पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांच्या हस्ते सातव्या भारत मोबाईल काँग्रेस(आयएमसी) चे उद्‌घाटन


देशभरातील शैक्षणिक संस्थांना शंभर ‘5जी युज केस प्रयोगशाळां’ची देणगी दिली

उद्योगक्षेत्रातील आघाडीच्या व्यक्तींकडून पंतप्रधानांच्या दूरदृष्टीची प्रशंसा

“भविष्यकाळ येथेच आणि आत्ताच साकार झाला आहे”

“आपली तरुण पिढी तंत्रज्ञानविषयक क्रांतीचे नेतृत्व करत आहे”

“भारत केवळ 5जी नेटवर्कचा देशभरात विस्तार करत नसून 6जी च्या बाबतीत आघाडीवर राहण्यावर देखील अधिक भर देत आहे”

“प्रत्येक क्षेत्राच्या लोकशाहीकरणाच्या सामर्थ्यावर आमचा विश्वास आहे”

“भांडवल, साधनसंपत्ती आणि तंत्रज्ञान उपलब्ध होण्यातील सुलभता प्राप्त करून देणे याला आमच्या सरकारने प्राधान्य दिले आहे”

“भारताचे सेमीकंडक्टर अभियान केवळ देशांतर्गत मागणी पुरवण्यासाठीच नव्हे तर जागतिक गरजा पूर्ण करण्याच्या उद्देशासह प्रगती करत आहे”

“डिजिटल तंत्रज्ञानाच्या विकासाच्या बाबतीत भारत कोणत्याही विकसित राष्ट्रापेक्षा मागे नाही

“कोणत्याही देशाचे विकसनशील स्थितीमधून विकसित स्थितीकडे स्थित्यंतर होण्यात तंत्रज्ञान उत्प्रेरकाची भूमिका बजावते”

“21 वे शतक म्हणजे भारताच्या वैचारिक नेतृत्वाचे युग ठरते आहे”

Posted On: 27 OCT 2023 4:53PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 27 ऑक्टोबर 2023

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत भारत मंडपम येथे सातव्या भारत मोबाईल काँग्रेस 2023 संमेलनाचे उद्‌घाटन केले. भारत मोबाईल काँग्रेस (आयएमसी) या आशियातील सर्वात मोठ्या दूरसंचार, माध्यमे आणि तंत्रज्ञानविषयक मंचाचे ‘जागतिक डिजिटल नवोन्मेष’ या संकल्पनेवर आधारित संमेलन  27 ते 29 ऑक्टोबर 2023 या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. महत्त्वाच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील विकासक, उत्पादक आणि निर्यातक म्हणून भारताचे स्थान बळकट करणे हे या आयएमसी2023 च्या आयोजनाचे उद्दिष्ट आहे. या कार्यक्रमात पंतप्रधानांनी देशभरातील शैक्षणिक संस्थांना शंभर ‘5जी युज केस प्रयोगशाळां’ची देणगी दिली.

पंतप्रधानांनी दालन क्र.5 मधील प्रदर्शनाचे उद्घाटन देखील केले आणि प्रदर्शनाची पाहणी केली.

