आयुष मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पश्चिम विभागातील सहा राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या प्रादेशिक आढावा बैठकीचे केंद्रीय आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या हस्ते उद्‌घाटन


जन भागीदारीच्या माध्यमातून सगळ्यांना एकत्र आणून आपण आयुषला जनचळवळ बनवू शकतो : सर्बानंद सोनोवाल

Posted On: 09 OCT 2023 6:22PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 9 ऑक्टोबर 2023

राष्ट्रीय आयुष अभियानासंदर्भात पूर्व, मध्य आणि दक्षिण विभागानंतर सलग  चौथी प्रादेशिक आढावा बैठक  पश्चिम विभागातील सहा राज्ये/केंद्रशासित प्रदेशांसाठी  आज मुंबईत आयोजित करण्यात आली होती. यात राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, गोवा या राज्यांमधून आणि  अंदमान आणि निकोबार बेटे, दादरा आणि नगर हवेली, दमण आणि दीव या  केंद्रशासित प्रदेशांमधून आयुषचे अधिकारी आणि प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते.

या बैठकीचे उद्घाटन केंद्रीय आयुष आणि बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्री  सर्बानंद सोनोवाल यांनी केले. केंद्रीय आयुष आणि महिला आणि बाल विकास राज्यमंत्री डॉ मुंजपारा महेंद्रभाई यांच्यासह आयुष सचिव वैद्य  राजेश कोटेचा हे देखील यावेळी उपस्थित होते.

देशभरात आयुष आरोग्य सेवा सुविधेला बळकट करून आणि सुधारित करून, गरजू जनतेला माहितीपूर्ण पर्याय उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीकोनातून आणि उद्दिष्टांसह राष्ट्रीय आयुष अभियानाची  अंमलबजावणी करण्यात येत आहे.", असे आयुष मंत्रालयाचा प्रमुख कार्यक्रम म्हणून राष्ट्रीय आयुष अभियानाबद्दल  बोलताना   सर्बानंद सोनोवाल यांनी सांगितले.

जन भागीदारीच्या माध्यमातून  आरोग्य सेवा तळागाळापर्यंत उपलब्ध करून देण्यासाठी राष्ट्रीय आयुष अभियानाच्या  माध्यमातून राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना देण्यात येणारे  सहाय्य योग्य प्रकारे मार्गी लावणे  ही एक सामायिक जबाबदारी आहे. ", असे सोनोवाल यांनी आयुष सर्वांसाठी उपलब्ध करून देण्याचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले.

केंद्रीय मंत्र्यांनी यावेळी बोलताना एकात्मिक आरोग्य सेवेवर भर दिला आणि  लोकांना सर्वोत्तम आरोग्य सेवा देण्यासाठी आधुनिक आणि पारंपरिक औषध प्रणाली या दोन्ही प्रणालींचा वापर करावा लागेल . "असे त्यांनी सांगितले.

पारंपरिक औषधांचा प्रचार  करताना  जागतिक आरोग्य संघटना आणि भारत सरकारची भूमिकाही  केंद्रीय मंत्र्यांनी अधोरेखित केली. गुजरातच्या जामनगरमध्ये पारंपरिक औषधांच्या जागतिक केंद्राच्या स्थापनेने वैज्ञानिक विकास आणि  पुराव्यावर आधारित भारतातील पारंपरिक औषध प्रणालीची नवी क्षितीजे खुली झाली आहेत. राष्ट्रीय आयुष अभियाना सारख्या प्रमुख कार्यक्रमाद्वारे आपण  पारंपरिक औषधांचे फायदे देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचतील, हे सुनिश्चित करत आहोत ,असे त्यांनी सांगितले.

यावेळी, केंद्रीय मंत्री डॉ. मुंजपरा महेंद्रभाई म्हणाले, या प्रसंगी, आपल्याला कार्यक्रमाच्या मूल्याचे अधिक अर्थपूर्ण परिमाण म्हणून उत्पादनापेक्षा परिणामांवर अधिक भर द्यायला लागेल असे मला वाटते. आम्‍हाला आमच्‍या कार्यप्रदर्शनाची योजना, अंमलबजावणी आणि अहवाल देण्‍यासाठी आमच्‍या रणनीती आणि तंत्रांची पुनर्रचना करण्‍याची आवश्‍यकता असू शकते ज्यामुळे परिणामांचे मोजमाप सुलभ होते. मला खात्री आहे की अशा चर्चांमुळे आपल्याला परस्परांच्या सर्वोत्तम पद्धतींमधून आत्मसात करण्याची आणि आपल्या सर्वांमध्ये दृढ बंध निर्माण करण्याची संधी मिळेल.

आयुष मंत्रालयाचे सचिव वैद्य राजेश कोटेचा, राष्ट्रीय आयुष अभियानासाठी घेतलेल्या प्रादेशिक आढावा बैठकींबद्दल तपशील सामायिक करताना म्हणाले, राष्ट्रीय आयुष अभियान ही आयुष मंत्रालयाची पथदर्शी योजना आहे जी राज्य/केंद्रशासित प्रदेश सरकारांमार्फत देशात आयुष प्रणालीच्या विकासासाठी आणि प्रोत्साहनासाठी राबविण्यात येत आहे. राष्ट्रीय आयुष अभियान योजनेसाठी अर्थसंकल्पीय तरतुद देखील 800 कोटी रुपयांवरून 1200 कोटी रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. मंत्रालयाने सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांसोबत स्वतंत्र आढावा बैठका आयोजित केल्या ज्यात विविध राज्ये/केंद्रशासित प्रदेशांचे वरिष्ठ अधिकारी, आयुक्त आणि अभियान संचालक उपस्थित होते आणि आढाव्यादरम्यान फलदायी चर्चा झाली.

आयुष मंत्रालयाच्या सह सचिव, कविता गर्ग यांनी आयुषच्या आतापर्यंतच्या प्रगतीबद्दल आणि 2025 साठी आयुषच्या रुपरेषेबाबत सादरीकरण केले.

उद्घाटन सत्राची सांगता 5 मिनिटांच्या वाय-ब्रेक (योग ब्रेक) कॉमन योगा प्रोटोकॉलने झाली.

कार्यक्रमात नंतर संवादात्मक सत्र झाले ज्यामध्ये महाराष्ट्र, गोवा, राजस्थान, गुजरात, अंदमान आणि निकोबार तसेच दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव यांनी आपापल्या क्षेत्रातील राष्ट्रीय आयुष मिशनचा तपशीलवार आढावा सादर केला आणि माहितीच्या देवाणघेवाणीचा भाग म्हणून ठळक मुद्दे, पुढील वाटचाल, यशोगाथा इत्यादींवर विचारमंथन केले.

आयुष मंत्रालयाच्या सहभागी संशोधन परिषद/राष्ट्रीय संस्थांद्वारे प्रात्यक्षिकांचे सादरीकरण झाले आणि सर्व सहभागींनी विश्राम काळात वाय-ब्रेक हा पाच मिनिटांचा सामान्य योग देखील केला.

N.Chitale/Sonal C/Vasanti/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1966058) Visitor Counter : 142