पंतप्रधान कार्यालय

टांझानियाच्या राष्ट्राध्यक्षांचा भारत- दौरा आणि भारत आणि टांझानिया(8-10 ऑक्टोबर 2023) यांच्यातील धोरणात्मक भागीदारीच्या प्रारंभादरम्यान जारी करण्यात आलेले संयुक्त निवेदन

Posted On: 09 OCT 2023 9:57PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 9 ऑक्टोबर 2023

भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या निमंत्रणावरून टांझानियाच्या राष्ट्राध्यक्ष महामहीम समिया सुलुहु हसन 8 ते 10 ऑक्टोबर 2023 दरम्यान भारताच्या दौऱ्यावर आल्या. राष्ट्राध्यक्ष महामहीम समिया सुलुहु हसन यांच्यासोबत टांझानियाचे परराष्ट्र व्यवहार आणि पूर्व आफ्रिकी सहकार्यमंत्री जनुआरी मकांबा(एमपी) आणि इतर विविध क्षेत्रातील सदस्य, वरिष्ठ सरकारी अधिकारी त्याबरोबर टांझानियाच्या व्यापार समुदायातील सदस्य यांचा समावेश असलेले शिष्टमंडळही होते.

2.महामहीम राष्ट्राध्यक्ष समिया सुलुहु हसन यांचे 9 ऑक्टोबर 2023 रोजी नवी दिल्ली येथे राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात समारंभपूर्वक स्वागत करण्यात आले. त्यांनी महात्मा गांधी यांना अभिवादन करण्यासाठी राजघाटाला देखील भेट दिली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु समिया सुलुहु हसन यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा करतील आणि देशाच्या वतीने त्यांच्या सन्मानार्थ  मेजवानी आयोजित करतील.

3.राष्ट्राध्यक्ष समिया सुलुहु आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात अतिशय जिव्हाळ्याच्या आणि सौहार्दाच्या वातावरणात द्विपक्षीय चर्चा झाली आणि त्यांनी परस्परहिताच्या द्विपक्षीय, प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्यांवर विचारविनिमय केला. भारत आणि टांझानिया यांच्यात सध्या असलेल्या अतिशय घनिष्ठ, सौहार्दाच्या आणि सहकार्याच्या संबंधांची दोन्ही नेत्यांनी प्रशंसा केली आणि भारत आणि टांझानिया हे देश सामायिक मूल्यांचा प्रदीर्घ इतिहास आणि अनेक वर्षांचे आदर्श यांच्या धाग्यांनी बांधले गेलेले काळाच्या कसोटीवर सिद्ध झालेले भागीदार असल्याचे नमूद केले. जुलै 2016 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या टांझानिया भेटीमुळे द्विपक्षीय संबंध आणखी वृद्धिंगत झाले आणि त्यामुळे विकासविषयक सहकार्याला चालना मिळाल्याचे दोन्ही नेत्यांनी विचारात घेतले.

4.दोन्ही नेत्यांनी अलीकडेच परराष्ट्र व्यवहारमंत्री डॉ.एस. जयशंकर यांनी 10व्या आर्थिक, तांत्रिक आणि वैज्ञानिक सहकार्यविषयक संयुक्त आयोगाचे सहअध्यक्षपद भूषवण्यासाठी आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या नेतृत्वाखालील संसदीय शिष्टमंडळाने टांझानियाला दिलेल्या भेटींचा उल्लेख केला. त्या व्यतिरिक्त या वर्षात टांझानियाच्या विविध मंत्र्यांच्या अशाच प्रकारच्या भेटी आयोजित करण्यात आल्या. या उच्चस्तरीय भेटींमुळे टांझानिया आणि भारत या दोन्ही देशात असलेले भक्कम संबंध आणखी बळकट झाले असल्याबाबत दोन्ही नेत्यांनी सहमती व्यक्त केली.

5.10 ऑक्टोबर 2023 रोजी समिया सुलुहु हसन भारत-टांझानिया व्यापार आणि गुंतवणूक मंचाच्या बैठकीत सहभागी होणार आहेत, जिथे त्या भारतीय आणि टांझानियन व्यापारी समुदायांसमोर बीजभाषण करतील. भारतीय व्यापारी नेत्यांसोबत प्रत्यक्ष संवाद साधण्यासाठी बैठका देखील घेतील.