या कार्यक्रमात उद्योग क्षेत्रातील प्रमुख व्यक्तींनी देखील त्यांचे विचार मांडले. रिलायन्स जिओ इन्फोकॉम या कंपनीचे अध्यक्ष आकाश एम.अंबानी यांनी युवा पिढीमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याची सवय रुजवून त्यांचे जीवन सुधारणे आणि त्यायोगे भारताच्या सार्वजनिक क्षेत्रातील डिजिटल पायाभूत सुविधांना अधिक सामर्थ्य प्रदान करणे यासंदर्भातील पंतप्रधानांच्या वचनबद्धतेची प्रशंसा केली. डिजिटल इंडिया कार्यक्रमाला अधिक समावेशक, अभिनव आणि शाश्वत स्वरूप देण्यात देशातील लाखो युवकांसाठी पंतप्रधान मोठे प्रेरणास्थान  आहेत यावर त्यांनी बोलताना अधिक भर दिला. जिओ कंपनीने भारताच्या सर्व 22 परिमंडळांमध्ये एकंदर 10 लाख 5 जी सेल्स उभारली आहेत अशी माहिती त्यांनी दिली. यातून एकूण 5 जी वितरणाच्या 85 टक्के भागाचे योगदान कंपनी देत असून या 5 जी एककांची रचना, विकसन आणि उत्पादन भारतीय प्रतिभावंतांनी केले आहे. देशभरातील सव्वाशे दशलक्ष वापरकर्त्यांसह भारताचा समावेश जगभरातील पहिल्या तीन प्रमुख 5 जी तंत्रज्ञानाने सुसज्ज देशांमध्ये झाला आहे अशी माहिती आकाश अंबानी यांनी दिली.पंतप्रधान मोदी यांनी संपूर्ण भारताला एकत्र आणल्याची बाब अधोरेखित करत त्यांनी उदाहरणादाखल वस्तू आणि सेवा कर, भारतातील डिजिटल क्रांती आणि जगातील सर्वात उंच पुतळ्याची देशात उभारणी या बाबींचा उल्लेख केला. तुमचे प्रयत्न आम्हां सर्वांना या भारत मोबाईल काँग्रेसमध्ये प्रेरणा देत आहेत, याचा त्यांनी पुनरुच्चार केला. देशातील सर्व डिजिटल उद्योजक, अभिनव संशोधक तसेच स्टार्ट अप उद्योग यांच्या वतीने अंबानी यांनी देशाच्या अमृतकाळात भारताचे स्वप्न साकार करण्याची ग्वाही उपस्थितांना दिली.  

पंतप्रधान मोदी यांनी डिजिटल भारताच्या रुपात मांडलेल्या आणि ज्यामुळे देशातील डिजिटल पायाभूत सुविधा वाढत्या वेगाने विकसित झाल्या त्या संकल्पनेचे भारती एन्टरप्रायझेसचे अध्यक्ष सुनील भारती मित्तल यांनी पुन्हा स्मरण केले. पंतप्रधानांच्या जेएएम त्रिसूत्रीसंकल्पनेमुळे झालेले परिवर्तन तसेच भारतातील डिजिटल परिवर्तनाची जगणे घेतलेली नोंद या बाबी त्यांनी यावेळी अधोरेखित केल्या. ते म्हणाले की भारतातील डिजिटल पायाभूत सुविधा  (डीपीआय) जगातील अनेक देशांना हेवा वाटण्याचा  विषय आहे. पंतप्रधानांच्या दूरदृष्टीचे आणखी एक सशक्त उदाहरण म्हणजे मेक इन इंडिया उपक्रम असे सांगून मित्तल म्हणाले की, गेल्या एका वर्षातच उत्पादन क्षेत्राने कित्येक भराऱ्या घेतल्या आहेत. उत्पादन क्षेत्रात भारताची मुळे खोलवर रुजलेली आहेत. अॅपल ते डिक्सॉन, सॅमसंग ते टाटा अशा सर्व लहान मोठ्या कंपन्या आणि स्टार्ट अप उद्योग देशातील निर्मिती क्षेत्रात सहभागी आहेत आणि त्यामुळे भारत हा एक उत्पादक देश म्हणून उदयाला आला आहे. विशेषतः, मोठ्या प्रमाणातील डिजिटल पायाभूत सुविधा क्षेत्राच्या बाबतीत तर भारत जागतिक स्तरावरील आघाडीचा देश झाला आहे असे ते म्हणाले. देशभरातील 5000 लहान शहरे आणि 20,000 गावांमध्ये एअरटेलच्या 5 जी सेवेचा विस्तार यापूर्वीच झाला आहे  आणि येत्या मार्च 2024 पर्यंत संपूर्ण देशभरात या सेवेचा विस्तार होईल अशी माहिती देऊन मित्तल यांनी यासंदर्भात पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनाचा देखील उल्लेख केला. हा जगभरातील सर्वात वेगवान 5 जी सेवा विस्तार असेल असे ते म्हणाले.

