पंतप्रधान कार्यालय

मध्यप्रदेशात ग्वाल्हेर इथे ‘द सिंधीया स्कूल’च्या 125 व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पंतप्रधानांनी केले मार्गदर्शन


शाळेतील बहुउद्देशीय क्रीडा संकुलाची पायाभरणी

सिंधीया स्कूलच्या 125 व्या स्थापना दिनाच्या स्मरणार्थ पंतप्रधानांच्या हस्ते टपाल तिकीट जारी

शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचा आणि विविध क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट विद्यार्थ्यांचा वार्षिक पुरस्कारांनी गौरव

“महाराजा माधवराव सिंधीया - पहिले द्रष्टे नेते होते, ज्यांनी येणाऱ्या कित्येक पिढ्यांच्या उज्ज्वल भविष्याचे स्वप्न पाहिले होते”

“गेल्या दशकात, देशातील अभूतपूर्व दीर्घकालीन नियोजनामुळे, अनेक महत्वाचे निर्णय घेणे शक्य झाले आहे.”

“आमचा प्रयत्न, युवकांना सर्व क्षेत्रात प्रगती करण्यासाठी देशात सकारात्मक वातावरण निर्माण करणे हा आहे”

“सिंधीया स्कूल मधील प्रत्येक विद्यार्थ्याने, विकसित भारताच्या निर्मितीसाठी प्रयत्न केले पाहिजेत, मग ते व्यावसायिक क्षेत्र असो की इतर कुठले क्षेत्र”

“आज भारत जे काही करतो आहे, ते व्यापक स्तरावर करतो आहे.”

“तुमची स्वप्ने माझा संकल्प आहे”

Posted On: 21 OCT 2023 9:09PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 21 ऑक्‍टोबर 2023

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर इथे, 'द सिंधिया स्कूल' च्या 125 व्या स्थापना दिन सोहळ्याला संबोधित केले. कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधानांनी शाळेतील बहुउद्देशीय क्रीडा संकुलाची पायाभरणी केली तसेच शाळेचे प्रतिष्ठित माजी विद्यार्थी आणि अव्वल कामगिरी करणाऱ्यांना शाळेचे वार्षिक पुरस्कार प्रदान केले. 1897 साली स्थापन झालेली सिंधिया शाळा ग्वाल्हेरच्या ऐतिहासिक किल्ल्यावर आहे. याप्रसंगी पंतप्रधानांनी शाळेच्या स्मरणार्थ टपाल तिकिटही जारी केले.

पंतप्रधानांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पांजली वाहिली. यावेळी त्यांनी येथे आयोजित प्रदर्शनाची माहितीही घेतली.

यावेळी बोलतांना, पंतप्रधानांनी, द सिंधीया स्कूलच्या 125 व्या वर्धापन दिनानिमित्त सर्वांचे अभिनंदन केले. आझाद हिंद सरकारच्या स्थापना दिनानिमित्तही त्यांनी नागरिकांचे अभिनंदन केले. सिंधिया शाळा आणि ग्वाल्हेर शहराच्या प्रतिष्ठित इतिहासाच्या उत्सवाचा भाग होण्याची संधी मिळाल्याबद्दल पंतप्रधानांनी कृतज्ञता व्यक्त केली. त्यांनी ऋषी ग्वालिपा, संगीतकार तानसेन, महादजी सिंधिया, राजमाता विजया राजे, अटलबिहारी वाजपेयी आणि उस्ताद अमजद अली खान यांचा आपल्या भाषणात उल्लेख केला आणि सांगितले की ग्वाल्हेरच्या भूमीने नेहमीच देशासाठी प्रेरणास्त्रोत ठरतील, अशी माणसे निर्माण केली आहेत.

"ही स्त्रीशक्तीची आणि शौर्याची भूमी आहे", महाराणी गंगाबाई यांनी, स्वराज हिंद फौजच्या निधीसाठी आपले दागिने याच भूमीवर विकले, असे सांगत पंतप्रधान म्हणाले, "ग्वाल्हेरला येणे हा नेहमीच एक आनंददायी अनुभव असतो". भारतीय संस्कृती आणि वाराणसीच्या संवर्धनासाठी सिंधिया कुटुंबाच्या योगदानाचाही पंतप्रधानांनी उल्लेख केला. काशीमध्ये या कुटुंबाने बांधलेल्या अनेक घाटांचे आणि बनारस हिंदू विश्वविद्यालयाला दिलेल्या योगदानाचे त्यांनी स्मरण केले. काशीतील आजचे विकास प्रकल्प, सिंधीया कुटुंबातील दिग्गजांना वेगळे समाधान देणारे आहेत.  ज्योतिरादित्य सिंधिया हे गुजरातचे जावई असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले आणि गुजरातमधील त्यांच्या मूळ गावासाठी, गायकवाड कुटुंबाने दिलेल्या योगदानाचाही मोदी यांनी उल्लेख केला.

