कोळसा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

देशातील महत्त्वाच्या आठ उद्योगांपैकी कोळसा क्षेत्राने सप्टेंबर महिन्यात 16.1%ची उल्लेखनीय वाढ नोंदवली


गेल्या वर्षीच्या सप्टेंबर महिन्यातील 58.04 दशलक्ष टन कोळसा उत्पादनाच्या तुलनेत यावर्षी सप्टेंबर महिन्यात 67.27 दशलक्ष टन कोळशाचे उत्पादन झाले

केंद्रीय कोळसा मंत्रालयाने गेल्या काही काळात राबवलेल्या धोरणात्मक उपक्रमांमुळे या वाढीला चालना

Posted On: 02 NOV 2023 12:52PM by PIB Mumbai

नवी दिल्ली 02 ऑक्टोबर 2023

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने जारी केलेल्या सप्टेंबर 2023 महिन्यातील महत्त्वाच्या आठ उद्योगांच्या निर्देशांकानुसार, कोळसा क्षेत्राच्या निर्देशांकाने 16.1%ची अत्यंत उल्लेखनीय वाढ नोंदवली आहे. गेल्या वर्षी याच काळात मिळवलेल्या 127.5 अंकांच्या तुलनेत यावर्षी कोळसा क्षेत्राने 148.1 अंकांपर्यंत मजल मारली असून ऑगस्ट 2023 हा महिना वगळता, गेल्या 14 महिन्यात या क्षेत्रात झालेली ही सर्वाधिक वाढ आहे.

नुकत्याच हाती आलेल्या आकडेवारीतून असे दिसून आले आहे की गेल्या वर्षीच्या सप्टेंबर महिन्यातील निर्देशांकाशी तुलना करता, सप्टेंबर 2023 मध्ये देशातील सर्वात महत्त्वाच्या आठ उद्योगांचा संयुक्त निर्देशांक 8.1% ने (तात्पुरता) वाढला आहे

हा निर्देशांक, देशातील सिमेंट, कोळसा, कच्चे तेल, वीजनिर्मिती, खते, नैसर्गिक वायू, शुद्धीकरणातून मिळणारी उत्पादने आणि पोलाद या आठ सर्वात महत्त्वाच्या क्षेत्रांची संयुक्त तसेच आणि वैयक्तिक पातळीवरील निर्मितीविषयक कामगिरीचे मोजमाप करतो.

सप्टेंबर 2023 मध्ये कोळसा उत्पादनाने लक्षणीय उसळी घेतल्यामुळे कोळसा क्षेत्रामध्ये ही मोठी वाढ झालेली दिसून येते आहे.गेल्या वर्षीच्या सप्टेंबर महिन्यात देशात 58.04 दशलक्ष टन कोळशाचे उत्पादन झाले होते, त्याच्या तुलनेत यावर्षी सप्टेंबर महिन्यात 15.91% च्या उल्लेखनीय वाढीसह 67.27 दशलक्ष टन कोळशाचे उत्पादन झाले आहे. कोळसा क्षेत्राने एप्रिल 2023 मध्ये 9.1%ची वाढ नोंदवली होती ती आता सप्टेंबरमध्ये 16.1%पर्यंत पोहोचली असून यातून या क्षेत्राची सातत्यपूर्ण आणि शाश्वत वाढ दिसून येत आहे.

विविध धोरणात्मक उपाययोजनांच्या माध्यमातून कोळसा उत्पादनात ही वाढ करण्यात, केंद्रीय कोळसा मंत्रालयाने अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली आहे.या उपक्रमांमध्ये कंपन्यांच्या ताब्यातील खाणींतून कोळसा किंवा लिग्नाईटच्या विक्रीची परवानगी देण्यासाठी आणि व्यावसायिक कोळसा उत्खननासाठी लिलाव पद्धतीच्या माध्यमातून देशांतर्गत कोळसा उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी खाणी आणि खनिजे (विकास आणि नियामक) कायदा,2021मध्ये सुधारणा करणे, खाणींचे विकासक आणि परिचालक (एमडीओज) यांना देशांतर्गत कोळसा उत्पादनात वाढ करण्यात सहभागी करून घेणे तसेच कोळसा उत्पादनाला चालना देण्यासाठी महसूल-वभागणी तत्वावर वापरात नसलेल्या खाणींमध्ये कोळसा उत्पादन पुन्हा सुरु करणे यांसारख्या विविध उपक्रमांचा समावेश आहे.

कोळसा उत्पादन क्षेत्रात झालेली उल्लेखनीय वाढ आणि देशाच्या सर्वात महत्त्वाच्या आठ उद्योगांमध्ये कोळसा क्षेत्राचे योगदान हा केंद्रीय कोळसा मंत्रालयातर्फे सतत करण्यात येत असलेले प्रयत्न आणि राबवण्यात आलेले उपक्रम यांची साक्ष देतो. हे उपक्रम आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेला अनुसरून आहेत आणि ते स्वयंपूर्णता तसेच उर्जा सुरक्षा यांच्या दिशेने सुरु असलेल्या देशाच्या प्रगतीमध्ये योगदान देत आहेत.

***

S.Patil/S.Chitnis/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1974125) Visitor Counter : 110