राष्ट्रपती कार्यालय

लष्करी अभियंता सेवेमधील  परिविक्षाधीन अधिकाऱ्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेट

Posted On: 03 NOV 2023 2:02PM by PIB Mumbai

 

लष्करी अभियंता सेवेच्या (एमईएस) परिविक्षाधीन अधिकाऱ्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची आज (3 नोव्हेंबर, 2023) राष्ट्रपती भवनात भेट घेतली.

अभियंत्याची भूमिका केवळ आकडेमोड, आरेखन  आणि बांधकाम एवढ्यापुरती मर्यादित नाही, तर खूप व्यापक आहे आणि त्यात समुदायांना जोडणे, स्वप्ने साकारणे आणि भविष्याला आकार देणे या गोष्टी समाविष्ट आहेत, असे अधिकाऱ्यांना संबोधित करताना राष्ट्रपतींनी सांगितले. अभियंत्यांकडे  बळकट आणि शाश्वत भौतिक पायाभूत सुविधा निर्माण करण्याचे  सामर्थ्य आहे, असे त्यांनी  तरुण अधिकाऱ्यांना सांगितले.

पर्यावरणपूरक, शाश्वत आणि नवीकरणीय ऊर्जेच्या वाढीव वापराला प्रोत्साहन देणाऱ्या  संरचनांची रचना आणि बांधकाम करणे हे लष्करी अभियंता सेवेतील  अधिकाऱ्यांचे कर्तव्य आहे, असे राष्ट्रपती  पर्यावरणीय आव्हाने आणि हवामान बदलाच्या मुद्द्यांविषयी बोलताना म्हणाल्या. हरित अभियांत्रिकी ही काळाची गरज आहे. लष्करी अभियंता सेवा  विविध उपायांचा अवलंब करून राष्ट्रीय कार्बन उत्सर्जन  कमी करण्यात योगदान देत आहे याबद्दल  त्यांनी समाधान व्यक्त केले.

सर्व क्षेत्रांमध्ये, विशेषत: अभियांत्रिकी क्षेत्रात अत्याधुनिक आणि प्रगत तंत्रज्ञानाचा वापर अत्यंत महत्त्वाचा आहे, असे राष्ट्रपतींनी सांगितले.  गतिमान  घडामोडींमध्ये आघाडीवर राहण्याचा  आणि आपल्या कार्यातून  अत्याधुनिक  प्रगती देखील प्रतिबिंबित करणे सुनिश्चित करण्याचा सल्ला त्यांनी  लष्करी अभियंता सेवेतील अधिकाऱ्यांना दिला. 

जेव्हा आपला देश जागतिक स्तरावर विविध क्षेत्रात नवे मानदंड प्रस्थापित करत आहे, अशावेळी  हे अधिकारी  अशा सेवेचा भाग आहेत जे देश सेवेसाठी वचनबद्ध आहेत आणि राष्ट्रीय आणि जागतिक स्तरावर होत असलेल्या बदलांना आत्मसात करत  आहेत याचा अधिकाऱ्यांना   अभिमान वाटला पाहिजे असे राष्ट्रपती म्हणाल्या.  मातृभूमीसाठी प्राणाचे बलिदान  देण्यास सदैव तत्पर असलेल्या शूर सैनिकांना सेवा आणि पाठबळ  देण्याची संधी या अधिकाऱ्यांना  मिळाली आहे, असे त्यांनी सांगितले.

राष्ट्रपतींचे भाषण वाचण्यासाठी कृपया येथे क्लिक करा

***

N.Chitale/S.Chavan/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1974513) Visitor Counter : 90