आदित्य बिर्ला उद्योग समूहाचे अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला यांनी भारताच्या डिजिटल परिवर्तनामध्ये केलेल्या दृष्ट्या नेतृत्वाबद्दल पंतप्रधान मोदी यांचे आभार मानले आणि सर्वांना लाभदायक ठरणाऱ्या ‘अंत्योदय’ या तत्वावर आधारित डिजिटल समावेशनाप्रती पंतप्रधानांच्या वचनबद्धतेची प्रशंसा देखील केली.  डिजिटल उत्क्रांतीमध्ये भारताने केलेल्या विकासासाठी त्यांनी या दृष्टीकोनाला श्रेय दिले आणि याला जागतिक पातळीवर मान्यता मिळाली आहे असे सांगितले. पंतप्रधानांच्या दूरदृष्टीतून प्रेरणा घेऊन भारत ग्लोबल साउथ  कडील विजेता ठरला आहे, बिर्ला म्हणाले. ओळख निश्चिती, पैशांचे व्यवहार आणि माहितीचे व्यवस्थापन यांच्या संदर्भातील भारताच्या पथदर्शी सार्वजनिक पायाभूत सुविधांचा स्वीकार करण्यास अनेक देश उत्सुक आहेत ही बाब त्यांनी अधोरेखित केली.  पंतप्रधानांचे स्वप्न साकार करण्याच्या कामात व्होडाफोन आयडिया कंपनी एक जबाबदार भागीदाराची भूमिका बजावण्यास कटिबद्ध आहे याचा त्यांनी पुनरुच्चार केला. ते म्हणाले की पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली 6 जी सारख्या क्षेत्रांमध्ये भविष्यवादी तंत्रज्ञानाचे मापदंड विकसित करण्यात भारत सक्रियतेने सहभागी आहे याचा उल्लेख त्यांनी केला. सरकारने उद्योजकांना देऊ केलेल्या पाठबळाबद्दल बिर्ला यांनी सरकारचे आभार मानले.

यावेळी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की, 21 व्या शतकातील बदलत्या काळात, कोट्यवधी  लोकांची आयुष्ये बदलून टाकण्याचे सामर्थ्य अशा कार्यक्रमात आहे. तंत्रज्ञानाची जलदगती अधोरेखित करत पंतप्रधान म्हणाले, येथेच आणि हाच भविष्यकाळ आहे. या संमेलनात दूरसंचार, तंत्रज्ञान आणि संपर्क या क्षेत्रातील भविष्यकाळाची झलक दाखवणारे प्रदर्शन देखील भरवण्यात आले होते त्याचे पंतप्रधानांनी कौतुक केले. 6 जी, कृत्रिम बुद्धीमत्ता, सायबर सुरक्षा, सेमीकंडक्टर्स, ड्रोन आणि अवकाश क्षेत्र, खोल समुद्र, हरित तंत्रज्ञान तसेच इतर अनेक क्षेत्रांचा उल्लेख करून पंतप्रधान म्हणाले, भविष्यकाळ हा एकदमच वेगळा असणार आहे आणि आपली तरुण पिढी तंत्रज्ञानविषयक क्रांतीचे नेतृत्व करत आहे हे पाहणे अत्यंत आनंदाचे आहे.

