निती आयोग

नीती आयोगाने विकास आणि समृद्धीसाठी सर्वसमावेशक व्यापारावर आयोजित केली कार्यशाळा

Posted On: 07 NOV 2023 11:08AM by PIB Mumbai

 

नीती आयोगाने विकास आणि समृद्धीसाठी सर्वसमावेशक व्यापार" या विषयावर एक संकल्पना आधारित कार्यशाळा आयोजित केली होती. यात  लवचिक पुरवठा साखळी आणि विकास व समृद्धीसाठी सर्वसमावेशक व्यापाराच्या क्षेत्रात देशांतर्गत पोहोच वाढवणे आणि विस्तारणे, नवी दिल्ली नेत्यांच्या घोषणापत्र (एनडीएलडी) निष्पत्तीचे उत्तरदायित्व आणि अंमलबजावणी यांना गती देण्याची आणि विस्तारण्याची आवश्यकता अधोरेखित करण्यात आली. भारताच्या अध्यक्षतेखालील जी 20 शिखर परिषदेच्या अंतर्गत नवी दिल्ली नेत्यांचे घोषणापत्राचा पाठपुरावा म्हणून या विषयासंबंधी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते ज्यात सर्वांसाठी विकास आणि समृद्धीसाठी मजबूत, शाश्वत, संतुलित आणि समावेशक व्यापाराचा अवलंब करण्यावर भर देण्यात आला.

विकास आणि समृद्धीचे इंजिन म्हणून व्यापार सुलभ करणाऱ्या भेदभावरहित आणि सर्वसमावेशक व्यापार प्रणालीची गरज, नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बीव्हीआर सुब्रह्मण्यम यांनी आपल्या बीजभाषणात अधोरेखित केली.

नीती आयोगाचे सदस्य डॉ. अरविंद वीरमणी यांनी 'मॅपिंग ग्लोबल व्हॅल्यू चेन्स' या पहिल्या सत्राला संबोधित केले. कामगारप्रणीत पुरवठा साखळी, धोरण तयार करण्यासाठी संस्थात्मक घटक आणि करप्रणाली सुलभ करणे, विशेषतः एमएसएमईसाठी भरणा, परतावा  आणि निर्यात पतप्रणालीचे एकात्मिकीकरण, यासारख्या प्रमुख क्षेत्रांना बळकट करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. 

विकासासाठी सर्वसमावेशक व्यापाराला प्रोत्साहनया विषयावरील दुसऱ्या सत्राच्या अध्यक्षस्थानी नीती आयोगाचे सदस्य प्रा. रमेश चंद होते. अत्यंत मागास देशांमधला पायाभूत सुविधा विकास आणि क्षमता वृद्धी, बिगर सीमाशुल्क अडथळे कमी करणे; व्यापारासाठी, विशेषत: विकसनशील आणि कमी विकसित देशांमधील एमएसएमईसाठी मदत वाढवण्यासाठी संसाधने एकत्रित करणे; पायाभूत सुविधा, कौशल्ये आणि डेटा मालकी या तीन क्षेत्रांमध्ये डिजिटल समावेश; आणि व्यापार प्रणालींमध्ये हवामानविषयक तत्त्वे समाविष्ट करणे, या महत्त्वपूर्ण मुद्द्यांकडे या सत्रात लक्ष वेधण्यात आले.

समावेशक व्यापारातील आव्हाने सोडवणेया कार्यशाळेच्या समारोप सत्राच्या अध्यक्षस्थानी जागतिक व्यापार संघटनेचे माजी उपमहासंचालक डॉ. हर्षवर्धन सिंग होते. भारताची पारंपारिक निर्यात वाढवणेव्यापारात महिला कामगारांचा सहभाग वाढवणे; पुरवठा शृंखला आणि व्यापारात राज्य/जिल्हा स्तरावरील एकात्मीकरण (निर्यात केंद्र म्हणून जिल्ह्यांना प्रोत्साहन देणे) आणि रिस्कीलिंग अपस्केलिंग केंद्रित कौशल्य विकास सुधारणे, याकडे लक्ष वेधले.

देशाच्या विकासाला आणि समृद्धीला चालना देण्यासाठी कार्यान्वित करता येतील अशी कार्यक्षम धोरणे आणि योजना तयार करण्याकरिता, नवी दिल्ली नेत्यांच्या घोषणापत्रातील प्रमुख अजेंडांवर संकल्पना आधारित  कार्यशाळांची मालिका नीती आयोग आयोजित करत आहे.

***

S.Tupe/S.Kakade/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1975339) Visitor Counter : 75