युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय

केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी मुंबईत आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या महत्त्वाच्या सदस्यांची घेतली भेट

Posted On: 16 OCT 2023 4:10PM by PIB Mumbai

मुंबई, 16 ऑक्‍टोबर 2023

 

मुंबईत आयोजित आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या 141 व्या बैठकीपूर्वी , केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी गेल्या आठवड्यात (13 आणि 14 ऑक्टोबर 2023) दोन दिवस, जगभरातील विविध क्रीडा संघटनांमध्ये महत्त्वाच्या पदांवर असलेल्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या (आयओसी) अनेक सदस्यांच्या भेटी घेत त्यांच्यासोबत बैठका घेतल्या. 15-17 ऑक्टोबर 2023 या कालावधीत नियोजित वेळापत्रकानुसार मुंबईत आयओसी बैठक सुरू आहे.

दोन दिवसीय आयओसी  बैठक सुरू होण्यापूर्वी, केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री  शनिवारी (ऑक्टोबर 14, 2023) म्हणाले की, आयओसी बैठक  भारतात होत आहे ही एक महत्त्वाची घटना आहे. ''मी समितीच्या सर्व सदस्यांचे स्वागत करतो आणि आशा करतो की, ही बैठक यशस्वी होईल आणि परिणामी ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांमध्ये नवीन खेळांच्या समावेशाची घोषणा होईल ," असे केंद्रीय मंत्री म्हणाले.

विविध आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रीडा महासंघांचे सदस्य आणि आयओसीच्या पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या द्विपक्षीय बैठकांच्या मालिकेत केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी,भारतीय क्रीडापटूंचे कल्याण आणि कामगिरी सुधारण्याच्या  उद्दिष्टाने क्रीडा विज्ञान आणि वैद्यकशास्त्रातील माहितीची देवाणघेवाण याविषयी चर्चा केली. प्रशिक्षण पद्धती, उपकरणे, आणि क्रीडा आणि इतर संबंधित क्षेत्रामध्ये  डिजिटल मार्गदर्शन  आणि प्रशिक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी संशोधन उपक्रमांचा शोध याचा या  सहकार्याच्या बाबींमध्ये  समावेश होता.केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्र्यांनी   शुक्रवारी मुंबईत आंतरराष्ट्रीय अॅथलेटिक्स महासंघाचे अध्यक्ष लॉर्ड सेबॅस्टियन को आणि जागतिक रोइंग महासंघाचे अध्यक्ष जीन-क्रिस्टोफ रोलँड यांच्यासोबत  द्विपक्षीय बैठक घेतली.

केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्र्यांनी शनिवारी, आयओसी अध्यक्ष थॉमस बाख, आयओसी उपाध्यक्ष जुआन अँटोनियो, आयओसी  कार्यकारी मंडळ सदस्य आणि युडब्लूडब्ल्यू  कुस्तीचे अध्यक्ष नेनाद लेलोविक, आंतरराष्ट्रीय पॅरालिम्पिक समितीचे अध्यक्ष अँड्र्यू पार्सन,  राष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या संघटनेच्या  महासचिव गुनिला लिंडबर्ग, आयओसी सदस्य आणि भावी क्रीडा आयोगाच्या अध्यक्ष, कोलिंडा ग्रॅबर-किटारोविच,आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाचे अध्यक्ष तय्यब इकराम,आंतरराष्ट्रीय सायकलिंग महासंघाचे  अध्यक्ष डेव्हिड लॅपर्टिएंट,आणि जागतिक डोपिंग विरोधी संस्थेचे  अध्यक्ष विल्टॉल्ड बांका यांची भेट घेतली. राज्यसभा खासदार, माजी ऑलिम्पिकपटू  आणि ट्रॅक अँड   फील्ड अॅथलीट आणि भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या  अध्यक्ष पी. टी. उषा देखील  द्विपक्षीय बैठकांना  उपस्थित होत्या.

आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती (आयओसी)चे अध्यक्ष थॉमस बाख यांच्या समवेत

 

आयओसीचे उपाध्यक्ष युआन अँटोनियो यांच्या समवेत

 

जागतिक डोपिंग विरोधी संस्थेचे अध्यक्ष विलटोल्ड बांका यांच्या समवेत

 

जागतिक रोइंग संघटनेचे अध्यक्ष जीन-ख्रिस्तोफ रोलंड यांच्या सोबत

 

आयओसीचे कार्यकारी मंडळ सदस्य आणि अध्यक्ष (युडब्ल्यूडब्ल्यू कुस्ती) नेनाद लेलोविक

 

आंतरराष्ट्रीय पॅरालिम्पिक  समितीचे अध्यक्ष अंड्रयू पार्सन यांच्यासह

 

राष्ट्रीय ऑलिम्पिक समित्यांच्या संघटनेच्या सरचिटणीस गुनिला लिन्डबर्ग यांच्यासह

 

आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती सदस्य आणि फ्युचर गेम्स आयोगाच्या अध्यक्ष कोलिंडा ग्राबर-कितारोविक

 

आंतरराष्ट्रीय हॉकी संघटनेचे (एफआयएच) अध्यक्ष तैय्यब इक्रम यांच्या समवेत

 

आंतरराष्ट्रीय अॅथलेटिक्स महासंघ  संघटनेचे अध्यक्ष लॉर्ड सॅबास्टीयन कोए यांच्यासह

 

ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये क्रिकेटचा समावेश केला जावा ही मागणी उचलून धरत केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडामंत्री म्हणाले की जर ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्यात आला तर जगभरातील देशांच्या सरकारांना या खेळासाठी निधीची तरतूद करणे सोपे होईल. म्हणून, असा निर्णय घेतला गेला तर क्रिकेटसाठी क्रीडाविषयक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी त्याची मोठी मदत होईल. “भारताला क्रीडा क्षेत्रातील महाशक्ती बनवण्याचे पंतप्रधानांचे स्वप्न आहे. देशातील क्रीडाविषयक पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी 3000 कोटी रुपयांचे प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. खेळाडूंनी अधिक उत्तम कामगिरी करावी म्हणून  खेलो इंडिया आणि अशाच इतर उपक्रमांच्या माध्यमातून सरकार खेळाडूंना उत्तम दर्जाच्या सुविधा देऊन मदत करत आहे,”असे  ते म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी मुंबईत आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या (आयओसी) 141व्या बैठकीचे  उद्घाटन केले. क्रीडाक्षेत्राशी संबंधित सर्व भागधारकांना परस्पर संवाद आणि माहितीच्या सामायीकीकरणाची संधी या बैठकीने उपलब्ध करून दिली. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष थॉमस बाख यांच्यासह इतर आयओसी सदस्य, भारतीय क्रीडाक्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्ती तसेच भारतीय ऑलिम्पिक संघटनेसह विविध क्रीडा संघटनांचे प्रतिनिधी आयओसीच्या या 141व्या बैठकीत सहभागी झाले आहेत.

आयओसी सदस्य देशांच्या या आयओसी बैठकीला विशेष महत्त्व आहे कारण ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांच्या भविष्याशी संबंधित अनेक महत्त्वाचे निर्णय या बैठकीत घेतले जातात. भारतात होत असलेल्या आयओसीच्या या 141व्या बैठकीतून जागतिक सहयोगाला प्रोत्साहन देण्याप्रती देशाची कटिबद्धता, क्रीडाविषयक कामगिरीचा सन्मान आणि मैत्री, आदर आणि उत्कृष्टता या ऑलिम्पिक स्पर्धांच्या तत्वांना चालना प्रतिबिंबित होत आहे. या कार्यक्रमामुळे क्रीडा क्षेत्रातील विविध  भागधारकांदरम्यान परस्पर संवाद आणि माहितीचे आदानप्रदान अधिक सुलभपणे होत आहे.

 

 

 

 

 

 

 

 

* * *

PIB Mumbai | S.Kane/Sonal C/Sanjana/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1968112) Visitor Counter : 100