रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी पंजाबमधील दिल्ली अमृतसर कटरा द्रुतगती महामार्ग आणि अमृतसर बाह्यवळण रस्त्याच्या प्रगतीचा घेतला आढावा

Posted On: 19 OCT 2023 7:15PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 19 ऑक्‍टोबर 2023

 

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज त्यांच्या पंजाबमधील मुक्कामादरम्यान दिल्ली - अमृतसर - कटरा हरित क्षेत्र द्रुतगती महामार्ग (DAK) आणि अमृतसर बाह्यवळण रस्त्याची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत पंजाबच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री हरभजन सिंग ईटीओ आणि अमृतसरचे खासदार गुरजित सिंग औजला हे देखील उपस्थित होते.

पंजाबमध्ये 29,000 कोटी रुपये खर्चून पाच हरित क्षेत्र आणि आर्थिक कॉरिडॉर बांधले जात आहेत. दिल्ली - अमृतसर - कटरा हा 669 किलोमीटर लांबीचा हरित क्षेत्र द्रुतगती महामार्ग सुमारे 40,000 कोटी रुपये खर्चून बांधला जात आहे. या द्रुतगती महामार्गाच्या निर्मितीमुळे दिल्लीहून अमृतसरला 4 तासांत आणि कटराहून दिल्लीला 6 तासांत पोहोचता येणार आहे. सध्या दिल्ली ते कटरा हे अंतर 727 किमी असून या मार्गाच्या निर्मितीमुळे हे अंतर 58 किमीने कमी होणार आहे.

दिल्लीतील केएमपीपासून सुरू होणारा हा द्रुतगती महामार्गाचा सुमारे 137 किमी भाग हरियाणामध्ये बांधला जात आहे. पंजाबमधील या द्रुतगती महामार्गाची लांबी 399 किमी असून त्यापैकी 296 किमीचे काम सुरू झाले आहे. जम्मू-काश्मीरमधील या द्रुतगती महामार्गाची लांबी 135 किमी असून त्यापैकी 120 किमीचे काम सुरू आहे. पंजाबमध्ये हा द्रुतगती महामार्ग पतियाळा, संगरूर, मालेरकोटला, लुधियाना, जालंधर, कपूरथला, गुरुदासपूर या औद्योगिक भागातून जाणार आहे.

या कॉरिडॉरचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे बियास नदीवरील आशियातील सर्वात लांब 1300 मीटर लांबीचा केबल स्टेड पूल हे असेल. हा द्रुतगती महामार्ग शीख समुदायाची प्रमुख धार्मिक स्थळे, सुवर्ण मंदिर, कपूरथला जिल्ह्यातील सुलतानपूर लोधी गुरुद्वारा, गोइंदवाल साहिब गुरुद्वारा, खंडूर साहिब गुरुद्वारा, गुरुद्वारा दरबार साहिब (तरन तारन) आणि कटरा येथील माता दरबार वैष्णोदेवीपर्यंत एकमेकांशी जोडेल.

1475 कोटी रुपये खर्चून बांधल्या जाणाऱ्या 4 पदरी आणि 50 किमी लांबीच्या अमृतसर बाह्यवळण रस्त्याचे काम प्रगतीपथावर आहे. या बाह्यवळण रस्त्याच्या निर्मितीमुळे तरन तारन ते अमृतसर विमानतळापर्यंत चांगली संपर्क सुविधा बहाल होईल. हा बाह्यवळण रस्ता अमृतसरची वाहतूक समस्या सोडवण्यासाठी प्रभावी ठरेल. या मार्गामुळे अमृतसरची संपर्क सुविधा, वाहतूक आणि पायाभूत सुविधा यामध्ये सुधारणा होईल.

 

* * *

R.Aghor/S.Mukhedkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1969178) Visitor Counter : 65