावर स्वाक्षरी केली.  तर सिडबीचे प्रतिनिधित्व सिडबीचे  मुख्य महाव्यवस्थापक डॉ. एस.एस. आचार्य यांनी केले.  यावेळी ग्रामीण उपजीविका सहसचिव स्मृती शरण व  स्वाती शर्माग्रामीण उपजीविका संचालक राघवेंद्र प्रताप सिंह आणि सिडबीचे उप महाव्यवस्थापक सौरव वाजपेयी यावेळी उपस्थित होते.

ही धोरणात्मक भागीदारी स्वयं सहायता गटांच्या अनुभवी सदस्यांदरम्यान महिलांच्या नेतृत्वाखालील उद्योगांना चालना देण्याच्या उद्देशाने एक परिवर्तनशील उपक्रम निर्माण करण्यासाठी डीएवाय -एनआरएलएम आणि सिडबीच्या तज्ञांना एकत्र आणत आहे. या सहकार्याचा प्राथमिक केंद्रबिंदू महिला उद्योजकांच्या क्षमतावृद्धीसाठी  एक विश्वासार्ह आणि संवेदनशील पाठबळ  संरचना स्थापित करणार्‍या मूलभूत  क्रियाकलापांचे दर्शन घडवणे हा आहे. शिवाय, औपचारिक वित्तपुरवठा उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा व्हावा यासाठी आवश्यक  मानक प्रोटोकॉल, प्रणाली आणि कार्यपद्धती संस्थात्मक करणे, तसेच नवीन आर्थिक उत्पादने आणि योजनांसाठी सर्वसमावेशक आराखडा विकसित करणे यामागचे  उद्दिष्ट आहे.

या सहकार्यातून अपेक्षित असलेले प्रमुख परिणाम पुढीलप्रमाणे आहेत:

  • अनुभवी स्वयं सहायता गट सदस्यांना सूक्ष्म-उद्योजक बनविण्यास प्रोत्साहन देण्याकरिता  राज्य ग्रामीण उपजीविका अभियान (एसआरएलएम  ) पथकांची क्षमता वाढवणे
  • महिलांच्या नेतृत्वाखालील उद्योगांसाठी कार्यकर्ते , मार्गदर्शक आणि तज्ज्ञांचा समावेश असलेल्या  विश्वसनीय आणि संवेदनशील पाठबळ संरचनेची स्थापना 
  • महिलांच्या नेतृत्वाखालील उद्योगांना पाठबळ  देण्यासाठी डीएवाय -एनआरएलएम अंतर्गत प्रमाणित प्रोटोकॉलची अंमलबजावणी
  • वित्तीय संस्थांसह भागीदारी आणि वित्तपुरवठादारांचे जाळे तयार करणे
  • नवीन आर्थिक योजनांची रचना आणि अंमलबजावणी, जसे की पत  हमी आणि व्याज सवलत
  • महिलांच्या नेतृत्वाखालील उद्योगांना चालना देण्यासाठी देशभर आदर्श ठरू शकेल अशा  सुस्पष्ट, श्रेणीयुक्त  प्रारूपांची निर्मिती

उद्योजकीय क्षेत्र  अधिक समावेशक करण्यावर  आणि महिलांच्या नेतृत्वाखालील व्यवसायांना पाठबळ  देण्यावर लक्ष केंद्रित करतही धोरणात्मक भागीदारी महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी आणि उद्योजकतेसाठी सरकारची वचनबद्धता  दर्शवते.   डीएवाय -एनआरएलएम आणि  सिडबीच्या  क्षमता परस्परांना जोडत, हा उपक्रम महिला उद्योजकांसाठी नवीन कवाडे  उघडण्याचा प्रयत्न करत देशाच्या आर्थिक वृद्धीस  आणि समृद्धीला हातभार लावणारा आहे.

***

N.Meshram/S.Kakade/P.Kor


(Release ID: 1975959) Visitor Counter : 140