आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

ओटीटी प्लॅटफॉर्म सेवांवर धूम्रपानविषयक इशारे देण्याबाबत केंद्र सरकारचे ‘तडजोडीचे’ धोरण असल्याचे वृत्त असत्य आणि दिशाभूल करणारे

Posted On: 21 OCT 2023 6:25PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 21 ऑक्‍टोबर 2023

 

ओटीटी प्लॅटफॉर्म वरुन प्रसारित केल्या जाणाऱ्या कार्यक्रमांदरम्यान, धूम्रपान सेवनाच्या धोक्याची जाणीव करून देणाऱ्या इशाऱ्याबाबत केंद्र सरकारने ‘तडजोडीचे धोरण’ स्वीकारले आहे, अशा आशयाची बातमी, एका प्रतिष्ठित वृत्तसमूहाने प्रकाशित केली आहे. सरकारशी असलेल्या या कथित करारामुळे, काही ओटीटी प्लॅटफॉर्म वरुन असे इशारे कमी किंवा सौम्य स्वरूपात दिले जात आहेत, असा दावाही ह्या वृत्तात करण्यात आला आहे. मात्र, हे वृत्त पूर्णपणे चुकीचे असून, त्यातील दावे खोटे, निराधार आणि चुकीच्या तथ्यांवर आधारित आहेत.

सार्वजनिक आरोग्य हा अत्यंत गंभीर विषय आहे, हे लक्षात घेत, केंद्र सरकारने सीओटीपी (COTP) सिगारेट आणि इतर तंबाखूजन्य पदार्थ) चित्रपट विषयक नियम, ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी ही लागू केले आहेत. ओटीटी रूल्स 2023, एक सप्टेंबर 2023 पासून लागू झाले आहेत. या नियमांतर्गत नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ, डिस्ने + हॉटस्टार, जिओ सिनेमा, सोनी लिव्ह, ए. एल. टी. बालाजी, वूट अशा सर्व ओटीटी प्लॅटफॉर्मवर तंबाखूविरोधी आरोग्य केंद्रे, तंबाखूविरोधी आरोग्यविषयक इशारा, स्थिर संदेश स्वरूपात, ठळकपणे आणि नियमांमध्ये नमूद केल्याप्रमाणे तंबाखूच्या वापराच्या दुष्परिणामांवर दृकश्राव्य अस्वीकरण प्रदर्शित करणे अनिवार्य आहे.

सरकारच्या ह्या निर्णयाचे, विविध सार्वजनिक आरोग्य संघटनांनी आणि तज्ञांनी स्वागत केले आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मला तंबाखू नियंत्रण नियमावलीच्या कक्षेत आणून, भारताने तंबाखू नियंत्रण उपाययोजना करण्यात आघाडी घेतली आहे.

त्यामुळे, प्रसारमाध्यमात आलेले हे वृत्त वस्तुस्थितीला धरून नाही आणि केंद्र सरकारच्या, सार्वजनिक आरोग्य विषयक गंभीर दृष्टिकोनाच्या कटिबद्धतेचे योग्य चित्र मांडणारे नाही.

हे नियम 1 सप्टेंबर 2023 पासून लागू झाले असून सर्व ओटीटी प्लॅटफॉर्मनी, या तरतुदींचे काटेकोरपणे पालन करणे अनिवार्य आहे. यासंदर्भातल्या नियमांशी कोणतीही तडजोड केली जात नाही आणि ओटीटी नियम 2023 चे पालन न केल्यास सरकार कारवाई करू शकेल.

 

* * *

M.Pange/R.Aghor/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1969773) Visitor Counter : 84