सहकार मंत्रालय

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री, अमित शाह यांनी आज नवी दिल्लीत भारतीय बीज सहकारी समिती लिमिटेड (बीबीएसएसएल) द्वारे आयोजित "सहकार क्षेत्राद्वारे सुधारित आणि पारंपरिक बियाणे उत्पादनावरील राष्ट्रीय परिसंवाद" ला केले संबोधित


बीबीएसएसएलचे बोधचिन्ह, संकेतस्थळ आणि माहितीपत्रकाचे केले अनावरण आणि बीबीएसएसएलच्या सदस्यांना सदस्यत्व प्रमाणपत्रे केली प्रदान

‘बीबीएसएसएल’चा नफा थेट बियाणे उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात होणार वर्ग

जागतिक बियाणे बाजारपेठेत भारताला मोठा भागीदार बनविण्‍यासाठी आमचा कालबद्ध कार्यक्रम

Posted On: 26 OCT 2023 7:58PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 26 ऑक्टोबर 2023

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री, अमित शाह यांनी आज नवी दिल्ली येथे भारतीय बीज सहकारी समिती लिमिटेड (बीबीएसएसएल) द्वारे आयोजित "सहकार क्षेत्राद्वारे सुधारित आणि पारंपरिक बियाणे उत्पादनावरील राष्ट्रीय परिसंवादाला" संबोधित केले.

अमित शाह यांनी बीबीएसएसएल च्या बोधचिन्ह, संकेतस्थळ आणि माहितीपत्रकाचे अनावरण केले आणि बीबीएसएसएल च्या सदस्यांना सदस्यत्व प्रमाणपत्रे प्रदान केली. यावेळी केंद्रीय सहकार राज्यमंत्री बीएल वर्मा, सहकार मंत्रालयाचे सचिव आणि कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालयाचे सचिव यांच्यासह अनेक मान्यवर देखील यावेळी उपस्थित होते.

आपल्या भाषणात अमित शाह म्हणाले की, आजचा दिवस देशातील सहकारी चळवळ, शेतकरी कल्याण आणि अन्न उत्पादन क्षेत्रात नवीन श्रीगणेशा करण्याच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे. शाह म्हणाले की, भारत हा जगातील अशा काही देशांपैकी एक आहे जिथे शेती नियोजनबद्धरित्या सुरू करण्यात आली आहे आणि म्हणूनच आपले पारंपरिक बियाणे गुणवत्ता आणि शारीरिक पोषणासाठी सर्वात योग्य आहेत. ते म्हणाले की, पारंपरिक भारतीय वाणांचे संवर्धन करून ते भावी पिढ्यांपर्यंत पोहोचवावे, जेणेकरून पौष्टिक धान्य, फळे आणि भाजीपाला यांचे उत्पादन सुरू राहावे आणि हे काम बीबीएसएसएलमार्फत केले जाईल. शाह म्हणाले की, जगात बियाणांच्या निर्यातीसाठी मोठी बाजारपेठ आहे आणि त्यात भारताचा वाटा एक टक्‍क्‍यांपेक्षा कमी आहे, भारतासारख्या विशाल आणि कृषीप्रधान देशाला जागतिक बियाणे बाजारात मोठा वाटा मिळावा यासाठी कालबद्ध उद्दिष्ट निश्चित केले पाहिजे. ते पुढे म्हणाले की, मोदी सरकारने भारतीय बीज सहकारी समिती लिमिटेडची स्थापना या पाच उद्दिष्टांसह केली असून काही वर्षात या समितीला जगभरात ओळख मिळेल आणि देशातील शेतकऱ्यांना प्रमाणित वाण उपलब्ध करून देण्यात मोठे योगदान दिले जाईल.

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री म्हणाले की, इफ्को, कृभको, नाफेड, एनडीडीबी आणि एनसीडीसी यांचा या संस्थेच्या गाभ्यामध्ये समावेश करण्यात आला आहे, एक प्रकारे त्यांना शेतकऱ्यांच्या शेतात प्रवेश मिळाला आहे. या संस्थांच्या माध्यमातून पुनरावृत्ती रोखली जाऊन सर्व सहकारी संस्था एकाच मार्गाच्या नकाशावर समान ध्येय ठेवून एकाच दिशेने काम करतील.

देशातील तीन प्रमुख सहकारी संस्था - इंडियन फार्मर्स फर्टीलायझर कोऑपरेटिव्ह लिमिटेड ( इफ्को), कृषक भारती कोऑपरेटिव्ह लिमिटेड (कृभको) आणि नॅशनल अॅग्रिकल्चरल कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया (नाफेड) आणि भारत सरकारच्या दोन प्रमुख वैधानिक संस्था - राष्ट्रीय दुग्धविकास बोर्ड (एनडीडीबी) आणि राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ (एनसीडीसी) यांनी संयुक्तपणे बीबीएसएसएल ला प्रोत्साहन दिले आहे.

 

 S.Bedekar/V.Joshi/P.Malandkar

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 



(Release ID: 1971681) Visitor Counter : 94