वस्त्रोद्योग मंत्रालय
भारतातील वस्त्रोद्योगाचे भविष्य उद्धृत करणाऱ्या भारत टेक्स 2024 या जागतिक वस्त्रोद्योग कार्यक्रमाचे उद्योग जगताने केले आयोजन
Posted On:
21 OCT 2023 4:07PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 21 ऑक्टोबर 2023
भारत टेक्स 2024 या जगातील आतापर्यंतच्या सर्वात भव्य अशा वस्त्रोद्योग महोत्सवाचे आयोजन करण्यात पुढाकार घेतल्याबद्दल केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी उद्योग जगताची प्रशंसा केली आहे. नवी दिल्लीत वाणिज्य भवन येथे आज गोयल यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यक्रमाचा उद्घाटनपूर्व समारंभ झाला.
भारत टेक्स 2024 हा केवळ एक महोत्सव नसून जागतिक वस्त्रोद्योग केंद्र म्हणून उदयाला येण्याच्या भारताच्या वचनबद्धतेचे ते एक प्रतीक आहे, असे गोयल यावेळी म्हणाले. भारत टेक्स 2024 हा उपक्रम उद्योगाच्या वाढीला चालना देईल आणि जागतिक वस्त्रोद्योग उद्योगात एक परिपक्व, स्पर्धात्मक रीत्या तुल्यबळ असे जागतिक स्त्रोतांचे स्थान म्हणून भारताची प्रतिमा निर्माण करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आयोजकांनी हा महोत्सव लक्षवेधक आणि अभ्यागतांसाठी आकर्षक असा करावा, असे ते म्हणाले.
यावेळी वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते महोत्सवाचे बोधचिन्ह, संकेतस्थळ आणि व्हिडिओचे लोकार्पण करण्यात आले. भारताचे जागतिक सामर्थ्य, त्याचे शाश्वत उपक्रम तसेच मूल्य साखळीतील सामर्थ्य अधोरेखित करण्यासाठी एक माध्यम म्हणून या कार्यक्रमाकडे बघावे, असे आवाहन त्यांनी उद्योगांना केले.
"भारत टेक्स 2024" 26-29 फेब्रुवारी 2024 दरम्यान नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आला आहे. जागतिक स्तरावरील हा एक भव्य कार्यक्रम असेल. यामध्ये सुमारे 40 देशांमधले प्रदर्शक आणि ग्राहक सहभाग घेतील असा अंदाज आहे. भारत टेक्स 2024 संपूर्ण वस्त्रोद्योग क्षेत्रातील मूल्य साखळीचे व्यापक दर्शन घडवेल, भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि वस्त्रोद्योग परंपरांपासून ते अगदी अलीकडील तांत्रिक नवनिर्मितीचे प्रतिबिंब या महोत्सवात दिसून येईल. यामध्ये 40 देशांतील 1,000 हून अधिक प्रदर्शक आणि 30,000 पेक्षा जास्त निमंत्रित सहभागी होणार आहेत. या मेगा इव्हेंटमध्ये ज्ञानाधारित सत्रे, परिसंवाद आणि संमेलने, सीईओ गोलमेज परिषद, बी टू बी आणि जी टू जी बैठक, धोरणात्मक गुंतवणूक घोषणा, उत्पादन शुभारंभ सोहळा आणि जागतिक स्तरावर कापड उद्योगाला पुन्हा एकदा परिभाषित करतील अशा उपक्रमांचा समावेश असेल. याशिवाय प्रत्यक्ष सादरीकरण, सांस्कृतिक कार्यक्रम आणि फॅशन जगातील सादरीकरणाने एक अत्यंत सृजनशील आणि भारावून टाकणारे वातावरण तयार होईल, ज्यामुळे कापड, फॅशन, शाश्वतता आणि भारताच्या हृदयातून निर्माण झालेल्या विविध शैलीच्या वस्त्रांमधील सौन्दर्य पाहण्याची संधी मिळेल.
भारतीय वस्त्रोद्योग क्षेत्रामध्ये निर्यात वाढवण्याच्या दृष्टीने अपार क्षमता असून भारत टेक्स 2024 हा योग्य वेळी आयोजित केला आहे, असे वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या सचिव रचना शाह यांनी यावेळी सांगितले. हे केवळ एक प्रदर्शन नव्हे तर एक अविस्मरणीय अनुभव असेल, असे त्या म्हणाल्या.
भारत टेक्स 2024 एक्स्पोबद्दल अधिक माहिती www.bharat-tex.com वर उपलब्ध आहे.
* * *
M.Pange/B.Sontakke/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1969706)
Visitor Counter : 280