कर्तव्यदक्ष व्यक्ती क्षणिक फायद्याऐवजी भावी पिढ्यांच्या कल्याणासाठी काम करते असे पंतप्रधान म्हणाले. शैक्षणिक संस्थांच्या स्थापनेच्या दीर्घकालीन लाभांवर भर देत पंतप्रधानांनी महाराजा माधवराव यांना आदरांजली वाहिली. महाराजा यांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था देखील स्थापन केली, जी अजूनही दिल्लीत डीटीसी म्हणून कार्यरत आहे, या अल्पज्ञात सत्याचाही मोदी यांनी उल्लेख केला. जलसंधारण आणि सिंचनासाठी हाती घेण्यात आलेल्या उपक्रमांचा पंतप्रधानांनी उल्लेख केला आणि सांगितले की हर्सी धरण 150 वर्षांनंतरही आशियातील सर्वात मोठे मातीचे धरण आहे. महाराजांची दूरदृष्टी आपल्याला दीर्घकाळ काम करण्यास आणि जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात शॉर्टकट टाळण्यास शिकवते, असे पंतप्रधान म्हणाले.

पंतप्रधानांनी 2014 मध्ये भारताच्या पंतप्रधानपदाची धुरा स्वीकारल्यानंतर त्यांच्याकडे तात्काळ परिणामांसाठी काम करणे किंवा दीर्घकालीन दृष्टीकोन स्वीकारणे हे दोन पर्याय होते असे अधोरेखित केले. सरकारने 2, 5, 8, 10, 15 आणि 20 वर्षे अशा विविध कालमर्यादेत काम करण्याचा निर्णय घेतला. आणि आता सरकार 10 वर्षे पूर्ण करण्याच्या जवळ येऊन ठेपले असताना दीर्घकालीन दृष्टिकोनासह अनेक प्रलंबित निर्णय घेण्यात आले आहेत. मोदींनी गेल्या नऊ वर्षातील कामगिरी सादर करताना, जम्मू आणि काश्मीरमधील कलम 370 रद्द करण्याची सहा दशकांपूर्वीची मागणी, लष्करातील निवृत्त सैनिकांना समान पद समान निवृत्तीवेतन देण्याची चार दशके जुनी मागणी तसेच जीएसटी आणि तिहेरी तलाक कायद्याच्या चार दशके जुन्या मागणीचा उल्लेख केला. संसदेत नुकत्याच संमत झालेल्या नारी शक्ती वंदन अधिनियमाचाही त्यांनी उल्लेख केला. तरुण पिढीसाठी संधींची कमतरता नसलेले सकारात्मक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करणारे सध्याचे सरकार नसते तर हे प्रलंबित निर्णय पुढच्या पिढीपर्यंत पोहोचले नसते, असे मोदी यांनी अधोरेखित केले. “मोठी स्वप्ने पहा आणि मोठे यश मिळवा” असे पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांना सांगितले. त्यांनी नमूद केले की भारताच्या स्वातंत्र्याची 100 वर्षे पूर्ण होत असताना सिंधिया स्कूलला देखील 150 वर्षे पूर्ण होत आहेत. पुढील 25 वर्षांत युवा पिढी भारताला विकसित राष्ट्र बनवेल असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. “माझा युवकांवर आणि त्यांच्या क्षमतांवर विश्वास आहे” असे पंतप्रधान म्हणाले आणि देशाने हाती घेतलेला संकल्प युवक पूर्ण करतील असा विश्वास व्यक्त केला. आगामी 25 वर्षे विद्यार्थ्यांसाठी भारताएवढीच महत्त्वाची आहेत, याचा त्यांनी पुनरुच्चार केला. "सिंधिया शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याने भारताला विकसित भारत बनवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, मग तो व्यावसायिक जगात असो किंवा इतर कोणत्याही ठिकाणी असो," यावर त्यांनी भर दिला.

पंतप्रधान म्हणाले की सिंधिया शाळेच्या माजी विद्यार्थ्यांशी साधलेल्या संवादामुळे विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्याच्या त्यांच्या क्षमतेवरचा त्यांचा विश्वास अधिक दृढ झाला आहे. त्यांनी केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह, रेडिओवरील निवेदक अमीन सयानी, पंतप्रधानांनी लिहिलेला गरबा सादर करणारे मित बंधू, सलमान खान आणि गायक नितीन मुकेश यांचा उल्लेख केला.

