कृषी मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

'दक्षिण आशियाई प्रदेशात अन्नाची नासाडी आणि अपव्यय प्रतिबंध' या विषयावर नवी दिल्लीत आयोजित आंतरराष्ट्रीय कार्यशाळेचे राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांच्या हस्ते उद्‌घाटन


दक्षिण आशिया हा अन्नाचा प्रमुख उत्पादक तसेच ग्राहक आहे आणि अन्नाची नासाडी आणि अपव्यय कमी करणे ही आपली नैतिक जबाबदारी तसेच आर्थिक गरज आहे - शोभा करंदलाजे

अन्नाची नासाडी करणे हा गुन्हा असल्यावर भर देत आपल्या मुलांना अन्नाची नासाडी न करण्याचे महत्त्व शिकवण्याचे शोभा करंदलाजे यांचे आवाहन

Posted On: 30 OCT 2023 6:27PM by PIB Mumbai

 

 नवी दिल्ली, 30 ऑक्टोबर 2023

नवी दिल्लीत आयोजित ' दक्षिण आशियाई प्रदेशात अन्नाची नासाडी आणि अपव्यय  प्रतिबंध' या आंतरराष्ट्रीय कार्यशाळेचे उदघाटन राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांच्या हस्ते आज झाले.  भारतीय कृषी संशोधन परिषद आणि जर्मनीच्या थ्युनेन इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने ही  आंतरराष्ट्रीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.

शेतकरी आणि ग्राहक या दोघांशी संबंधित महत्त्वाच्या सामाजिक आणि आर्थिक समस्यांचे  निराकरण करण्यासाठी भारतीय कृषी संशोधन परिषद आणि जर्मनीच्या थ्युनेन इन्स्टिट्यूट यांनी केलेल्या प्रयत्नांची  राज्यमंत्री   शोभा करंदलाजे यांनी आपल्या भाषणात प्रशंसा केली.  जगभरात अंदाजे 3 अब्ज टन अन्न वाया जाते, हे त्यांनी नमूद केले.  त्यांनी अन्नाची  नासाडी आणि अपव्यय याची व्याप्ती अधोरेखित केली. समाजमान्य पद्धतींचा वापर करून जगभरातील अन्नाची नासाडी आणि अपव्यय कमी करण्याच्या दृष्टीने, विकसित तसेच विकसनशील देशांचे खात्रीशीर तंत्रज्ञान आणि पद्धती पुढे आणल्या पाहिजेत, असे मत त्यांनी व्यक्त केले.

विविध हितसंबंधितांमध्ये जागरूकता पसरवण्यासाठी सामाजिक संस्थांनी महत्त्वाची भूमिका बजावली पाहिजे आणि अन्नाचा अपव्यय कमी करण्याच्या पद्धतीं अंमलात  आणल्या पाहिजेत  यावरही त्यांनी  भर दिला. अन्नाची  नासाडी  हे केवळ ग्राहकांचेच  थेट नुकसान नाही तर त्याचा पर्यावरणावर आणि अर्थव्यवस्थेवरही परिणाम होतो, याकडे त्यांनी लक्ष  वेधले.

दक्षिण आशिया हा प्रमुख उत्पादक तसेच अन्नाचा ग्राहक आहे आणि अन्नाची नासाडी आणि अपव्यय कमी करणे ही आपली नैतिक जबाबदारी तसेच आर्थिक गरज आहे, असे शोभा करंदलाजे यांनी सांगितले.  अन्नाची नासाडी   आणि अपव्ययाची  प्राथमिक कारणे ओळखण्याचे तसेच  सर्व भागधारकांमध्ये शिक्षण आणि जागरूकता; परिणामकारक पीक उत्पादन  आणि साठवण; स्मार्ट वितरण; उद्योग सहभाग; अन्नदान  आणि अन्न बँका;अन्न पॅकेजिंग मध्ये नवोन्मेष आणि ग्राहक जबाबदारी इ.हे मुद्दे त्यांनी अधोरेखित केले. अन्न वाया घालवणे हा गुन्हा आहे यावर त्यांनी  भर दिला आणि आपल्या मुलांना अन्नाची नासाडी न करण्याचे महत्त्व शिकवण्याचे आवाहन त्यांनी केले.  ही तीन दिवसीय कार्यशाळा आपल्याला  अर्थपूर्ण धोरण तयार करण्याच्या दृष्टीने  योजना आखण्यात आणि एकत्रितपणे कार्य करण्यास मदत करेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.  

 

S.Kakade/S.Chavan/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1973131) Visitor Counter : 93