पंतप्रधान कार्यालय

राजस्थानमधल्या जोधपूर येथे विविध प्रकल्पांच्या पायाभरणी समारंभात पंतप्रधानांनी केलेले भाषण.

Posted On: 05 OCT 2023 1:03PM by PIB Mumbai

मंचावर उपस्थित राजस्थानचे राज्यपाल श्री कलराज मिश्रा, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी आणि या भूमीचे सेवक भाई गजेंद्र सिंह शेखावत, कैलाश चौधरी, राजस्थान सरकारचे मंत्री भाई भजनलाल, खासदार आणि भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष श्री. सी.पी. जोशी, आमचे इतर खासदार, सर्व लोकप्रतिनिधी, आणि सभ्य स्त्री-पुरूषहो!

सर्वप्रथम मी सूर्यनगरी, मंडोर, वीर दुर्गादास राठोड जी यांच्या या वीर भूमीला शत शत नमन करतो. मारवाडची पवित्र भूमी असलेल्या जोधपूरमध्ये आज अनेक मोठ्या विकासकामांचे उद्घाटन आणि पायाभरणी झाली आहे. राजस्थानच्या विकासासाठी आपण गेल्या नऊ वर्षांमध्ये सातत्याने केलेल्या प्रयत्नांचे परिणाम आज आपण सर्वजण अनुभवत आहोत आणि पाहत आहोत. या विकास कामांसाठी मी तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो.

मित्रहो

राजस्थान हे असे राज्य आहे जिथे प्राचीन भारताचे वैभव पाहायला मिळते. येथे भारताचे शौर्य, समृद्धी आणि संस्कृती दिसून येते. जोधपूरमध्ये काही काळापूर्वी झालेल्या G-20 बैठकीचे कौतुक, जगभरातून आलेल्या पाहुण्यांनी केले. आपल्या देशातील लोक असोत किंवा परदेशी पर्यटक, प्रत्येकाला एकदा तरी सूर्यनगरी जोधपूरला भेट देण्याची इच्छा असते. प्रत्येकाला इथला वालुकामय प्रदेश, मेहरानगड आणि जसवंत थडा बघायचा इच्छा असते, इथल्या हस्तकलेबद्दल खूप उत्सुकता असते. त्यामुळे भारताच्या गौरवशाली भूतकाळाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या राजस्थानने भारताच्या भविष्याचेही प्रतिनिधित्व करावे हे महत्त्वाचे आहे. मेवाड पासून मारवाड पर्यंत, संपूर्ण राजस्थान जेव्हा विकासाच्या उंचीवर पोहोचेल आणि येथे आधुनिक पायाभूत सुविधा निर्माण होतील, तेव्हाच हे शक्य होईल. बाडमेर मार्गे बिकानेर ते जामनगर जाणारा एक्सप्रेस वे कॉरिडॉर,  दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्ग, ही राजस्थानमधील आधुनिक आणि हाय-टेक पायाभूत सुविधांची उदाहरणे आहेत. भारत सरकार आज राजस्थानमध्ये रेल्वे आणि रस्त्याबरोबरच प्रत्येक क्षेत्रात वेगाने काम करत आहे.

यावर्षी अर्थसंकल्पात राजस्थानमध्ये रेल्वेच्या विकासासाठी अंदाजे सुमारे साडे नऊ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.  ही तरतूद मागील सरकारच्या वार्षिक सरासरी तरतुदीच्या 14 पट जास्त आहे. आणि मी राजकीय विधान करत नाही, तर खरी माहिती देतो ​​आहे, नाहीतर मीडियाचे लोक लिहितील, मोदींचा मोठा हल्ला. स्वातंत्र्यानंतरच्या इतक्या दशकांमध्ये, 2014 सालापर्यंत, राजस्थानमध्ये केवळ 600 किलोमीटर रेल्वे मार्गांचे विद्युतीकरण करण्यात आले. गेल्या 9 वर्षांत 3 हजार 700 किलोमीटरपेक्षा जास्त रेल्वेमार्गाचे विद्युतीकरण करण्यात आले आहे. डिझेल इंजिनांऐवजी इलेक्ट्रिक इंजिन असलेल्या गाड्या त्यावर धावतील. त्यामुळे राजस्थानमधील प्रदूषण कमी होईल आणि हवाही सुरक्षित राहील. अमृत ​​भारत स्टेशन योजनेअंतर्गत आम्ही राजस्थानमधील 80 पेक्षा जास्त रेल्वे स्थानकांचा आधुनिकीकरणासह विकास करत आहोत. आपल्याकडे मोठे विमानतळ बनवण्याची पद्धत आहे, तिथे मोठे लोक जातात, पण मोदींचे विश्व वेगळेच आहे. जिथे गरीब आणि मध्यमवर्गीय लोक जातात, ते रेल्वे स्टेशन मी विमानतळापेक्षाही चांगले बनवणार आहे आणि त्यात जोधपूर रेल्वे स्टेशनचाही समावेश आहे.