6.द्विपक्षीय संबंध अधिक बळकट करण्यासाठी आणि विविध क्षेत्रांमधील सहकार्याचा विस्तार करण्यासाठी दोन्ही नेत्यांनी भारत-टांझानिया संबंधांना संरक्षणविषयक धोरणात्मक भागीदारीच्या स्तरापर्यंत उंचावण्याची घोषणा केली. सागरी सुरक्षा, संरक्षण सहकार्य, विकासविषयक भागीदारी, व्यापार आणि गुंतवणूक आणि यांसारख्या इतर मुद्यांवर काम करण्यासाठी ही धोरणात्मक भागीदारी मदत करेल, असे दोन्ही बाजूंकडून नमूद करण्यात आले.

7.या भेटीदरम्यान, विविध क्षेत्रांशी संबंधित व्यापक विषयांवरील सामंजस्य करार करण्यात आले. याची यादी परिशिष्ट ए Annexure A म्हणून जोडली आहे.

राजकीय संबंध

8.दोन्ही बाजूंकडून हिंद-प्रशांत क्षेत्रासाठी एक दृष्टीकोन आणि हिंद-प्रशांत विषयक हिंदी महासागर रिम संघटनेच्या दृष्टीकोनाची अंमलबजावणी यांच्यासह प्रादेशिक आणि जागतिक मुद्यांवर द्विपक्षीय राजकीय सहभाग आणि धोरणात्मक संवाद यांच्या पातळीमध्ये वाढ होत असल्याबद्दल दोन्ही बाजूंनी समाधान व्यक्त केले. यावेळी असे नमूद करण्यात आले की भारत आणि टांझानिया हे सागरी शेजारी आहेत आणि दोन्ही देशांदरम्यान व्यापारी संबंध आणि जनतेचे एकमेकांशी असलेले संबंध यांचा प्रदीर्घ इतिहास आहे. त्यामुळे भारताच्या  'SAGAR'(Security and Growth for all in the Region) म्हणजे या प्रदेशातील सर्वांसाठी सुरक्षा आणि वृद्धी या दृष्टीकोनामध्ये टांझानियाला विशेष स्थान आहे. दोन्ही बाजूंनी गतिमान आर्थिक वृद्धीसाठी नील/महासागर अर्थव्यवस्थेच्या विकासावर भर देत आफ्रिकेमध्ये शांतता आणि सुरक्षेबाबतचा आफ्रिकी संघाचा दृष्टीकोन हा भारताच्या ‘सागर(SAGAR)’ दृष्टीकोनासोबत जुळणारा असल्याचे नमूद केले. जास्त भीषण नैसर्गिक आपत्तींच्या काळात बचाव आणि मदतकार्य राबवण्यासाठी भारतातील वार्षिक मानवतावादी सहाय्य आपत्ती निवारण(HADR) सरावांमध्ये टांझानियाच्या सहभागाचे देखील त्यांनी स्वागत केले.

9.दोन्ही बाजूंनी परराष्ट्र मंत्रीस्तरावर आणि नेत्यांमधील द्विपक्षीय बैठकांमध्ये संयुक्त आयोगाच्या यंत्रणेच्या माध्यमातून उच्च स्तरीय राजकीय संवाद सुरू ठेवण्याबाबत सहमती दर्शवली. दोन्ही बाजूंनी त्यांच्या परराष्ट्र मंत्र्यादरम्यान एक धोरण नियोजन संवाद सुरू करण्याबाबत सहमती व्यक्त केली.

संरक्षण सहकार्य

10.28 आणि 29 जून 2023 रोजी आरुषा येथे झालेल्या दुसऱ्या  संयुक्त संरक्षण सहकार्य समितीच्या बैठकीत दोन्ही देशांदरम्यान संरक्षण सहकार्याचा पाच वर्षांचा आराखडा  तयार करण्यात आला, या बैठकीच्या यशाबद्दल दोन्ही नेत्यांनी समाधान व्यक्त केले.

