पर्यावरण, वन एवं जलवायु परिवर्तन मंत्रालय

जंगलातील वणवे आणि वनांचे प्रमाणीकरण विषयावर चर्चेसाठी संयुक्त राष्ट्रांच्या वनविषयक आघाडीच्‍या बैठकीचे भारतामध्‍ये आयोजन

Posted On: 25 OCT 2023 4:45PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 25 ऑक्टोबर 2023


केंद्रीय वने, पर्यावरण आणि हवामान बदल मंत्रालयाने उत्तराखंड मध्ये डेहराडून मधील वन संशोधन संस्था (FRI) येथे 26-28 ऑक्टोबर, 2023 दरम्यान राष्ट्र प्रणित उपक्रमाअंतर्गत वनांवरील संयुक्त राष्ट्रांच्या मंचाचा भाग म्हणून एका  बैठकीचे आयोजन केले आहे. वनांवरील संयुक्त राष्ट्रांचा मंच हा सर्व प्रकारच्या जंगलांचे व्यवस्थापन, संवर्धन आणि शाश्वत विकासाला प्रोत्साहन देतो. भारताला यू एन एफ एफ चा संस्थापक सदस्य होण्याचा  बहुमान मिळाला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेने वर्ष 2017-2030 या कालावधीसाठी पहिल्यांदाच संयुक्त राष्ट्रांची जंगलांविषयक  धोरणात्मक योजना स्वीकारली आहे. सर्व प्रकारच्या जंगलांचे शाश्वत व्यवस्थापन करण्याकरता ही धोरणात्मक योजना प्रत्येक स्तरावर एक जागतिक आराखडा म्हणून कार्य करते  ज्यामध्ये जंगलाबाहेरील झाडांचा देखील समावेश आहे तसेच जंगलतोड आणि जंगलाचा ऱ्हास यांचा सामना करण्यासाठी देखील ती मार्गदर्शक आहे.

यासंदर्भातील औपचारिक बैठकीला 26 ऑक्टोबर 2023 रोजी प्रारंभ होईल. यामध्ये दोन दिवसांच्या बैठकीत  परिसंवाद आणि जंगलातील वणवे आणि जंगलांचे प्रमाणीकरण या दोन मार्गदर्शक संकल्पनांवर माहितीचे आदानप्रदान होणे अपेक्षित आहे तसेच या अंतर्गत एक दिवसाची ‘फील्ड ट्रिप’  अर्थात अभ्यास सहल देखील असेल. गेल्या काही वर्षांपासून जगाने जंगलातील वणव्यांचे वाढते प्रमाण आणि त्याचा धुमसत राहण्याचा वाढता कालावधी याबाबतची धोक्याची घंटा ऐकली आहे ज्यामुळे जैवविविधता, परिसंस्थेचे चलनवलन, मानवी जीवन, उपजीविकेची साधने आणि राष्ट्रांच्या अर्थव्यवस्थांवर विपरीत परिणाम होत आहे.

अलिकडच्या वर्षांत वन प्रमाणीकरणाचा  समस्येकडे जागतिक लक्ष वेधले गेले आहे. 2010 पासून प्रमाणीकरणाखालील एकूण वनक्षेत्र 35% (किंवा 120 दशलक्ष हेक्टर) वाढले आहे. तर 2020 ते 2021 दरम्यान, प्रमाणित वनक्षेत्रात 27 दशलक्ष हेक्टरने वाढ झाली आहे. प्रमाणीकरण प्रक्रियेत विकसित राष्ट्रांना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागत आहे.

या बैठकांमध्ये सहभागी होणाऱ्या राष्ट्रांमध्ये अशा अनेक ज्वलंत मुद्द्यांवर विचारमंथन होईल. यात 40 हून अधिक देश आणि 20 आंतरराष्ट्रीय संस्थांमधून वैयक्तिक आणि ऑनलाइन पद्धतीने 80 हून अधिक प्रतिनिधी सहभागी होतील. या बैठकीमधून अंमलबजावणी आराखडा आणि जंगलातील वणवे तसेच जंगलांचे प्रमाणीकरण याविषयीच्या शिफारसी प्राप्त होतील ज्यामुळे शाश्वत वन व्यवस्थापनाला प्रोत्साहन मिळेल. या मुद्द्यांवर न्यूयॉर्क येथे संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात मे 2024 मध्ये होणाऱ्या  यूएन एफ एफ च्या नियोजित 19 व्या सत्रात चर्चेसाठी विचार केला जाईल.

S.Bedekar/B.Sontakke/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1970893) Visitor Counter : 127