पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

"ओएनजीसी सारखे सार्वजनिक आणि सरकारी उपक्रम ईशान्येकडील जीवनमान उंचावण्यासाठी वचनबद्ध”: पेट्रोलियम मंत्री हरदीप एस पुरी


आसाममधील शिवसागर येथे मल्टी स्पेशालिटी रुग्णालयाचे केंद्रीय मंत्री हरदीप एस पुरी यांच्या हस्ते उद्घाटन

Posted On: 04 NOV 2023 1:43PM by PIB Mumbai

 

"पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ईशान्येबद्दलच्या वचनबद्धतेनुसार, ओएनजीसी सारखे सार्वजनिक आणि सरकारी उपक्रम ईशान्येकडील जीवनमान उंचावण्यासाठी वचनबद्ध आहेत" असे केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू आणि गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी म्हटले आहे. आसाममधील शिवसागर येथे ओएनजीसीच्या सहाय्याने उभारण्यात आलेल्या  बहुसुविधा (मल्टी स्पेशालिटी) रुग्णालयाचे उद्घाटन केल्यानंतर ते एका सार्वजनिक कार्यक्रमात बोलत होते.  या कार्यक्रमाला केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू, कामगार आणि रोजगार राज्यमंत्री रामेश्वर तेली, ओएनजीसीचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण कुमार सिंह तसेच आसाम सरकार आणि ओएनजीसीचे इतर वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित होते.

संपूर्ण देशातील सर्वोत्कृष्ट पैकी एक असलेल्या सिउ-का-फा रुग्णालयाच्या आधुनिक पायाभूत सुविधा आणि वैद्यकीय उपकरणांचा फायदा केवळ अप्पर आसाममधील स्थानिक लोकांनाच होणार नाही तर नागालँड, मिझोराम आणि अरुणाचल प्रदेश या शेजारील राज्यांतील लोकांनाही होणार आहे असे पुरी यावेळी म्हणाले.  येत्या काही वर्षांत सिउ-का-फा रुग्णालयाचा लाभ वर्षाकाठी सुमारे एक लाख रुग्णांना होण्याची अपेक्षा आहे, असेही ते म्हणाले.

ओएनजीसीच्या सर्वात मोठ्या सीएसआरपैकी एक असलेले सिउ-का-फा रुग्णालय अत्याधुनिक आरोग्य सेवांनी युक्त आहे. या भागातील लोकांना आणखी अनेक कारणांमुळे याचा फायदा होईल" असे केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री रामेश्वर तेली म्हणाले.

या बहुसुविधा (मल्टी स्पेशालिटी) रुग्णालयाच्या उभारणीसाठी 483 कोटी 19 लाख रुपयांचा खर्च आला. आपल्या समाजाचे जीवन सुधारण्यासाठी ओएनजीसीची वचनबद्धता यातून दिसून येते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय प्रतिष्ठानाद्वारे (बीएव्हीपी) रुग्णालयाचे व्यवस्थापन आणि कार्यान्वयन केले जाईल.

35 एकरांवर पसरलेल्या या अत्याधुनिक रुग्णालयामध्ये 300 खाटा आणि 70 विशेष डॉक्टरांचे पाठक आहे. अस्थिरोग, ट्रॉमा, बालरोग आणि एनआयसीयू, प्रसूती, स्त्रीरोग, ईएनटी, कवटी संबंधित शस्त्रक्रिया, फिजिओथेरपी, पुनर्सुधारणा आणि प्रगत निदान यासह व्यापक वैद्यकीय सुविधा येथे उपलब्ध आहेत. मॉड्युलर ऑपरेटिंग थिएटर्स, एक क्रिटिकल केअर युनिट आणि रुग्णांना देशभरातील तज्ञ आरोग्य सेवा प्रदात्यांशी जोडणारे टेलिमेडिसिन येथे आहेत.

ओएनजीसी सिउ-का-फा बहुसुविधा रुग्णालय हे आसाम आणि आसपासच्या प्रदेशांच्या आरोग्य सेवेत  महत्त्वाची भर घालणारे आहे. वैद्यकीय उपचारांसाठी रहिवाशांना आता दिब्रुगडला जाण्याची गरज नाही.

आरोग्यसेवा पुरवण्याच्या प्राथमिक उद्देशाव्यतिरिक्त, ओएनजीसी सिउ-का-फा बहुसुविधा रुग्णालय, रोजगार निर्मितीला चालना देण्यात आणि क्षेत्रामध्ये आर्थिक संधींना प्रोत्साहन देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल. शिवसागरच्या लोकांसाठी प्रगती, विकास  आणि कल्याणाचे हे मूर्त स्वरूप आहे.

आसाममधील  आर्थिक-सामाजिकदृष्ट्या वंचित घटकांना प्रगत आरोग्य सेवा पुरवण्यासाठी ओएनजीसी सिउ-का-फा बहुसुविधा रुग्णालय समर्पित आहे.

***

N.Chitale/V.Ghode/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1974690) Visitor Counter : 103