11.ऑगस्ट 2022 आणि फेब्रुवारी 2023 मध्ये टांझानियाच्या संरक्षणमंत्र्यांच्या भारत भेटींचे महत्त्व दोन्ही बाजूंनी विचारात घेण्यात आले ज्यामध्ये दोन्ही बाजूंनी संरक्षण सहकार्यात वाढ करण्याबाबत सहमती व्यक्त केली होती. भारताने दुलुती येथे कमांड अँड स्टाफ कॉलेजमध्ये भारतीय लष्करी प्रशिक्षण पथक(IMTT) तैनात केल्याबद्दल टांझानियाकडून प्रशंसा करण्यात आली.

12.31 मे 2022 आणि 2 ऑक्टोबर 2023 रोजी दार ए सलाम येथे दोन वेळा संरक्षण प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये अनेक भारतीय संरक्षण सामग्री उत्पादक कंपन्या सहभागी झाल्या होत्या. हे यशस्वी आयोजन विचारात घेऊन संरक्षण उद्योगात सहकार्य वाढवण्याबाबत दोन्ही बाजूंनी स्वारस्य दाखवण्यात आले. दोन्ही नेत्यांनी टांझानियाच्या दलांची त्याबरोबरच एक उद्योग म्हणून  क्षमतावृद्धी करण्याच्या दिशेने होणाऱ्या सहकार्याच्या प्रगतीबाबत आनंद व्यक्त केला.

सागरी सुरक्षा

13.भारत आणि टांझानिया हे सामाईक आव्हानांना तोंड देत असलेले सागरी शेजारी असल्याचे विचारात घेऊन, हिंदी महासागर क्षेत्रात सहकार्य वृद्धींगत करण्याबाबत दोन्ही बाजूंनी सहमती व्यक्त करण्यात आली. जुलै 2023 मध्ये पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेल्या भारत-टांझानिया संयुक्त विशेष आर्थिक क्षेत्र टेहळणी सरावाबाबत दोन्ही बाजूंनी समाधान व्यक्त करण्यात आले, ज्यावेळी भारताच्या त्रिशूल या युद्धनौकेने झांजिबार आणि दार ए सलाम बंदरांना भेट दिली होती. ऑक्टोबर 2022 मध्ये तरकश या भारतीय युद्धनौकेच्या भेटीदरम्यान भारत आणि टांझानिया यांच्यात झालेल्या संयुक्त युद्धसरावाचे महत्त्व देखील दोन्ही बाजूंकडून विचारात घेण्यात आले.

14.टांझानियातील महत्वाच्या बंदरांच्या भारताने गेल्या काही वर्षात केलेल्या हायड्रोग्राफिक सर्वेक्षणाबद्दल टांझानियाने समाधान व्यक्त केले आहे. म्हणजेच, दोन्ही बाजूंनी, या क्षेत्रात सहकार्य कायम ठेवण्याबद्दल सहमती व्यक्त केली आहे.

15.दोन्ही देशांनी त्यांच्या लष्करी दलांमध्ये आंतर-कार्यान्वयन वाढवण्याबद्दलची सकारात्मकता व्यक्त केली. भारतीय नौकांकडून टांझानियातील बंदरावर नियमितपणे दूरध्वनी संवाद होत असतो हे नमूद करत, ऑक्टोबर 2022 मध्ये, भारतीय नौदलाची युद्धनौका आयएनएस तरकश मोझांबिक खाडीत आली असतांना, भारत, टांझानिया आणि मोझांबिक यांच्यातील पहिल्या त्रिपक्षीय संयुक्त सागरी युद्धसरावाच्या नियोजनाची त्यांनी प्रशंसा केली. 

16.भारत आणि टांझानिया यांच्यात व्हाईट शिपिंगसह संबंधित माहितीच्या देवाणघेवाणीसाठी झालेल्या तंत्रज्ञान कराराचे दोन्ही नेत्यांनी स्वागत केले. 

