संसदीय कामकाज मंत्रालय
भारताने आयोजित केलेली पहिली पी - 20 शिखर परिषद आतापर्यंतची सर्वात यशस्वी पी - 20 शिखर परिषद आहे : लोकसभा अध्यक्ष
भारत दहशतवादाचा, त्याच्या सर्व प्रकारांचा आणि प्रकटीकरणाचा तीव्र निषेध करतो: ओम बिर्ला
पी - 20 शिखर परिषदेत सहभागी प्रतिनिधींनी जबाबदार कृत्रिम बुद्धिमत्ता विकास आणि माहिती सुरक्षिततेची गरज अधोरेखित केली: लोकसभा अध्यक्ष
"जी - 20 देश कायदेविषयक मसुद्याच्या संदर्भातील ज्ञान वाढविण्यासाठी एका गटाची स्थापना करतील"
"सर्व जी - 20 देशांच्या संसदेत मिशन LiFE वर विशेष चर्चा होणार"
Posted On:
15 OCT 2023 11:05PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 ऑक्टोबर 2023
भारताने आयोजित केलेली पहिली पी - 20 शिखर परिषद शिष्टमंडळांच्या सहभागाच्या दृष्टीने आतापर्यंतची सर्वात यशस्वी पी - 20 शिखर परिषद आहे, असे प्रतिपादन लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी केले आहे. काल नवी दिल्ली येथे 9 व्या जी - 20 संसदीय अध्यक्षांच्या शिखर परिषदेच्या समारोपानंतर आज संसदेच्या आवारात पत्रकार परिषदेला संबोधित करताना, लोकसभा अध्यक्षांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली की जी - 20 देशांव्यतिरिक्त इतर 10 देशांना परिषदेसाठी आमंत्रित करण्यात आले होते, त्यापैकी एक देश वगळता सर्व देश सहभागी झाले होते. 29 देशांतील एकूण 37 संसदीय सभापती किंवा अध्यक्ष आणि उपसभापती किंवा उपाध्यक्ष आणि शिष्टमंडळांचे नेते या शिखर परिषदेत सहभागी झाले होते, अशी माहिती बिर्ला यांनी दिली. ऐतिहासिक दृष्टिकोनातून पाहता नवी दिल्लीत आयोजित पी - 20 शिखर परिषदेत आतापर्यंत सर्वाधिक प्रतिनिधी सहभागी झाले होते. पॅन आफ्रिकन युनियनचा जी - 20 सदस्य म्हणून समावेश केल्यानंतर पॅन आफ्रिकन संसदेने प्रथमच पी - 20 शिखर परिषदेत भाग घेतल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले. जी - 20 आणि निमंत्रित देशांच्या संसदेचे अध्यक्ष आणि उपसभापतींव्यतिरिक्त 48 संसद सदस्यांसह एकूण 436 प्रतिनिधींनी या परिषदेत भाग घेतला.
लोकसभा अध्यक्षांनी संबोधित केलेली पत्रकार परिषद येथे पाहता येईल.
लोकसभा अध्यक्षांनी नमूद केले की भारताच्या जी - 20 अध्यक्षपदाच्या कार्यकाळाच्या संकल्पनेच्या अनुषंगाने, 9 व्या पी - 20 शिखर परिषदेची संकल्पना 'एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्यासाठी संसद' अशी होती. जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशाने आयोजित केलेल्या पहिल्या जी - 20 संसदीय अध्यक्षांच्या शिखर परिषदेचा (पी - 20 शिखर परिषद) चा समारोप 14 ऑक्टोबर 2023 रोजी दिल्लीत द्वारका येथील यशोभूमी या भारतीय आंतरराष्ट्रीय परिषद केंद्रात झाला. या शिखर परिषदेत जगभरातील संसद सदस्य एकत्र आले आणि या सदस्यांनी जी - 20 प्रक्रियेत प्रभावी आणि अर्थपूर्ण संसदीय योगदान देण्यासाठी त्यांचे संयुक्त कार्य पुढे चालू ठेवण्याच्या आपल्या वचनबद्धतेची पुष्टी केली. पी - 20 शिखर परिषदेचे उद्घाटन 13 ऑक्टोबर 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकशाहीची जननी म्हणून भारताची भूमिका अधोरेखित केली. या दोन दिवसीय संसदीय परिषदेपूर्वी 12 ऑक्टोबर 2023 रोजी मिशन LiFE संदर्भात शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
"पी - 20 शिखर परिषदेच्या संयुक्त घोषणेवर एकमत, हे भारताच्या नेतृत्वाचे लक्षण आहे"
शिखर परिषदेच्या यशावर प्रकाश टाकताना ओम बिर्ला यांनी नमूद केले की, जी - 20 नेत्यांच्या शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली संयुक्त जाहीरनाम्यावर एकमत झाल्यानंतर, भारताच्या संसदेने पी - 20 शिखर परिषदेत संयुक्त जाहीरनाम्यावर एकमत साधण्यासाठी देखील नेतृत्व केले. गेल्या वर्षी इंडोनेशियामध्ये संयुक्त घोषणेवर सहमती होऊ शकली नव्हती, हे उल्लेखनीय आहे, असे ते म्हणाले. याबाबत समाधान व्यक्त करताना ओम बिर्ला म्हणाले की, पी - 20 मधील संयुक्त घोषणेवरील सर्व सदस्यांची सहमती भारताचे नेतृत्व आणि दृढनिश्चय दर्शवते.
