गृह मंत्रालय
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह शनिवारी, 21 ऑक्टोबर 2023 रोजी,पोलीस स्मृती दिनानिमित्त नवी दिल्ली येथील राष्ट्रीय पोलीस स्मारक येथे हुतात्म्यांना वाहणार श्रद्धांजली
प्रविष्टि तिथि:
20 OCT 2023 5:00PM by PIB Mumbai
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह शनिवारी, 21 ऑक्टोबर 2023 रोजी, पोलीस स्मृती दिनानिमित्त नवी दिल्ली येथील राष्ट्रीय पोलीस स्मारक येथे हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहणार आहेत.
दिनांक 21 ऑक्टोबर 1959 रोजी लडाख येथील हॉटस्प्रिंग्स येथे सशस्त्र चिनी सैनिकांच्या तुकडीने केलेल्या हल्ल्यात 10 शूर पोलिसांना जीव गमवावा लागला होता. या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ तसेच कर्तव्यावर असताना प्राणार्पण करणाऱ्या इतर सर्व पोलीस कर्मचाऱ्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ 21 ऑक्टोबर हा दिवस पोलीस स्मृती दिन म्हणून पाळण्यात येतो.
पोलीस कर्मचाऱ्यांच्या बलिदानाचा तसेच राष्ट्रीय सुरक्षा आणि अखंडता यांचे रक्षण करण्यात सर्वात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या पोलिसांच्या सेवेचा सन्मान करण्याच्या उद्देशाने नवी दिल्लीतील चाणक्यपुरी येथे उभारलेल्या राष्ट्रीय पोलीस स्मारकाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वर्ष 2018 च्या पोलीस स्मृती दिनी लोकार्पण करण्यात आले.
या स्मारकामुळे पोलीस दलांतील कर्मचाऱ्यांमध्ये त्यांच्या प्राणांचे मोल देऊन देशाचे रक्षण करण्यासाठीची वचनबद्धता आणखी मजबूत करण्यासह त्यांना राष्ट्रीय अस्मिता, अभिमान, उद्देशांची एकता, सामायिक इतिहास आणि नियतीची भावना प्रदान करते. सदर स्मारकामध्ये ‘वॉल ऑफ व्हॅलोर’ ही मध्यवर्ती शिल्पकृती आणि वस्तूसंग्रहालय यांचा समावेश आहे. मध्यवर्ती शिल्पकृती म्हणजे 30 फुट उंच ग्रॅनाईटची मोनोलिथ सेनोटाफ रचना असून ही शिल्पकृती पोलीस कर्मचाऱ्यांचे सामर्थ्य, लवचिकता आणि निःस्वार्थ सेवाभावाचे प्रतीक आहे. ‘वॉल ऑफ व्हॅलोर’ वर हुतात्म्यांची नावे कोरलेली असून ही रचना स्वातंत्र्यप्राप्तीपासून आतापर्यंत कर्तव्य करत असताना प्राणार्पण करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या शौर्याची आणि त्यागाची पोचपावती देत उभी आहे.
येथे असलेले वस्तुसंग्रहालय भारतातील ऐतिहासिक आणि नव्याने उदयाला येत असलेल्या पोलिस कार्यकलापाच्या संकल्पनेवर आधारलेले आहे. हे स्मारक म्हणजे पोलीस कर्मचारी तसेच इतर नागरिकांसाठी देखील एक तीर्थस्थळ आणि अत्यंत आदराचे ठिकाण आहे. हे स्मारक सोमवार वगळता आठवड्याच्या इतर सर्व वारी सामान्य नागरिकांसाठी खुले असते. केंद्रीय सशस्त्र पोलीस दलातर्फे दर शनिवारी आणि रविवारी संध्याकाळी, सूर्यास्ताच्या एक तास अगोदर या स्मारकाच्या ठिकाणी बँड पथकाचे सादरीकरण, संचलन आणि रिट्रीट समारंभ आयोजित केला जातो.
देशभरातील पोलीस दलातील हुतात्म्यांना श्रद्धांजली म्हणून दरवर्षी 21 ऑक्टोबर हा दिवस संपूर्ण देशभरात पोलीस स्मृती दिन म्हणून पाळण्यात येतो. या दिवशी केंद्रीय गृहमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय पोलीस स्मारकापाशी मुख्य कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. यावेळी केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आणि दिल्ली पोलीस यांचे संयुक्त संचलन आयोजित करण्यात येते.

***
G.Chippalkatti/S.Chitnis/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1969502)
आगंतुक पटल : 240