नील अर्थव्यवस्था

17.टांझानियाच्या सरकारने, नील अर्थव्यवस्थेच्या क्षेत्रात, भारत सरकारसोबत सहकार्य करण्यास इच्छुक असल्याचे सांगितले. यात पर्यटन, सागरी व्यवहार,सेवा आणि पायाभूत सुविधा, सागरी विज्ञानविषयक संशोधन, समुद्राच्या तळाशी खाणकामातील क्षमता, सागरी संवर्धन आणि सागरी सुरक्षा अशा विषयांचा समावेश आहे. हिंद महासागर क्षेत्र शांततामय, समृद्ध आणि शाश्वत राहील, यासाठी, भारत आणि टांझानिया यांच्यात, भारतीय ओशन रिम असोसिएशन (IORA) च्या आराखड्याअंतर्गत सहकार्य करण्याबाबत सहमती झाली.

व्यापार आणि गुंतवणूक

18.यावेळी दोन्ही बाजूंनी, द्विपक्षीय कराराची व्याप्ती वाढवण्याविषयीची कटिबद्धता व्यक्त केली, आणि हे साध्य करण्यासाठी, संबंधित अधिकाऱ्यांना व्यापाराची नवी क्षेत्रे शोधण्याविषयीच्या सूचना दिल्या.

दोन्ही बाजूनी, व्यापार विषयक डेटा अधिकाधिक सुसंगत केला जावा, तसेच द्विपक्षीय व्यापाराचा आकार वाढवण्यासाठी पुढाकार घेण्याचाही निर्णय झाला. व्यावसायिक शिष्टमंडळांच्या भेटी, व्यावसायिक प्रदर्शने आणि व्यावसायिक समुदायांशी संवाद आयोजित करून द्विपक्षीय व्यापार खंड आणखी वाढवण्यासाठी पुढाकार घ्यावा, असेही यावेळी ठरले.

19.टांझानियासाठी भारत पहिल्या पाच गुंतवणूक स्त्रोतांपैकी एक आहे, असे नमूद करत, टांझानियामध्ये भारताने 3.74 अब्ज डॉलर्सचे 630 गुंतवणूक प्रकल्प नोंदवले असून, त्यातून 60,000 नवे रोजगार निर्माण होणार आहेत, असेही सांगण्यात आले. दोन्ही बाजूंनी टांझानियामध्ये गुंतवणुकीसाठी भारतीय व्यावसायिकांमध्ये नव्याने निर्माण झालेल्या रुचीचे स्वागत केले. दोन्ही बाजूंनी टांझानियामध्ये गुंतवणूक पार्क उभारण्याच्या शक्यतेची चाचपणी करण्यावर सहमती व्यक्त केली. टांझानियाने  या संदर्भात पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

20.दोन्ही नेत्यांनी, स्थानिक चलनाचा वापर करत, द्विपक्षीय व्यापाराचा विस्तार करण्याची इच्छा व्यक्त केली. भारतीय रिझर्व बँकेने देशांच्या स्थानिक चलनांद्वारे म्हणजेच भारतीय रुपया आणि टांझानियाचे शिलिंग याद्वारे व्यापार/व्यवहार करण्याचा मार्ग खुला केला असून, भारतातील विशेष अधिकृत बँकांना, टांझानियातील बँकांची विशेष रूपी वोस्ट्रो अकाउंट्स (SRVA)खाती सुरू करण्याची परवानगी दिली आहे आणि या यंत्रणेचा वापर करत, होणारे व्यवहार करणे आधीच सुरू झाले आहे. ही व्यवस्था अशीच कायम सुरू राहावी, यासाठी, ज्या काही चिंता, अडचणी दूर करण्यासाठी, दोन्ही बाजूंनी सल्लामसलत सुरू ठेवावी यावर सहमती झाली.

21.कृषी क्षेत्रातील सहकार्य दोन्ही देशांतील संबंधांचा महत्वाचा स्तंभ असल्याचे, दोन्ही बाजूंनी नमूद केले. आणि त्याअंतर्गत, 98 टक्के उत्पादनांची भारतात  कर शुल्क माफीनुसार आयात केली जाते. ड्युटी फ्री टेरिफ प्राधान्य (DFTP) योजनेचा वापर करून शुल्कमुक्त केली जाते. टांझानियन काजू, चणे, मसाले, एवोकॅडो आणि इतर कृषी वस्तूंसाठी भारत ही एक प्रमुख बाजारपेठ आहे. दोन्ही बाजूंनी या क्षेत्रातील सहकार्याचे पुनरुज्जीवन करण्याचे मान्य केले.

