युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
गोवा 37 व्या राष्ट्रीय क्रीडा सपर्धांचे यजमानपद भूषवणार; यंदा विक्रमी 43 क्रीडा प्रकारांचा समावेश
Posted On:
06 OCT 2023 6:53PM by PIB Mumbai
पणजी - 6 ऑक्टोबर , 2023
विक्रमी 43क्रीडा प्रकारांचा समावेश असलेल्या 37 व्या राष्ट्रीय खेळांचे यजमानपद भूषवून इतिहास रचण्यासाठी गोवा सज्ज झाले आहे, असे गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि क्रीडा मंत्री गोविंद गावडे यांनी म्हटले आहे. ते आज वार्ताहर परिषदेत बोलत होते. खेळाडूंचे क्रीडानैपुण्य, सौहार्द यांचा हा उत्सव होणार असून अनेक रोमांचक क्रीडाप्रकारांचा समावेश हे या स्पर्धांचे वैशिष्ट्य ठरणार आहे. या आधीच्या गुजरातमधल्या स्पर्धांमध्ये 36 तर केरळ येथे 2015 मध्ये झालेल्या स्पर्धांमध्ये 33 क्रीडाप्रकार होते. यंदाच्या राष्ट्रीय खेळांमध्ये सर्वाधिक क्रीडाप्रकार आहेत.
ऑलिम्पिक शैलीप्रमाणे बहुविध क्रीडाप्रकार पाहायला मिळणार असून यात 28 राज्ये आणि 8 केंद्रशासित प्रदेश सहभागी होणार आहेत. या स्पर्धा 26 ऑक्टोबर ते 9 नोव्हेंबर या कालावधीत होणार आहेत. सायकल आणि गोल्फ यांचे आयोजन दिल्लीत केले जाणार असून इतर स्पर्धाप्रकार गोव्यात वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित केले जाणार आहेत.
37 व्या राष्ट्रीय खेळांमध्ये पदकांसाठी अनेक क्रीडाप्रकार प्रथमच खेळवण्यात येणार असून यात किनाऱ्यावरचा (बीच) फुटबॉल, रोल बॉल, गोल्फ, किक व्हॉलीबॉल , स्क्वे मार्शल आर्ट्स, कलरीपायट्टू आणि पेनकॅक सिलाट यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त शिडाच्या जहाजांची शर्यंत आणि तायक्वांडो गेल्या वेळेस वगळण्यात आले होते, यंदा त्यांचा पुन्हा समावेश करण्यात येत आहे. परंपरा जपण्यासाठी लगोरी आणि गतका या खेळांचा प्रात्यक्षिक खेळ म्हणून समावेश करण्यात आला आहे.
भारतीय ऑलिंपिक संघटनेच्या राष्ट्रीय खेळ तांत्रिक आचरण समितीचे (GTCC) अध्यक्ष अमिताभ शर्मा यांनी या स्पर्धेत 10,000 हून अधिक खेळाडूंचे क्रीडानैपुण्य पाहण्याचे आवाहन केले आहे. या स्पर्धा क्रीडाप्रतिभेचे सर्वात भव्य प्रदर्शन पाहायला मिळणार असून खिलाडूवृत्ती आणि वैविध्याचे साक्षीदार होण्यासाठी आम्ही देशाला आमंत्रित करत असल्याचे त्यांनी सांगितले.
***
S.Bedekar/S.Kakade/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1965203)
Visitor Counter : 204