गृह आणि शहरी व्यवहार मंत्रालय

स्वच्छ दिवाळी शुभ दिवाळी


स्वच्छ उत्सव सुनिश्चित करण्यासाठी गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने सुरू केली स्वाक्षरी मोहीम.

Posted On: 06 NOV 2023 3:46PM by PIB Mumbai

 

दिवाळी तोंडावर आली आहे आणि घरोघरी सणासुदीची लगबग सुरू आहे. दिवाळीपूर्वी प्रत्येक घरात स्वच्छता केंद्रस्थानी असल्याने नागरिक स्वच्छतेच्या कामात व्यग्र आहेत. देशात सणासुदीच्या पर्वाचे औचित्य साधून, गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने (MoHUA) 06 ते 12 नोव्हेंबर, 2023 या कालावधीत मिशन स्वच्छ भारत - शहरी विभाग 2.0 अंतर्गत 'स्वच्छ दिवाळी शुभ दिवाळी' मोहीम राबवत आहे. स्वच्छ भारताकडे देशाचा प्रवास आणि पर्यावरणपूरक जीवनशैलीची तत्त्वे (मिशन LiFE) यांच्यासोबत दिवाळीच्या सांस्कृतिक महत्त्वाची सांगड घालणे हा या मोहिमेचा उद्देश आहे.

स्वच्छ दिवाळी शुभ दिवाळी ही संकल्पना मिशन LiFE च्या मुख्य तत्त्वांचा पुनरुच्चार करत पर्यावरणाचे संरक्षण आणि जतन करणे, जीवनशैलीत वसुंधरेला पूरक असणारे वर्तनात्मक बदल घडवून आणणे यासह स्वच्छ आणि पर्यावरणपूरक उत्सव साजरा करण्याच्या महत्त्वावर भर देते. जनतेमध्ये संवेदनशीलता निर्माण करुन त्यांना स्थानिक उत्पादने निवडण्यासाठी प्रवृत्त करणे , या माध्यमातून पर्यावरण तसेच समुदायांप्रती जबाबदारीची भावना निर्माण करणे, एकदा वापरल्या जाणार्‍या प्लास्टिकपासून मुक्त दिवाळीचा स्वीकार करणे तसेच दिवाळीपूर्वी आणि दिवाळी नंतरच्या स्वच्छतेला प्राधान्य देणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. या मोहीमेद्वारे सणासाठी शाश्वत आणि पर्यावरणाच्या दृष्टीने जागरूक दृष्टिकोन वाढवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

या मोहिमेने स्वच्छ दिवाळी शुभ दिवाळी’ – स्वाक्षरी मोहिमेसाठी MyGov या सरकारच्या नागरिक सहभाग मंचासोबत भागीदारी केली आहे. स्वच्छ, हरित आणि एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकपासून मुक्त दिवाळी साजरी करण्याचा आपला संकल्प दर्शविण्यासाठी नागरिकांना राष्ट्रीय स्वाक्षरी मोहिमेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले जात आहे. नागरिक 6 ते 12 नोव्हेंबर 2023 पर्यंत MyGov वर स्वच्छ दिवाळीसाठी स्वाक्षरी करू शकतात. नागरिक 30 सेकंदांच्या व्हिडिओ रीलमध्ये स्वच्छ दिवाळीचे त्यांचे अनोखे उपक्रम चित्रीत करू शकतात आणि #SwachDiwali सह त्यांच्या आवडीच्या समाज माध्यमावर अपलोड करून SBM अर्बन 2.0 चे अधिकृत हँडल - @sbmurbangov. ला टॅग करू शकतात. याशिवाय, शहरी स्थानिक प्रशासकीय संस्थांना दिवाळीपूर्वी आणि दिवाळी नंतर साफसफाई तसेच धुरके हटवण्यासाठी उपक्रम हाती घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

स्वच्छ आणि हरित दिवाळीचा संकल्प करण्यासाठी विविध नागरिक गट स्वाक्षरी मोहिमेचा प्रचार करतील. नागरिकांमध्ये 3R च्या संकल्पनेला चालना देण्यासाठी, स्थानिक संस्था आरआरआर केंद्रांवर दान केल्या जाणार्‍या वस्तूंची संकलन स्थाने लोकप्रिय करून संकलनाची सुविधा प्रदान करु शकतात. केंद्रीय मंत्रालये, राज्य सरकार, केंद्रशासित प्रदेश, सर्व सरकारी कार्यालये, जिल्हा प्रशासन आणि स्थानिक स्वराज्य संस्था बाजार संघटना, व्यापारी संघटना, व्यावसायिक संस्था, निवासी कल्याणकारी संघटना, प्रभाग समित्या, बचत गट, स्वयंसेवी संस्था आणि नागरी समाज संघटना, युवा क्लब यांच्याशी संपर्क साधून 'रिड्यूस, रियूज, रिसायकल' तसेच 'वेस्ट टू वेल्थ' या तत्त्वांचा अवलंब करत कचरा विलगीकरणाला प्रोत्साहन देणार्‍या स्वच्छतेच्या विविध पैलूंवर जनजागृती करतील. उच्च वायु गुणवत्ता निर्देशांक (AQI) असलेल्या शहरांनी स्वच्छता कामगारांसाठी विशेष काळजी आणि सुरक्षितता सुनिश्चित करणे आवश्यक आहे. ते स्वच्छता कामगारांसाठी योग्य फेस मास्क, डोळ्यांसाठी संरक्षणात्मक उपकरणे आणि इतर सुरक्षा उपकरणे वितरीत करू शकतात. स्वच्छता कामगारांची दिवाळी सण खास बनवण्यासाठी त्यांना स्थानिक उत्पादनेही भेट दिली जाऊ शकतात.

***

S.Patil/S.Mukhedkar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1975222) Visitor Counter : 232