विकास भागीदारी

22.टांझानियाने पाणी, आरोग्य, शिक्षण, क्षमता निर्माण, शिष्यवृत्ती आणि माहिती आणि दळणवळण तंत्रज्ञान (ICT) यासह इतर क्षेत्रात भारताच्या विकास भागीदारी विषयक सहकार्याची प्रशंसा केली.

23.भारताकडून टांझानियाला मिळणारी क्रेडिट लाइन्स (एलओसी) म्हणजे कर्ज देण्याच्या मर्यादेत, वाढ करून ती 1.1 अब्ज डॉलर्सपर्यन्त वाढवल्याबद्दल दोन्ही बाजूंनी समाधान व्यक्त केले. ही रक्कम, पिण्याच्या पाण्याच्या पायाभूत सुविधा, कृषी आणि संरक्षण क्षेत्रासाठी वापरली जात आहे.  विशेषत: टांझानियातील 24 शहरांमध्ये 500 डॉलर्स दशलक्ष किमतीचे जलप्रकल्प लाइन ऑफ क्रेडिट योजनेद्वारे कार्यान्वित केले जात आहेत. हे प्रकल्प एकदा पूर्ण झाल्यावर, या प्रदेशातील सुमारे 6 दशलक्ष रहिवाशांना पिण्याचे पाणी सहज उपलब्ध होईल.

24.भारताच्या शिष्यवृत्ती आणि क्षमता बांधणी कार्यक्रमाअंतर्गत, टांझानियाच्या मनुष्यबळ विकासासाठी मोठे योगदान दिले जात आहेत, याबद्दल टांझानियाच्या नेत्यांनी समाधान व्यक्त केले. भारत 2023-24 मध्ये दीर्घकालीन कार्यक्रमांसाठी क्षमता वाढीसाठी 450 भारतीय तांत्रिक आणि आर्थिक सहकार्य (ITEC) शिष्यवृत्ती आणि 70 भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद (ICCR) शिष्यवृत्ती देऊ करतो. भारताने 2023-24 या वर्षासाठी दीर्घकालीन शिष्यवृत्ती (ICCR) ची संख्या 70 वरून 85 पर्यंत वाढवण्याचा निर्णय जाहीर केला. ग्लोबल साउथसाठीच्या वचनबद्धतेचा एक भाग म्हणून, भारताने टांझानियासाठी 5 वर्षांच्या कालावधीत स्मार्ट पोर्ट्स, अवकाश, जैव तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, हवाई वाहतूक व्यवस्थापन इत्यादी सारख्या नवीन आणि उदयोन्मुख क्षेत्रात वापरण्यासाठी 1000 अतिरिक्त ITEC स्लॉट्सची घोषणा केली.

शिक्षण,कौशल्य विकास आणि आयसीटी विकास

25.भारताने, युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) आणि डिजिटल युनिक आयडेंटिटी (आधार) सह इंडिया स्टॅक अंतर्गत अंतराळ तंत्रज्ञान आणि डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात, टांझानियाला सहकार्याची ऑफर दिली.

26.पेम्बा, झांझिबार येथे व्यावसायिक प्रशिक्षण केंद्र (VTC) स्थापन करण्यासाठी आणि स्थानिक बाजारपेठेच्या मागणीवर आधारित अभ्यासक्रमांची रचना करण्यासाठी टांझानियाने, भारताच्या पाठिंब्याचे स्वागत केले. टांझानियन तरुणांना प्रशिक्षण आणि कौशल्य वाढ देण्यासाठी भारताच्या व्यावसायिक कौशल्य केंद्रांच्या धर्तीवर व्यावसायिक प्रशिक्षण संस्था स्थापन करण्याचा भारताने प्रस्ताव दिला.

