सहकार मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी नवी दिल्लीत आज नॅशनल कोऑपरेटिव्ह एक्सपोर्ट्स लिमिटेडद्वारे (एनसीईएल) आयोजित 'सहकार निर्यातीवरील राष्ट्रीय परिसंवाद' ला केले संबोधित आणि एनसीईएलचे बोधचिन्ह, संकेतस्थळ आणि माहिती पुस्तिका देखील केली प्रकाशित आणि एनसीईएल सदस्यांना सदस्यता प्रमाणपत्रे केली वितरित


नॅशनल कोऑपरेटिव्ह एक्स्पोर्ट लिमिटेडच्या माध्यमातून किमान 50%निर्यात नफा शेतकऱ्यांना मिळेल

मोदी सरकार निर्यात वाढवण्याच्या दिशेने कार्यरत तसेच शेतकऱ्यांपर्यंत त्यांचे फायदे पोहोचवण्यासाठी एक सुरळीत व्यवस्था निर्माण करत आहे

Posted On: 23 OCT 2023 6:44PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 23 ऑक्‍टोबर 2023

 

केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी  आज नवी दिल्लीत नॅशनल कोऑपरेटिव्ह एक्सपोर्ट्स लिमिटेडद्वारे (एनसीईएल) आयोजित 'सहकार निर्यातीवरील राष्ट्रीय परिसंवाद' ला संबोधित  केले.

शहा यांनी एनसीईएलचे बोधचिन्ह, संकेतस्थळ आणि माहिती पुस्तिका देखील प्रकाशित केली आणि एनसीईएल सदस्यांना सदस्यता प्रमाणपत्रे वितरित केली. यावेळी केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री   पीयूष गोयल आणि केंद्रीय सहकार राज्यमंत्री   बी एल वर्मा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

आज महानवमीच्या शुभ दिवशी नॅशनल कोऑपरेटिव्ह एक्सपोर्ट लिमिटेडची औपचारिक सुरुवात होत आहे, असे अमित शाह यांनी आपल्या भाषणात सांगितले. आज आपण ' सहकारातून  समृद्धीचे स्वप्न साकार करण्याच्या मार्गावर एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा पार करत आहोत, यासाठी  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच सहकार मंत्रालयाची स्थापना केली , असे ते म्हणाले. नॅशनल कोऑपरेटिव्ह एक्सपोर्ट लिमिटेड ची स्थापना विविध उद्दिष्टे लक्षात घेऊन बराच विचारविनिमय केल्यानंतर करण्यात आली.   निर्यात वाढवणे, विशेषत: कृषी निर्यात वाढवणे , शेतकरी समृद्ध करणे, पीक पद्धती बदलणे आणि 2027 पर्यंत देशातील 2 कोटी शेतकऱ्यांना त्यांची जमीन नैसर्गिक शेतीची म्हणून घोषित करण्यास सक्षम करणे. ही एनसीईएलच्या स्थापनेमागील आपली  उद्दिष्टे आहेत , असे शहा यांनी सांगितले

पंतप्रधान मोदी यांनी देशात नैसर्गिक शेतीला चालना देण्यासाठी अनेक उपक्रम हाती घेतले आहेत,  पंतप्रधान मोदी यांनी  बहुराज्य सहकारी संस्थांची  स्थापना केली आहे, यामुळे  जी भारतातील 2 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या  सेंद्रिय उत्पादनांची  चांगल्या पॅकेजिंग, विश्वासार्ह ब्रँडिंग आणि उच्च दर्जाच्या प्रामाणिकरणासह  जागतिक बाजारपेठेत विक्री होऊ शकेल असे ते म्हणाले.  यामुळे शेतकर्‍यांना त्यांच्या सेंद्रिय उत्पादनांना सध्या जेवढे भाव मिळत आहेत त्या तुलनेत त्यांना थेट दीड ते दोन पट भाव मिळेल आणि त्यामुळे शेतकर्‍यांच्या समृद्धीचा मार्ग खुला होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

जैवइंधन आघाडीची घोषणा पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांनी केली आहे.  भारत हा एकमेव देश आहे जिथे एकाच वेळी 4 पिके घेतली जाऊ शकतात आणि जर यापैकी एक पिक देखील जैवइंधनासाठी वापरता आले तर आपण भारताची जैवइंधनाची गरज भागवू शकतो आणि त्याची निर्यातही करू शकतो,  केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री म्हणाले. एनसीईएलच्या स्थापनेचा आणखी एक उद्देश म्हणजे देशातील ग्रामीण भाग आणि शेतीवर अवलंबून असलेल्या लोकसंख्येसह सहकारी क्षेत्र बळकट करणे हा आहे, असे शहा यांनी सांगितले. ग्रामीण भागातील कृषी उत्पादने आणि अन्य उत्पादने देशाच्या जीडीपीमध्ये 15 टक्के योगदान देतात तर एकूण लोकसंख्येच्या 60 टक्के लोक त्यांच्यावर अवलंबून आहेत.  कोणताही देश आपल्या 60 टक्के लोकसंख्येकडे दुर्लक्ष करून आपली अर्थव्यवस्था भक्कम  करू शकत नाही आणि ज्या देशाच्या 60 टक्के लोकसंख्येला स्थान नाही ती अर्थव्यवस्था कधीही यशस्वी होऊ शकत नाही, असे शहा यांनी सांगितले. मोदी सरकार या 60 टक्के लोकांना रोजगार देऊन समृद्धी सुनिश्चित करताना जीडीपी वाढवण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्यासाठी सहकार क्षेत्र बळकट  करणे हा एकमेव मार्ग आहे.   नॅशनल कोऑपरेटिव्ह एक्सपोर्ट लिमिटेड देशातील संपूर्ण सहकारी संरचना मजबूत करण्यासाठी देखील काम करेल, असे अमित शहा यांनी सांगितले.

  

निर्यात वाढवणे, शेतकरी समृद्ध करणे, पीक पद्धतीत बदल करणे, सेंद्रिय उत्पादनांना जागतिक बाजारपेठ उपलब्ध करून देणे, जैवइंधनाच्या जागतिक बाजारपेठेत भारताला स्थान मिळवून देणे आणि सहकार क्षेत्राला बळकट करणे या 6 उद्दिष्टांसह एनसीईएल सहकार क्षेत्रात सुरू करण्यात आली आहे.या नव्या प्रारंभासह ही  सहकारी संस्था शेतकरी आणि दुग्धजन्य पदार्थ, इसबगोल (सायलियम), जिरे, इथेनॉल आणि विविध सेंद्रिय उत्पादनांची जागतिक मागणी यांच्यातील दुवा म्हणून काम करेल.आतापर्यंत सुमारे 1500 सहकारी संस्था  एनसीयेईलच्या  सभासद झाल्या  असून आगामी काळात प्रत्येक तालुका त्यात सहभागी होऊन शेतकऱ्यांचा आवाज बनेल अशी अपेक्षा आहे, असे अमित शहा यांनी यावेळी सांगितले.

नॅशनल कोऑपरेटिव्ह एक्स्पोर्ट लिमिटेडच्या माध्यमातून किमान 50 टक्के निर्यात नफा शेतकऱ्यांना मिळेल असा विश्वास व्यक्त करत मोदी सरकार निर्यात वाढवण्याच्या दिशेने कार्यरत आहे तसेच  शेतकऱ्यांपर्यंत त्यांचे  फायदे पोहोचवण्यासाठी एक सुरळीत व्यवस्था निर्माण करत आहे असे त्यांनी सांगितले.

 

* * *

G.Chippalkatti/S.Chavan/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1970213) Visitor Counter : 152