पंतप्रधानांनी भारताच्या वाढत्या जागतिक प्रतिष्ठेचा उल्लेख केला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरलेले चांद्रयान आणि जी 20 च्या यशस्वी आयोजनाचा देखील त्यांनी उल्लेख केला. भारत ही सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असल्याचे त्यांनी सांगितले. फिनटेक, रिअल-टाइम डिजिटल व्यवहार आणि स्मार्टफोन डेटा वापरामध्ये भारत पहिल्या क्रमांकावर आहे. इंटरनेट वापरकर्त्यांच्या संख्येत आणि मोबाईल उत्पादनात भारत दुसऱ्या क्रमांकावर असल्याची माहिती त्यांनी दिली. भारताकडे  तिसरी सर्वात मोठी स्टार्टअप परिसंस्था आहे आणि भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा ऊर्जा ग्राहक आहे. अंतराळ स्थानकासाठी भारताची तयारी आणि आजच केलेल्या गगनयानशी संबंधित यशस्वी चाचणीचा त्यांनी उल्लेख केला. तेजस आणि आयएनएस विक्रांतचाही त्यांनी उल्लेख केला आणि "भारतासाठी काहीही अशक्य नाही" असे नमूद केले.

जग हे शिंपल्यातल्या मोत्यासारखे आहे, असे विद्यार्थ्यांना सांगून पंतप्रधानांनी त्यांना अंतराळ आणि संरक्षण क्षेत्रासह त्यांच्यासाठी खुल्या करण्यात आलेल्या नवीन संधींबद्दल सांगितले. पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांना चौकटीबाहेरचा विचार करण्यास सांगितले. शताब्दी गाड्या सुरू करण्यासारख्या माजी रेल्वेमंत्री माधवराव यांच्या पुढाकारांची तीन दशकांपर्यंत पुनरावृत्ती कशी होऊ शकली नाही आणि आता देश वंदे भारत आणि नमो भारत गाड्यांचा कसा साक्षीदार होत आहे, याविषयी त्यांनी सांगितले. 

सिंधिया स्कूलमध्ये, स्वराजच्या संकल्पनांवर आधारित हाऊसच्या (गटांच्या) नावांवर पंतप्रधानांनी प्रकाश टाकला आणि हा मोठा प्रेरणास्रोत असल्याचे सांगितले. त्यांनी शिवाजी हाऊस, महादजी  हाऊस, राणोजी हाऊस, दत्ताजी हाऊस, कनरखेड हाऊस, निमाजी हाऊस आणि माधव हाऊस यांचा उल्लेख करून हे सप्तऋषींच्या सामर्थ्यासारखे असल्याचे सांगितले. पंतप्रधान मोदी यांनी विद्यार्थ्यांवर पुढील 9 कार्ये सोपवली आहेत  : जल सुरक्षेसाठी जनजागृती मोहीम राबवणे, डिजिटल पेमेंट्सबद्दल जागरूकता निर्माण करणे, ग्वाल्हेर हे भारतातील सर्वात स्वच्छ शहर बनवण्यासाठी प्रयत्न करणे, मेड इन इंडिया उत्पादनांना प्रोत्साहन देणे आणि व्होकल फॉर लोकलचा दृष्टिकोन स्वीकारणे. परदेशात जाण्यापूर्वी देशांतर्गत प्रवास करणे आणि भारताविषयी अधिकाधिक जाणून घेणे, आपल्या भागातील शेतकऱ्यांमध्ये नैसर्गिक शेतीबद्दल जागरुकता निर्माण करणे, दैनंदिन आहारात भरडधान्यांचा समावेश करणे, खेळ, योग किंवा व्यायामाच्या कोणत्याही प्रकाराला जीवनशैलीचा अविभाज्य भाग बनवणे आणि किमान एका गरीब कुटुंबाला मदतीचा हात देणे. हा मार्ग अनुसरून  गेल्या पाच वर्षांत 13 कोटी लोक दारिद्र्यातून मुक्त झाले आहेत, असे ते म्हणाले

“भारत आज जे काही करत आहे, ते मोठ्या स्वरूपात  करत आहे” असे सांगून  पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांना आपली स्वप्ने आणि संकल्प मोठे ठेवण्याचे आवाहन केले. “तुमची स्वप्ने हे माझे संकल्प आहेत”, असे त्यांनी सांगितले तसेच विद्यार्थ्यांना त्यांचे विचार आणि कल्पना नमो अॅपद्वारे त्यांना कळवण्यास किंवा व्हॉट्सअॅपवर त्यांच्याशी संपर्क साधण्यास सुचवले.

भाषणाचा समारोप करताना पंतप्रधान म्हणाले, "सिंधिया स्कूल ही केवळ एक संस्था नाही तर एक वारसा आहे. "शाळेने महाराज माधवराव जी यांचे संकल्प स्वातंत्र्यापूर्वी आणि स्वातंत्र्यानंतर निरंतर पुढे नेले आहेत. कार्यक्रमात पुरस्कार प्रदान करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांचे पंतप्रधान मोदी यांनी अभिनंदन केले आणि सिंधिया स्कूलला उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी मध्य प्रदेशचे राज्यपाल मंगूभाई पटेल, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आणि केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया, नरेंद्र सिंह तोमर आणि जितेंद्र सिंह आदी उपस्थित होते. 

 

 

 

 

 

 

 

* * *

M.Pange/Radhika/Sushma/Sonali K/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1969844) Visitor Counter : 96