गेल्या वर्षी भारतात सुरु करण्यात आलेल्या आणि उर्वरित जगासाठी एक आश्चर्य ठरलेल्या 5 जी सेवेचे स्मरण पंतप्रधान मोदी यांनी केले. 5 जी च्या यशानंतर भारत थांबला नाही तर हे तंत्रज्ञान देशातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवण्यासाठी सरकारने काम केले यावर पंतप्रधानांनी भर दिला. भारताने 5 जी तंत्रज्ञानाची सुरुवात ते या तंत्रज्ञानाचा सर्वत्र प्रसार असा प्रवास केला आहे,ते म्हणाले. 5 जी सेवेची सुरुवात झाल्यापासून एका वर्षातच देशात 4 लाख 5जी बेस स्टेशन्स विकसित करण्यात आली, यात 97 टक्क्याहून अधिक शहरे आणि 80% लोकसंख्येपर्यंत ही सेवा पोहोचवण्यात आली. एका वर्षभरात  मिडीयन मोबाईल ब्रॉडबॅंड सेवेचा वेग तिपटीने वाढला ही बाब त्यांनी अधोरेखित केली. पंतप्रधान पुढे म्हणाले की, ब्रॉडबॅंड सेवेच्या वेगाच्या बाबतीत भारताने 118व्या स्थानावरून आता 43व्या स्थानावर झेप घेतली आहे. भारत केवळ 5जी नेटवर्कचा देशभरात विस्तार करत नसून 6जी च्या बाबतीत आघाडीवर राहण्यावर देखील अधिक भर देत आहे, ते म्हणाले. 2 जी सेवेच्या काळात झालेल्या घोटाळ्याकडे निर्देश करत पंतप्रधान म्हणाले की सध्याच्या सरकारच्या कार्यकाळात सुरु झालेल्या 4 जी सेवेदरम्यान अशी कोणतीही घटना घडलेली नाही. 6 जी तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारत आघाडीवर राहील असा विश्वास देखील पंतप्रधानांनी व्यक्त केला.

  श्रेणी आणि क्रमांक यांच्याव्यतिरिक्त इंटरनेट कनेक्टिव्हिटी आणि गतीमधील सुधारणेमुळे राहणीमानात सुलभता येते, असे ते म्हणाले. शैक्षणिक, वैद्यकीय, पर्यटन आणि कृषी क्षेत्रात सुधारित संपर्क आणि गतीमुळे झालेल्या लाभांसंबंधी माहिती त्यांनी यावेळी दिली.

आमचा लोकशाहीकरणाच्या सामर्थ्यावर विश्वास आहे. विकासाचा लाभ प्रत्येक विभाग आणि प्रदेशापर्यंत पोहोचला पाहिजे, प्रत्येक नागरिकाला भारतातील संसाधनांचा लाभ झाला पाहिजे, प्रत्येकाला सन्मानाने जीवन जगता यायला हवे आणि तंत्रज्ञानाचा लाभ प्रत्येकापर्यंत पोहोचला पाहिजे. आम्ही या दिशेने वेगाने काम करत आहोत,असे  पंतप्रधानांनी सांगितले. "माझ्यामते हेच सर्वात मोठ्या सामाजिक न्यायाचे निदर्शक आहे", असे ही ते पुढे म्हणाले भांडवलाची,संसाधनांची आणि तंत्रज्ञानाची उपलब्धता ही आमच्या सरकारची प्राथमिकता आहे. मुद्रा योजनेंतर्गत विनातारण कर्जे, शौचालयांची उपलब्धता आणि जेएएम ट्रिनिटीद्वारे लाभार्थ्यांना थेट लाभ हस्तांतरण यांमध्ये एक गोष्ट सामाईक आहे ते म्हणजे सामान्य नागरिकांच्या पूर्वी दुर्लक्षित झालेल्या हक्कांसंबंधी खात्री देणे,हे  त्यांनी अधोरेखित केले. त्यांनी या संदर्भात दूरसंचार तंत्रज्ञानाच्या भूमिकेवर प्रकाश टाकला आणि सुमारे 2 लाख ग्रामपंचायती ब्रॉडबँडने जोडणाऱ्या,भारत नेटचा उल्लेख केला; ज्यायोगे 10,000 अटल टिंकरिंग लॅब्सद्वारे सुमारे 75 लाख मुलांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाची ओळख करून दिली जात आहे.आज सुरू करण्यात आलेल्या 5G वापराच्या प्रयोगशाळांमुळेही असाच परिणाम होईल,अशी आशा त्यांनी व्यक्त केली. "या प्रयोगशाळा तरुणांना मोठी स्वप्ने पाहण्यास प्रवृत्त करतात आणि ती पूर्ण करण्याचा आत्मविश्वास देतात", असेही ते पुढे म्हणाले.