27.दार एस सलाम ही तंत्रज्ञान संस्था आणि अरुषा येथील नेल्सन मंडेला विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्था (एनएमएआयएसटी) या ठिकाणी दोन आयसीटी केंद्रांची उभारणी करण्याच्या भारताच्या निर्णयाची टांझानियाने प्रशंसा केली. भारताने एनएम-एआयएसटी मधील आयसीटी केंद्राचे अद्ययावतीकरण केल्याबद्दल देखील टांझानियाने समाधान व्यक्त केले.

झांझिबार येथे भारतीय तंत्रज्ञान संस्था, मद्रास यांचे केंद्र

28.झांझिबार येथे भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी), मद्रास या संस्थेच्या पहिल्या परदेशी केंद्राची स्थापना होण्याचे महत्त्व दोन्ही नेत्यांनी मान्य केले. झांझिबार येथील आयआयटी संस्थेमध्ये आफ्रिकन खंडातील महत्त्वाचे तंत्रज्ञान केंद्र होण्याची क्षमता आहे यावर देखील त्यांचे एकमत झाले. या संस्थेतील विद्यार्थ्यांच्या पहिल्या तुकडीचे शैक्षणिक वर्ग याच महिन्यात सुरु होत आहेत याकडे देखील त्यांनी निर्देश केला. या संदर्भात भारताच्या कटिबद्धतेचे कौतुक करत टांझानियाने झांझिबार येथील आयआयटी संस्थेचा विकास तसेच टिकाव यांसाठी संपूर्ण सहकार्याची ग्वाही दिली.

 अंतराळ संशोधन क्षेत्रातील सहकार्य

29.भारताच्या चंद्रयान-3 ने 23 ऑगस्ट 2023 रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीपणे लँडिंग केल्याबद्दल टांझानियाच्या नेत्यांनी भारतीय नेत्यांचे अभिनंदन केले.

30.भारताने टांझानियाला अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रात सहकार्याचा हात देऊ केला, टांझानियाने भारताच्या या प्रस्तावाचे स्वागत केले.

आरोग्य

31.दोन्ही देशांनी आरोग्य क्षेत्रात एकमेकांना अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने सहकार्य देऊ करण्याबाबत ग्वाही दिली. टांझानियाचे आरोग्यमंत्री उम्मी एमवालीमू (एमपी) यांनी नुकताच म्हणजे जुलै 2023 मध्ये केलेला भारत दौरा तसेच आरोग्य क्षेत्रातील संधींची चाचपणी करण्याच्या उद्देशाने भारत आणि संयुक्त अरब अमिरात या दोन देशांच्या संयुक्त प्रतिनिधी मंडळाने ऑगस्ट 2022 मध्ये टांझानियाला दिलेली भेट यांचा उल्लेख देखील या नेत्यांनी केला. आरोग्य क्षेत्रातील परस्पर सहकार्यात आणखी वाढ करण्यासाठी अधिक सजगतेने कार्य करण्याला  दोन्ही बाजूंनी संमती दिली.

32.रुग्णांसाठी तत्पर वैद्यकीय सेवांची तरतूद करण्यात मदत करण्याच्या तसेच रुग्णालयातील पायभूत सुविधेला पाठबळ पुरवण्याच्या उद्देशाने भारत सरकारने टांझानिया देशाला दिलेल्या 10 रुग्णवाहिकांच्या देणगीची देखील टांझानियाच्या सरकारने प्रशंसा केली आहे.

33.टांझानिया देशाला देणगीस्वरूप देण्यात आलेले भाभाट्रॉन IIहे रेडीएशन उपचार देणारे यंत्र तसेच अत्यावश्यक औषधे आणि टांझानियातील 520 रुग्णांना लाभदायक ठरलेले कृत्रिम हातपाय बसविण्यासाठीचे शिबीर यांच्यासह इतर अनेक अनुदानित प्रकल्पांच्या अंमलबजावणीतील द्विपक्षीय सहकार्याच्या उत्कृष्ट कामगिरीचा देखील दोन्ही देशांच्या नेत्यांनी ठळकपणे उल्लेख केला.  

