युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2023 साठी केंद्र सरकारच्या युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने मागवले अर्ज
Posted On:
04 OCT 2023 10:05PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 ऑक्टोबर 2023
केंद्र सरकारच्या युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2023 साठी पात्र खेळाडू/ प्रशिक्षक/ संस्था/ विद्यापीठांकडून अर्ज मागवले आहेत. संबंधित पोर्टलवर फक्त ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येतील.
पुरस्कार मार्गदर्शक तत्त्वांनुसार पात्र असलेल्या अर्जदारांना अधिकारी/व्यक्तींच्या शिफारशीशिवाय केवळ dbtyas-sports.gov.in या पोर्टलवर वैयक्तिकपणे ऑनलाइन अर्ज करण्याची परवानगी आहे.
ऑनलाइन अर्ज करताना कोणतीही समस्या आली तर अर्जदार क्रीडा विभागाशी sportsawards-moyas[at]gov[dot]in या ईमेल आयडीवर किंवा 011-23387432 या दूरध्वनीवर कामकाजाच्या दिवशी सकाळी 9 ते सायंकाळी 5.30 पर्यंत किंवा टोल फ्री क्रमांक 1800-202-5155, 1800258-5155 (कोणत्याही कामाच्या दिवशी सकाळी 8 ते रात्री 8 दरम्यान) संपर्क साधू शकतात
पुरस्कारासाठी पात्र खेळाडूंचे अर्ज dbtyas-sports.gov.in या पोर्टलवर 2 नोव्हेंबर 2023 पर्यंत रात्री 11.59 वाजेपर्यंत सादर करणे आवश्यक आहे. अंतिम तारखेनंतर आलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही.
क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत त्यांना सन्मानित करण्यासाठी दरवर्षी हे पुरस्कार दिले जातात. चार वर्षांपेक्षा जास्त कालावधीत क्रीडा क्षेत्रातील नेत्रदीपक आणि उत्कृष्ट कामगिरीसाठी एखाद्या खेळाडूला मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार दिला जातो; चार वर्षांच्या सातत्यपूर्ण उत्कृष्ट कामगिरीसाठी अर्जुन पुरस्कार दिला जातो; प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये पदक विजेते घडवणाऱ्या प्रशिक्षकांना द्रोणाचार्य पुरस्कार दिला जातो तर ध्यानचंद पुरस्कार क्रीडा विकासासाठी आयुष्यभर केलेल्या योगदानासाठी दिला जातो. क्रीडा संवर्धन आणि विकासाच्या क्षेत्रात लक्षणीय भूमिका बजावलेल्या कॉर्पोरेट संस्था आणि व्यक्तींना राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार दिला जातो. मौलाना अबुल कलाम आझाद (माका) ट्रॉफी आंतर-विद्यापीठ स्पर्धांमध्ये एकुणात सर्वोच्च कामगिरी करणाऱ्या विद्यापीठाला दिली जाते.
केंद्र सरकारचे युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय दरवर्षी क्रीडा पुरस्कारांसाठी अर्ज मागवते. 2023 च्या या क्रीडा पुरस्कारांसाठी अर्ज मागवण्यासाठीच्या अधिसूचना www.yas.nic.in. या संकेतस्थळावर मंत्रालयानं अपलोड केल्या आहेत. भारतीय ऑलिम्पिक संघटना/ भारतीय क्रीडा प्राधिकरण/ मान्यताप्राप्त राष्ट्रीय क्रीडा महासंघ/ क्रीडा प्रोत्साहन मंडळे /राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील सरकारे इत्यादींना त्यानुसार सूचित केले आहे.
N.Chitale/P.Jambhekar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1964405)
Visitor Counter : 472