गेल्या काही वर्षांत भारतातील स्टार्टअप वातावरणाने जगामध्ये स्वतःचे वैशिष्ट्यपूर्ण स्थान निर्माण केले आहे यावर पंतप्रधानांनी जोर दिला. भारताने अगदी कमी कालावधीत युनिकॉर्नचे शतक ओलांडले आहे आणि आता ते जगातील टॉप 3 स्टार्टअप परीसंस्थापैकी एक बनले आहे, अशी टिप्पणी मोदी यांनी केली. पंतप्रधान म्हणाले की,2014 पूर्वी, भारतात फक्त काही शेकड्यात स्टार्टअप्स होते, तर आज ही संख्या सुमारे एक लाखावर गेली आहे. पंतप्रधान मोदींनी देशातील स्टार्टअप्सना मार्गदर्शन करण्यासाठी इंडियन मोबाइल काँग्रेसच्या पुढाकाराने सुरू असलेल्या‘अ‍ॅस्पायर’ या उपक्रमाचाही उल्लेख केला आणि यामुळे भारतातील तरुणांना मोठा लाभ होईल असा विश्वास व्यक्त केला. भारताचा हा प्रवास लक्षणीय आहे, यावर त्यांनी जोर दिला. कालबाह्य तंत्रज्ञानामुळे आलेल्या अडचणींचे स्मरण करून पूर्वीच्या सरकारांची अवस्था अशीच होती याकडे मोदींनी लक्ष वेधले.जेथे कमांड कार्य करत नाहीत, अशा जुनाट मोबाईल उपकरणाशी साधर्म्य दाखवत पंतप्रधानांनी मागील सरकारांच्या कालबाह्य पद्धतींकडे लक्ष वेधले. " जेथे बॅटरी बदलणे किंवा सिस्टम रीस्टार्ट करणे व्यर्थ असते असे कालबाह्य तंत्रज्ञान वापरणे 2014 नंतर, लोकांनी बंद केले ", असे ते म्हणाले. भारत हा मोबाईल फोन्सची आयात करणारा एक देश होता आज तोच भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा मोबाईल उत्पादक देश बनला आहे याचे त्यांनी स्मरण करून दिले. पूर्वीच्या सरकारच्या काळात इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांच्या बाबतीत दूरदृष्टीचा अभाव होता हे लक्षात आणून देत मोदींनी सांगितले की, भारत आज देशात उत्पादित केलेल्या सुमारे 2 लाख कोटी रुपयांच्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची निर्यात करत आहे. भारतात गुगलमार्फत पिक्सेल फोन बनवण्याच्या नुकत्याच केलेल्या घोषणेवरही त्यांनी प्रकाश टाकला. "सॅमसंग फोल्ड फाइव्ह आणि ऍपल आयफोन 15 येथे काळाच्या आधीच तयार केले जात आहेत",असेही त्यांनी पुढे नमूद केले.

मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनातील या यशाला आणखी पुढे नेण्याची गरज पंतप्रधानांनी व्यक्त केली. टेक इकोसिस्टममधील हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर या दोन्हींच्या यशस्वितेसाठी, भारतामध्ये एक मजबूत सेमीकंडक्टर उत्पादन क्षेत्र तयार करणे आपल्या दृष्टीने महत्त्वाचे आहे, सेमीकंडक्टरच्या विकासासाठी 80 हजार कोटी रुपयांची उत्पादन लिंक्स प्रोत्साहन (PLI) योजना सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. आज जगभरातील सेमीकंडक्टर कंपन्या भारतीय कंपन्यांच्या सहकार्याने सेमीकंडक्टर असेंब्ली आणि चाचणी सुविधांमध्ये गुंतवणूक करत आहेत. भारताचे सेमीकंडक्टर मिशन केवळ देशांतर्गत मागणीच नाही तर जगाच्या गरजाही पूर्ण करण्याच्या दृष्टीकोनातून पुढे जात आहे, असेही ते म्हणाले.