"दहशतवादाच्या सर्व स्रोतांचा सामूहिक निर्धाराने पराभव केला पाहिजे"
भारत दहशतवादाचा, त्याच्या सर्व प्रकारांचा आणि प्रकटीकरणाचा निषेध करतो, हे लोकसभा अध्यक्षांनी अधोरेखित केले. दहशतवाद हा शांतता आणि विकासात अडथळा आहे हे अधोरेखित करून बिर्ला यांनी जागतिक शांतता आणि समृद्धीचे आवाहन केले. दहशतीच्या सर्व स्रोतांचा सामूहिक निर्धाराने पराभव केला पाहिजे असे ओम बिर्ला यांनी शांततापूर्ण आणि समृद्ध जगाच्या स्थापनेच्या गरजेवर भर देताना सांगितले.
"जबाबदार कृत्रिम बुद्धिमतेचा विकास आणि डेटा सुरक्षिततेकडे लक्ष देण्याची गरज आहे”
कृत्रिम बुद्धिमत्तेचा संदर्भ देत, बिर्ला यांनी नमूद केले की पी20 शिखर परिषदेत सहभागी झालेल्या सर्व देशांनी जबाबदार कृत्रिम बुद्धिमतेचा विकास आणि डेटा सुरक्षिततेशी संबंधित आयामांकडे लक्ष देण्याची गरज आहे. ते पुढे म्हणाले की, कृत्रिम बुद्धिमत्ता विश्वसनीय आणि विश्वासार्ह असावी.
डिजिटल व्यासपीठाच्या भूमिकेबद्दल बिर्ला म्हणाले की, शिखर परिषदेदरम्यान, सर्व देशांनी सामान्य लोकांच्या जीवनात सामाजिक-आर्थिक बदल घडवून आणण्यासाठी डिजिटल व्यासपीठाची भूमिका स्वीकारली. ते पुढे म्हणाले की सर्व देशांनी याबाबत सहमती दर्शवली की यामुळे सेवा वितरण आणि नावीन्यता आणखी सुलभ होऊ शकते.
बिर्ला यांनी माहिती दिली की पी 20 देशांनी कायदेविषयक मसुद्यात मूलभूत ज्ञान वाढविण्यासाठी एक गट तयार करण्यास सहमती दर्शविली.
"नारी शक्ती वंदन विधेयक 2023 चे सर्वत्र स्वागत"
बिर्ला यांनी सांगितले की पंतप्रधानांच्या पुढाकाराच्या अनुषंगाने, परिषदेने महिलांच्या नेतृत्वाखालील विकासाला चालना देण्याचे मान्य केले. ते म्हणाले की, सर्व पीठासीन अधिकाऱ्यांनी भारतीय संसदेने मंजूर केलेल्या ‘नारी शक्ती वंदन विधेयक 2023’चे स्वागत केले.
"मिशन लाईफ वर विशेष चर्चा सर्व जी20 देशांच्या संसदेत होणार"
हवामान बदल हे जगासमोरील मोठे आव्हान असल्याचे सांगून बिर्ला म्हणाले की, भारताने हवामान बदलाच्या धोक्याचा सामना करण्यासाठी अनेक पुढाकार घेतले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या "पर्यावरणासाठीची जीवनशैली" म्हणजेच ‘लाइफस्टाइल फॉर एन्व्हायर्नमेंट’ (LiFE) या संकल्पनेवरील चर्चेबाबत बिर्ला यांनी नमूद केले की, सर्व देशांनी या संदर्भात केलेल्या नवकल्पनांची माहिती सामायिक केली. ते पुढे म्हणाले की, आता सर्व देशांच्या संसदेत मिशन लाइफवर विशेष चर्चा होणार असून, संपूर्ण जगाला पर्यावरणपूरक जीवनशैली अंगीकारण्याचा संदेश दिला जाणार आहे. असे केल्याने भारताच्या नेतृत्वाखाली पृथ्वी, पर्यावरण आणि निसर्गाचे रक्षण करण्यासाठी जगभरातील लोक एकत्र येतील. त्याचप्रमाणे, एकमेकांच्या सर्वोत्तम पद्धती आणि प्रयत्नांची देवाणघेवाण करून, प्रत्येकजण निरोगी आणि आदर्श जीवनशैलीकडे वाटचाल करू शकतील.
More information on P20 Summit:
- Ninth G20 Parliamentary Speakers’ Summit (P20) and Parliamentary Forum
- Prime Minister to inaugurate 9th G20 Parliamentary Speakers' Summit (P-20) in New Delhi on 13th October
- Presiding Officers of G20 Nations begin arriving in India for 9th P20 Summit
- 9th P20 Summit to be preceded by Parliamentary Forum on Mission LiFE
- Mission LiFE has given the world a new comprehensive approach for protecting environment and addressing challenges such as climate change: Lok Sabha Speaker
- President of African Union and Speakers of Parliaments of Australia, UAE and Bangladesh call on Lok Sabha Speaker on the sidelines of 9th P20 Summit
- PM inaugurates 9th G20 Parliamentary Speakers' Summit (P20)
- P20 Summit unanimously adopts Joint Statement
- Parliamentary Systems of G20 Countries
- 1st P20 Summit under India’s G20 Presidency Concludes
Join the conversation on social media, using the hashtag: #Parliament20
* * *
Jaydevi PS/Shraddha/Gajendra/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1968245)
Visitor Counter : 108