दोन्ही देशांच्या जनतेचे परस्पर संबंध आणि सांस्कृतिक देवाणघेवाण

34.दोन्ही देशांतील जनतेचे आपापसांतील संबंध, सांस्कृतिक देवाणघेवाण, शैक्षणिक दुवे तसेच पर्यटन यांचे महत्त्व दोन्ही नेत्यांनी अधोरेखित केले.टांझानियात स्थायिक झालेल्या आणि दोन्ही देशांना जोडणाऱ्या सेतूचे कार्य करणाऱ्या तसेच टांझानियाच्या अर्थव्यवस्थेसाठी आणि समाजासाठी  लक्षणीय योगदान देणाऱ्या विशाल भारतीय समुदायाच्या योगदानाचे त्यांनी कौतुक केले.

35.भारत आणि टांझानिया या दोन्ही देशांच्या नेत्यांनी सांस्कृतिक देवाणघेवाणीतील सहकार्य अधिक वाढवण्याला संमती दिली आणि वर्ष 2023-27 या कालावधीत राबवण्यात येणार असलेल्या सांस्कृतिक देवाणघेवाण कार्यक्रमाच्या करारावर स्वाक्षऱ्या झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला.दिल्लीतील राष्ट्रीय राजधानी क्षेत्र म्हणून प्रसिद्ध असलेल्या फरीदाबादमधील सूरजकुंड येथे फेब्रुवारी 2024 मध्ये भरणार असलेल्या सूरजकुंड मेळाव्यात भागीदार देश म्हणून सहभागी होण्याचे आमंत्रण भारताकडून देण्यात आले.

36.दोन्ही देशांच्या सांस्कृतिक संघांमध्ये सध्या सुरु असलेल्या देवाणघेवाणीचा उल्लेख करून दोन्ही नेत्यांनी या देशांतील सांस्कृतिक देवाणघेवाणीचे प्रमाण वाढवण्यासाठी प्रोत्साहन दिले.

37.टांझानिया देशात कबड्डी खेळाची वाढती लोकप्रियता लक्षात घेऊन तेथे दोन भारतीय कबड्डी प्रशिक्षकांची नेमणूक केल्याबद्दल टांझानियाच्या नेत्यांनी भारत सरकारचे आभार मानले आहेत.

38.दोन्ही देशांतील विद्यापीठे तसेच विचारवंत गटांमधील सहकारी संबंध अधिक दृढ करण्याबाबत नेत्यांचे एकमत झाले.

क्षेत्रीय समस्या

39.टांझानिया सरकारने जुलै आणि सप्टेंबर 2023 या महिन्यांमध्ये अनुक्रमे आफ्रिकन ह्युमन कॅपिटल हेड्स ऑफ स्टेट शिखर परिषद आणि आफ्रिका फूड सिस्टिम्स शिखर परिषद या दोन प्रमुख शिखर परिषदांचे यजमानपद यशस्वीपणे निभावल्याबद्दल भारत सरकारने टांझानियाचे अभिनंदन केले.

आंतरराष्ट्रीय समस्या

40.भारत सरकारचा पूर्व आफ्रिकी समुदायाशी (ईएसी) संवाद वाढवण्यासाठी केलेल्या मदतीबद्दल भारतीय नेत्यांनी टांझानिया सरकारचे आभार मानले.

41.आंतरराष्ट्रीय मंचावर दोन्ही देशांमध्ये अनेक बाबतीत एकसारखेपणा आहे ही बाब दोन्ही देशांच्या नेत्यांनी अधोरेखित केली. संयुक्त राष्ट्रांच्या शांतता प्रस्थापित करण्यासाठीच्या उपक्रमांमध्ये दोन्ही देशांनी सक्रीय सहभाग घेतला आहे आणि क्षेत्रीय सुरक्षाविषयक उपक्रमांमध्ये देखील योगदान दिले आहे . याची यावेळी नोंद घेण्यात आली. सदर्न आफ्रिकन विकास समुदायाच्या (एसएडीसी) संरक्षणाखाली लागू करण्यात आलेल्या शांतता विषयक कारवायांमध्ये टांझानिया देशाने दिलेल्या योगदानाची दोन्ही देशांच्या नेत्यांनी नोंद घेतली. 