विकसनशील राष्ट्राला विकसित बनवणाऱ्या घटकांमध्ये तंत्रज्ञानाला असलेले प्राधान्य अधोरेखित करून पंतप्रधान म्हणाले की, डिजिटल तंत्रज्ञानाच्या विकासात भारत कोणत्याही विकसित राष्ट्रापेक्षा मागे नाही. विविध क्षेत्रांना तंत्रज्ञानाशी जोडण्याच्या उपक्रमांची यादी करताना, पंतप्रधानांनी लॉजिस्टिक्समधील पीएम गतिशक्ती, आरोग्य क्षेत्रातील राष्ट्रीय आरोग्य अभियान आणि कृषी क्षेत्रातील कृषी स्टॅक सारख्या मोहिमांचा उल्लेख केला. त्यांनी वैज्ञानिक संशोधन, क्वांटम मिशन आणि नॅशनल रिसर्च फाउंडेशन आणि स्वदेशी डिझाईन्स आणि तंत्रज्ञान विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी होत असलेल्या मोठ्या गुंतवणुकींचाही  उल्लेख आपल्या भाषणात केला.

पंतप्रधान मोदींनी सायबर सुरक्षा आणि नेटवर्क यंत्रणेच्या पायाभूत सुविधांच्या सुरक्षिततेच्या महत्त्वाच्या पैलूंकडे लक्ष वेधले आणि G20 शिखर परिषदेत ‘सायबर सुरक्षेचे जागतिक धोके’ या विषयावर झालेल्या चर्चेचे स्मरण करून दिले. संपूर्ण उत्पादन मूल्य साखळीमध्ये आत्मनिर्भरता हे सायबर सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे हे लक्षात घेऊन पंतप्रधानांनी अधोरेखित केले की जेव्हा मूल्य साखळीतील प्रत्येक गोष्ट राष्ट्रीय डोमेनशी संबंधित असते, मग ती हार्डवेअर, सॉफ्टवेअर किंवा कनेक्टिव्हिटी असो, तेव्हा सुरक्षितता राखणे सोपे होते. जगातील सर्व लोकशाही समाज सुरक्षित ठेवण्यासाठी इंडिया मोबाईल काँग्रेसमध्ये चर्चा करण्याची गरज मोदींनी आपल्या भाषणात व्यक्त केली.

नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याच्या संधी भूतकाळात गमावल्या असल्याबद्दल पंतप्रधानांनी खंत  व्यक्त केली. भारताने विकसित तंत्रज्ञानामध्ये आपली प्रतिभा आधीच सिध्द करून दाखवली आहे, असे सांगत त्यांनी भारताच्या आयटी क्षेत्रातील वैशिष्ट्यपूर्ण कामगिरीचा उल्लेख यावेळी केला. 21 व्या शतकाचा हा काळ हा भारताच्या वैचारिक नेतृत्वाचा काळ आहे,यावर भर देत मोदींनी प्रतिभावान वैचारीक नेत्यांना इतरांना अनुसरता येतील असे नवीन डोमेन तयार करण्याचे आवाहन केले.त्यांनी यासाठी UPI चे उदाहरण दिले जे आज डिजिटल पेमेंट सिस्टममध्ये संपूर्ण जगाचे नेतृत्व करत आहे. "भारताकडे क्रियाशील युवावर्ग आणि चैतन्यशील लोकशाहीची शक्ती आहे", असे पंतप्रधानांनी अभिमानाने यावेळी सांगितले. इंडिया मोबाईल काँग्रेसच्या सदस्यांना, विशेषत: तरुण सदस्यांना या दिशेने पुढे जाण्याचे आवाहन त्यांनी केले. आज, जेव्हा आपण विकसित भारत बनविण्याचे ध्येय साकार करत आहोत, तेव्हा विचारवंत म्हणून अग्रेसर रहाणे संपूर्ण क्षेत्रात क्रांतिकारी बदल घडवून आणून संक्रमण करु शकते, असे  सांगत पंतप्रधानांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.

