महिला आणि बालविकास मंत्रालय
प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेवरील राष्ट्रीय कार्यक्रम उद्या मुंबईत होणार
मातृत्वाला वंदन : प्रधानमंत्री मातृ वंदना योजना
प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेवरील (पीएमएमव्हीवाय) माहिती पुस्तिका', 'नवीन पोर्टल आणि मोबाइल ॲप' चा प्रारंभ, पीएमएमव्हीवाय अतंर्गत प्रथमच दुसऱ्या मुलीसाठी लाभाचे हस्तांतरण आणि देशभरातील लाभार्थ्यांना 'थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी)' ही कार्यक्रमाची ठळक वैशिष्ट्ये
Posted On:
26 OCT 2023 3:03PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 26 ऑक्टोबर 2023
प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेवरील (पीएमएमव्हीवाय) राष्ट्रीय कार्यक्रम उद्या (27 ऑक्टोबर 2023) महाराष्ट्रात मुंबई येथील यशवंतराव चव्हाण केंद्रात होणार आहे. हा कार्यक्रम दोन सत्रांमध्ये होईल. याची सुरुवात कार्यशाळा सत्राने होईल. त्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे आणि केंद्रीय महिला व बाल विकास आणि अल्पसंख्याक व्यवहार मंत्री स्मृती झुबिन इराणी यांच्या अध्यक्षतेखाली उद्धाटन सत्र होईल. केंद्रीय महिला आणि बाल विकास आणि आयुष राज्यमंत्री डॉ. मुंजपारा महेंद्रभाई, महाराष्ट्राचे सार्वजनिक आरोग्य विभागमंत्री तानाजी सावंत, महिला आणि बाल विकास मंत्री अदिती सुनील तटकरे आणि आमदार आशिष शेलार यावेळी उपस्थित राहतील. केन्द्र सरकारच्या महिला आणि बाल विकास मंत्रालयाचे सचिव तसेच केन्द्र सरकार आणि विविध राज्य सरकारे, केंद्रशासित प्रदेश प्रशासनातील इतर वरिष्ठ अधिकारी या कार्यक्रमात सहभागी होतील. या कार्यक्रमाला महिला पर्यवेक्षक, अंगणवाडी सेविका आणि आशा सेविकांसह आघाडीवर राहून काम करणाऱ्या कार्यकर्त्या देखील उपस्थित राहणार आहेत.
हा कार्यक्रम पीएमएमव्हीवायच्या महत्त्वपूर्ण पैलू आणि उद्दीष्टप्राप्ती, त्याचा प्रवास तसेच पीएमएमव्हीवाय पोर्टल आणि मोबाईल अॅपची वैशिष्ट्ये यावर प्रकाश टाकेल. 'डिजिटल इंडिया', 'मेक इन इंडिया' आणि 'आत्मनिर्भर भारत' ला प्रोत्साहन देण्याच्या पंतप्रधानांच्या संकल्पनेनुसार, नवीन पीएमएमव्हीवाय पोर्टल (PMMVYsoft MIS) विकसित करण्यात आले आहे. या पोर्टलमध्ये पात्र लाभार्थ्यांची योग्य पडताळणी करण्यासाठी युआयडीएआय द्वारे ‘ऑनलाइन आणि चेहऱ्यावरून ओळख पटवणारे तंत्रज्ञान, फेस ऑथेंटिकेशन टेक्नॉलॉजी’ यासारख्या नवीन वैशिष्ट्यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, थेट लाभ हस्तांतरणाद्वारे (डीबीटी) सुरळीत निधी हस्तांतरण सुनिश्चित करण्यासाठी लाभार्थी बँक खात्यांचे एनपीसीआय सत्यापन समाविष्ट करते. याशिवाय, लाभार्थी आणि अंगणवाडी/आशा सेविकांसाठी पोर्टलद्वारे थेट नोंदणी करण्यासाठी कागदविरहीत ऑनलाइन नोंदणी प्रणालीची सुविधा उपलब्ध करते.
या कार्यक्रमात नवीन पीएमएमव्हीवाय पोर्टल (PMMVYsoft MIS) साठी नागरिक, क्षेत्रीय कार्यकर्ते, पर्यवेक्षक, प्राधिकृत अधिकारी, जिल्हा नोडल अधिकारी आणि राज्य नोडल अधिकारी यांच्यासह विविध घटकांसाठी सर्वसमावेशक माहिती पुस्तिकेचे प्रकाशन देखील केले जाईल.