42.सदस्यत्वाच्या दोन श्रेणींच्या विस्ताराच्या माध्यमातून संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेची पुनर्रचना करण्याची गरज आहे यावर भारत आणि टांझानिया या दोघांनी सहमती व्यक्त केली.  2021-22 या कालावधीत युएनएससीचा अस्थायी सदस्य म्हणून भारताच्या कार्यकाळात टांझानियाने पुरवलेल्या पाठबळासाठी तसेच 2028-29 मध्य युएनएससीचा अस्थायी सदस्य म्हणून भारताच्या उमेदवारीला दिलेल्या पाठींब्यासाठी भारताने टांझानियाची आभार मानले आहे.

43.भारताच्या जी-20 समूहाच्या यशस्वी अध्यक्षतेबद्दल तसेच सप्टेंबर 2023 मध्ये झालेल्या जी-20 नेत्यांच्या शिखर परिषदेत जी-20 नवी दिल्ली नेत्यांचा जाहीरनामा स्वीकारल्याबद्दल टांझानियाच्या नेत्यांनी भारताचे अभिनंदन केले. याच शिखर परिषदेमध्ये जी-20 समूहाच्या नेत्यांनी आफ्रिकी महासंघाला (एयु) जी-20 समूहाचा स्थायी सदस्य म्हणून मान्यता देऊन स्वागत केले. भारताच्या जी-20 अध्यक्षतेला दिलेल्या पाठींब्याबद्दल तसेच जानेवारी 2023 मध्ये झालेल्या व्हॉईस ऑफ ग्लोबल साऊथ शिखर परिषदेतील सहभागाबद्दल  भारत सरकारने टांझानियाचे कौतुक केले. जी-20 समूहामध्ये एयुचा प्रवेश झाल्यामुळे प्रमुख जागतिक मंचावर बहुपक्षीय आर्थिक सहकार्यासाठी आफ्रिकेचा आवाज बुलंद करण्याच्या दिशेने मोठे पाऊल उचलले आहे आणि या समावेशामुळे आफ्रिकेला मोठा लाभ होणार आहे याचा टांझानियाच्या नेत्यांनी आवर्जून उल्लेख केला.

44.इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स (आयबीसीए) अर्थात आंतरराष्ट्रीय महाकाय मार्जार आघाडी तसेच जागतिक जैवइंधन आघाडी (जीबीए) या उपक्रमांमध्ये सहभागी होण्याच्या टांझानिया सरकारच्या निर्णयाचे भारत सरकारने स्वागत केले असून आता टांझानिया देश आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधा (सीडीआरआय) उभारण्यासाठीच्या युतीचे देखील सदस्यत्व स्वीकारेल याची भारत उत्सुकतेने प्रतीक्षा करत आहे.

45.दोन्ही देशांच्या नेत्यांनी सर्व प्रकारच्या दहशतवादाचा आणि त्याच्या प्रकटीकरण पद्धतींचा, जे लोक जेव्हा जेव्हा, जेथे जेथे दहशतवादी कारवाया करतील त्यांचा, तसेच सीमापार दहशतवाद पसरवण्यासाठी दहशतवादी विचारांचा वापर करणाऱ्या सर्व घटकांचा तीव्र निषेध केला. दहशतवाद ही जागतिक शांतता, सुरक्षितता आणि स्थैर्य यांच्यासाठी गंभीर धोका निर्माण करणाऱ्या बाबींपैकी महत्त्वाची बाब असून त्याचा सामना अत्यंत गंभीरतेने केला पाहिजे यावर दोन्ही देशांच्या नेत्यांनी सहमती व्यक्त केली.

46.टांझानियाच्या अध्यक्ष सामिया सुलुहू हसन यांनी त्यांच्या स्वतःच्या तसेच त्यांच्यासोबत आलेल्या शिष्टमंडळाचे स्नेहार्द स्वागत आणि उत्तम आदरातिथ्य केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रशंसा केली आहे. अध्यक्ष सामिया सुलुहू हसन भारतभेटीवर आल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे आभार मानले असून त्यांना उत्तम आरोग्य लाभो तसेच टांझानियातील मैत्रीपूर्ण जनतेला समृद्धी लाभो अशी सदिच्छा व्यक्त केली.

 

NM/SP/Shailesh P/Radhika/Sanjana/PM

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 



(Release ID: 1967237) Visitor Counter : 116