केंद्रीय दळणवळण मंत्री अश्विनी वैष्णव, केंद्रीय दळणवळण राज्यमंत्री  देवुसिंह चौहान, रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेडचे​​अध्यक्ष आकाश एम अंबानी, भारती एंटरप्रायझेसचे अध्यक्ष सुनील भारती मित्तल आणि आदित्य बिर्ला समूहाचे अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला आदी या कार्यक्रमाला उपस्थित होते.

पार्श्वभूमी

‘शंभर 5G लॅब इनिशिएटिव्ह’ हा 5G ऍप्लिकेशन्सच्या विकासाला प्रोत्साहन देत भारताच्या अनन्यसाधारण गरजा तसेच जागतिक मागणी या दोहोंची पूर्तता करणार्‍या 5G तंत्रज्ञानाशी निगडीत, संधींची उपयुक्तता सिद्ध करून देण्याचा एक वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम आहे. हा अनोखा उपक्रम शिक्षण, कृषी, आरोग्य, ऊर्जा, वाहतूक इत्यादी विविध सामाजिक-आर्थिक क्षेत्रांमध्ये नवकल्पनांना चालना देईल आणि 5G तंत्रज्ञानाच्या वापरात देशाला आघाडीवर घेऊन जाईल. देशातील 6G- शैक्षणिक आणि स्टार्ट-अप इकोसिस्टम तयार करण्यासाठी हा उपक्रम एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. महत्त्वाचे म्हणजे, राष्ट्रीय सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या स्वदेशी दूरसंचार तंत्रज्ञानाच्या विकासासाठी हा उपक्रम म्हणजे एक महत्वपूर्ण पाऊल आहे.

इंडिया मोबाईल काँग्रेस (IMC) हा आशियातील सर्वात मोठा दूरसंचार, माध्यम आणि तंत्रज्ञान मंच आहे आणि 27 ते 29 ऑक्टोबर 2023 या कालावधीत आयोजित होणारा हा उपक्रम दूरसंचार आणि तंत्रज्ञानातील भारताच्या अतुलनीय प्रगतीवर प्रकाश टाकण्यासाठी, महत्त्वपूर्ण असून महत्वाच्या घोषणा करण्यासाठी आणि स्टार्ट-अप्सना त्यांची नाविन्यपूर्ण उत्पादने आणि उपाय प्रदर्शित करण्याची संधी प्रदान करण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून काम करेल.

'जागतिक डिजिटल नवोन्मेष (ग्लोबल डिजिटल इनोव्हेशन') या संकल्पनेसह,इंडिया मोबाईल काँग्रेस 2023 हा उपक्रम प्रमुख अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा विकासक, निर्माता आणि निर्यातक म्हणून भारताचे स्थान मजबूत करण्यासाठी आयोजित केलेला एक उपक्रम आहे. तीन दिवस चालणाऱ्या या परिषदेत 5G, 6G आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) या सारख्या तंत्रज्ञानावर प्रकाश टाकण्यात येईल तसेच सेमीकंडक्टर उद्योग, हरित तंत्रज्ञान, सायबर सुरक्षा इत्यादींशी संबंधित समस्यांवर चर्चा होतील.

या वर्षी,आयएमसी (IMC)- ‘Aspire’ या नावाचा एक स्टार्टअप कार्यक्रम सादर करत आहे.हे स्टार्टअप्स, गुंतवणूकदार आणि प्रस्थापित व्यावसायिक यांच्यातील संबंधांना प्रोत्साहन देईल जेणेकरून नवीन उद्योजक उपक्रम आणि सहयोगांना प्रोत्साहन मिळेल.

आयएमसी 2023 मध्ये सुमारे 22 देशांतील 5000 प्रमुख कार्यकारी अधिकारी (CEO) स्तरावरील प्रतिनिधी, 230 प्रदर्शक, 400 स्टार्टअप आणि इतर भागधारकांसह एक लाखाहून अधिक हितसंबंधित सहभागी होणार आहेत.

 

N.Chitale/Sanjana/Sampada/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1972034) Visitor Counter : 181