युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
कर्तव्यपथ येथे ‘मेरी माटी मेरा देश’ मोहिमेच्या समारोप सोहळ्याला केंद्रीय मंत्री अनुरागसिंह ठाकूर यांची उपस्थिती
अनुराग सिंह ठाकूर यांनी हिमाचल प्रदेशातील कलश यात्रीकरूंबरोबर तेथून आणलेली माती अमृत कलशामध्ये मिसळली
Posted On:
30 OCT 2023 7:51PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 30 ऑक्टोबर 2023
कर्तव्यपथ येथे आज ‘मेरी माटी मेरा देश’ मोहिमाच्या समारोप सोहळ्याला केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री, अनुराग सिंह ठाकूर उपस्थित होते. केंद्रीय मंत्री ठाकूर यांनी हिमाचल प्रदेशातील 143 प्रतिनिधींसह अमृत कलशामध्ये राज्यातून आणलेली माती मिसळली.
याप्रसंगी अनुराग सिंह ठाकूर म्हणाले की, गेल्या दोन वर्षांत देशाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला आणि त्याअंतर्गत आयोजित लाखो कार्यक्रमांमध्ये कोट्यवधी लोकांनी सहभाग घेतला. ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी “मेरी माटी मेरा देश” कार्यक्रमात लोकसहभागाचे आवाहन केले आणि भारतातील सहा लाख गावांमध्ये अमृत कलश यात्रांचे आयोजन करण्यात आले आणि देशाच्या कानाकोपऱ्यातून माती गोळा करण्यात आली. हिमाचल ही शूरवीरांची आणि त्याग करणा-यांची भूमी आहे, असे ते म्हणाले. इथली प्रत्येक गावांमधून वीरांच्या कथा ऐकायला मिळतात. ते पुढे म्हणाले की, आज कर्तव्यपथावर जमलेला लोकसागर या मातीला आणि हुतात्म्यांना अभिवादन करून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे.
देशातील तरुण ‘एक भारत श्रेष्ठ भारता’ चा संकल्प अधिक दृढ करत असल्याचेही ते म्हणाले.
संपूर्ण देशामध्ये अमृत कलश यात्रा साजरी करण्यात आली होती. आज दिवसभराच्या कार्यक्रमात देशाच्या कानाकोपऱ्यातून अतुलनीय उत्साहाने आणि मोठ्या प्रमाणावर युवकांनी सहभाग नोंदवला. या कार्यक्रमात बीएसएफ, सीआयएसएफ आणि सीआरपीएफच्या शूर जवानांच्यावतीने ‘बँडव्दारे’ मानवंदना देण्याचा कार्यक्रमही झाला.
‘मेरी माटी मेरा देश’ काय्रक्रमाविषयी-
‘मेरी माटी मेरा देश’ ही मोहीम, देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या वीर आणि वीरांगनांना श्रद्धांजली आहे. लोकांच्या भागिदारीच्या भावनेने, या मोहिमेमध्ये देशभरात पंचायत/गाव, गट, शहरी स्थानिक संस्था, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर आयोजित केलेल्या अनेक उपक्रम आणि समारंभांचा यामध्ये समावेश आहे. या उपक्रमांमध्ये शिलाफलकम (स्मारक) बांधणे समाविष्ट होते. ज्यांनी सर्वोच्च बलिदान दिले त्या सर्व शूरवीरांबद्दल मनापासून कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी; शिलाफलकम येथे लोकांकडून ‘पंच प्रण’ प्रतिज्ञा; स्वदेशी प्रजातींचे रोपटे लावणे आणि ‘अमृत वाटिका’ (वसुधा वंदन) विकसित करणे आणि स्वातंत्र्यसैनिक आणि दिवंगत स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटुंबियांचा (वीरों का वंदन) सन्मान करण्यासाठी सत्कार समारंभ करणे, अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन देशभर करण्यात आले.
माय भारत
देशभरातील युवकांसाठी एकाच ठिकाणी संपूर्णतः सरकारी कार्याचा मंच उपलब्ध करून देण्याच्या हेतूने ‘मेरा युवा भारत’ (माय भारत) ही स्वायत्त संस्था उभारण्यात येत आहे. देशातील प्रत्येक युवकाला न्याय्य संधी उपलब्ध करून देण्याच्या पंतप्रधानांच्या संकल्पनेनुसार कार्य करत, ‘माय भार’त संस्था सरकारच्या संपूर्ण कार्यक्षेत्रामध्ये सक्षम यंत्रणा उभारण्यासाठी तंत्रज्ञानाच्या वापर करेल जेणेकरून युवक त्यांच्या आकांक्षा साकारू शकतील आणि ते ‘विकसित भारता’च्या उभारणीत योगदान देऊ शकतील. देशातील युवकांना सामाजिक बदलाचे तसेच राष्ट्र उभारणीचे पाईक होण्याची प्रेरणा देणे आणि त्यांना सरकार तसेच नागरिक यांच्या दरम्यानचा ‘युवा सेतू’ म्हणून कार्य करण्यास सक्षम करणे हा माय भारत मंचाचा उद्देश आहे. या अर्थाने, ‘माय भारत’ हा मंच, देशातील युवकांच्या नेतृत्वाखालील विकासा’ला मोठी चालना देणारा ठरेल.
S.Kakade/S.Bedekar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1973169)
Visitor Counter : 104