बंधु आणि भगिनिंनो,

आज सुरू झालेल्या रस्ते आणि रेल्वे प्रकल्पांमुळे या विकास मोहिमेला आणखी चालना मिळणार आहे. या रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणामुळे प्रवासाचा वेळ कमी होऊन सुविधाही वाढणार आहेत. मला जैसलमेर-दिल्ली एक्स्प्रेस ट्रेन आणि मारवाड-खांबळी घाट रेल्वेला हिरवा झेंडा दाखवण्याचा बहुमान मिळाला आहे. आणि काही दिवसांपूर्वी मला वंदे भारतसाठीही हिरवा झेंडा दाखवण्याचीही संधी मिळाली होती. आज येथे तीन रस्ते प्रकल्पांची पायाभरणीही झाली. आज जोधपूर आणि उदयपूर विमानतळाच्या नवीन पॅसेंजर टर्मिनल इमारतीची पायाभरणी करण्यात आली. या सर्व विकासकामांमुळे या भागातील स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळणार असून रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होणार आहेत. यामुळे राजस्थानमधील पर्यटन क्षेत्रालाही नवी ऊर्जा मिळण्यास मदत होणार आहे.

मित्रहो,

वैद्यकीय आणि अभियांत्रिकी शिक्षणाच्या क्षेत्रात आपल्या राजस्थानची स्वतःची वेगळी ओळख आहे. कोटाने देशाला अनेक डॉक्टर आणि अभियंते दिले आहेत. शिक्षणाबरोबरच वैद्यकीय आणि अभियांत्रिकीच्या बाबतीत नवीन उंची गाठण्यासाठी राजस्थानला सर्वोत्तम केंद्र बनवण्याचा आमचा प्रयत्न आहे. यासाठी एम्स जोधपूरमध्ये ट्रॉमा, इमर्जन्सी आणि क्रिटिकल केअरसाठी प्रगत सुविधा विकसित केल्या जात आहेत. पंतप्रधान आयुष्मान भारत इन्फ्रास्ट्रक्चर मिशन अंतर्गत जिल्हा रूग्णालयांमध्ये क्रिटिकल केअर ब्लॉक्सही बांधले जात आहेत. एम्स जोधपूर आणि आयआयटी जोधपूर आज केवळ राजस्थानमध्येच नाही तर संपूर्ण देशातील प्रमुख संस्था बनत आहेत, याचा मला मनापासून आनंद आहे.

एम्स आणि आयआयटी जोधपूर यांनी एकत्रितपणे वैद्यकीय तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात नवीन शक्यतांवर काम सुरू केले आहे. रोबोटिक सर्जरीसारखे हायटेक वैद्यकीय तंत्रज्ञान भारताला संशोधन आणि उद्योग क्षेत्रात नवीन उंचीवर घेऊन जात आहे. यामुळे वैद्यकीय पर्यटनालाही चालना मिळणार आहे.

मित्रहो,

राजस्थान ही निसर्गावर आणि पर्यावरणावर प्रेम करणाऱ्या लोकांची भूमी आहे. आज अवघ्या जगाला ज्या जीवनशैलीचे अनुसरण करायचे आहे, ती जीवनशैली शतकानुशतके गुरु जांभेश्वर आणि बिष्णोई समाजाने अनुसरण करत जपली आहे. आपल्या या वारशाच्या आधारे आज भारत अवघ्या जगाला मार्गदर्शन करत आहे. आमचे हे प्रयत्न विकसित भारताचा आधार बनतील, असा विश्वास मला वाटतो. आणि भारताचा विकास तेव्हाच होईल जेव्हा राजस्थानचा विकास होईल. आपण सर्वांनी मिळून राजस्थानचा विकास करून त्याला समृद्ध करायचे आहे. या संकल्पासह, या कार्यक्रमाच्या व्यासपीठाला काही मर्यादा आहेत, त्यामुळे मी येथे तुमचा जास्त वेळ घेणार नाही. यानंतर मी मोकळ्या मैदानात जाणार आहे, तिथली मनस्थिती वेगळी आहे, वातावरणही वेगळे आहे, उद्देशही वेगळा आहे, मग काही मिनिटांनी आपण तिथे मोकळ्या मैदानात भेटू. अनेकानेक आभार!

***

NM/Madhuri/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1964910) Visitor Counter : 99