प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेची (पीएमएमव्हीवाय) सुरुवात 1 जानेवारी 2017 रोजी झाली. 1 एप्रिल 2022 पासून सुधारित आणि मिशन शक्तीचा एक घटक म्हणून तिला पीएमएमव्हीवायचा दुसरा टप्पा (2.0) म्हणून समाविष्ट करण्यात आले. गर्भावस्थेच्या काळादरम्यान, वेतन नुकसानाच्या आंशिक भरपाईसाठी रोख प्रोत्साहन प्रदान करणे, स्त्रियांना बाळाच्या जन्मापूर्वी आणि नंतर पुरेशी विश्रांती घेता यावी; गरोदर स्त्रिया आणि स्तनदा माता (पीडब्ल्यू अँड एलएम) यांच्यामध्ये आरोग्यदायक वर्तन सुधारणे हा या योजनेचा प्राथमिक उद्देश आहे.
आपल्या देशाच्या एकूण लोकसंख्ये पैकी 70% पेक्षा जास्त महिला आणि मुले आहेत. शाश्वत आणि न्याय्य राष्ट्रीय प्रगतीला चालना देण्यासाठी त्यांचे सक्षमीकरण, संरक्षण आणि सर्वांगीण विकास सुनिश्चित करणे आवश्यक आहे. पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली गेल्या नऊ वर्षांत महिला आणि बाल विकास मंत्रालय आपली ध्येय उद्दिष्टे साध्य करण्यासाठी समर्पितपणाने काम करत आहे:
(i) सर्वसमावेशक धोरणे आणि कार्यक्रमांद्वारे महिलांच्या सामाजिक आणि आर्थिक सक्षमीकरणाला चालना देणे, स्त्रियांना मुख्य प्रवाहात आणणे, जागरूकता निर्माण करणे आणि महिलांना त्यांच्या मानवी हक्कांचा वापर करण्यास तसेच त्यांच्या पूर्ण क्षमतेपर्यंत पोहोचण्यास सक्षम करण्यासाठी संस्थात्मक आणि कायदेविषयक समर्थन सुलभ करणे.
(ii) जागरूकता वाढवणाऱ्या आणि शिक्षण, पोषण, संस्थात्मक आणि कायदेशीर समर्थनासाठी प्रवेश सुलभ करणाऱ्या, त्यांची वाढ आणि पूर्ण क्षमता वाढवणाऱ्या एकात्मिक धोरणे आणि कार्यक्रमांद्वारे मुलांचा विकास, काळजी आणि संरक्षण सुनिश्चित करणे.
पीएमएमव्हीवाय 2.0 ची उल्लेखनीय बाब म्हणजे मुलीच्या जन्मासाठी प्रोत्साहन देऊन मुलींबद्दल अधिक सकारात्मक सामाजिक वृत्ती वाढवण्याची तिची वचनबद्धता. सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या वंचित पार्श्वभूमीतून येणाऱ्या महिलांसाठी, पीएमएमव्हीवाय 5,000/- रुपयांचा मातृत्व लाभ दोन हप्त्यात प्रदान करते. दुसरे बाळ मुलगी असेल तरी या योजनेचा लाभ आता घेता येईल. या सुधारित नियमानुसार आईला दुसऱ्या मुलीच्या जन्मानंतर एका हप्त्यात 6,000 रुपयांची प्रोत्साहनपर रक्कम मिळू शकते. यामुळे स्त्री भ्रूण हत्येला परावृत्त करून आणि श्रमशक्तीचा सहभाग वाढवून जन्मावेळी लिंग गुणोत्तर सुधारण्यास हातभार लागेल. याव्यतिरिक्त, वेळेवर लसीकरण, बाळंतपणाची नोंदणी आणि संस्थात्मक जन्मासाठी नोंदणी करण्यास ही योजना प्रोत्साहन देते.
योजनेच्या सुरुवातीपासून 3.11 कोटींहून अधिक लाभार्थींना एकूण रुपये 14,103 कोटींहून अधिक आर्थिक सहाय्य देण्यात आले आहे. पीएमएमव्हीवाय पोर्टल आणि मोबाइल अॅप थेट लाभ हस्तांतरणाद्वारे (डीबीटी) सुरळीत निधी हस्तांतरण सुनिश्चित करण्यासाठी नागरिक-अनुकूलतेस प्राधान्य देऊन तांत्रिक उत्कृष्टता प्रदान करण्यासाठी वचनबद्ध आहे.
S.Tupe/V.Ghode/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1971436)
Visitor Counter : 215