वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

भारत सरकारने राष्ट्रीय हळद मंडळाची स्थापना केली अधिसूचित


राष्ट्रीय हळद मंडळ हळदीबाबतची जागरुकता आणि त्याचा वापर वाढवणार

हळदीची निर्यात वाढवण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर नवीन बाजापेठ विकसित करणार

Posted On: 04 OCT 2023 8:30PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 4 ऑक्टोबर 2023

भारत सरकारने आज राष्ट्रीय हळद मंडळाची  स्थापना अधिसूचित केली. राष्ट्रीय हळद मंडळ देशातील हळद आणि हळद उत्पादनांच्या विकासावर आणि वाढीवर लक्ष केंद्रित करेल.

राष्ट्रीय हळद मंडळ हळदीशी संबंधित विषयांवर नेतृत्व प्रदान करेल, प्रयत्नांना चालना देईल, आणि हळद क्षेत्राचा विकास आणि वृद्धीसाठी मसाले मंडळ आणि इतर सरकारी संस्थांमधील  समन्वय सुधारायला मदत करेल.

आरोग्य आणि निरामय जीवनामध्ये हळदीचे असलेले महत्व जग ओळखत असून, हळदीबाबत जागरुकता आणि त्याचा वापर वाढवण्यासाठी, निर्यातीला चालना देण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर नवीन बाजारपेठ विकसित करण्यासाठी, नवीन उत्पादनांचे संशोधन आणि विकासाला चालना देण्यासाठी आणि आपल्या पारंपारिक ज्ञानाच्या आधारावर हळदीपासून मूल्यवर्धित उत्पादने विकसित करण्यासाठी, हळद मंडळ काम करेल. विशेषत: मूल्यवर्धना द्वारे अधिक फायदे मिळवण्यासाठी हळद उत्पादकांचा क्षमता विकास आणि कौशल्य विकासावर ते  लक्ष केंद्रित करेल. मंडळ गुणवत्ता आणि अन्न सुरक्षा मानकांना आणि त्याच्या पालनाला प्रोत्साहन देईल. मानवतेसाठी हळदीच्या पूर्ण क्षमतेचे संवर्धन करून, त्याचा पुरेपूर वापर करण्यासाठी मंडळ आवश्यक पावले उचलेल.  

या क्षेत्रावर लक्ष केंद्रित  करून हळद मंडळाने हाती घेतलेल्या विविध उपक्रमांच्या मदतीने हळद उत्पादकांना चांगली मिळकत होईल  आणि त्यांच्या कल्याणाला आणि समृद्धीला हातभार लागेल. 

हळद मंडळामध्ये केंद्र सरकारद्वारे नियुक्त केले जाणारे अध्यक्ष, आयुष मंत्रालय, केंद्र सरकारच्या औषधनिर्माण विभाग, कृषी आणि शेतकरी कल्याण, वाणिज्य आणि उद्योग विभागातील सदस्य, तीन राज्यांतील राज्य सरकारचे वरिष्ठ प्रतिनिधी (फिरत्या तत्त्वावर), संशोधनात सहभागी असलेल्या राष्ट्रीय/राज्य स्तरीय निवडक संस्था, हळद उत्पादक शेतकरी आणि निर्यातदार यांचे प्रतिनिधी, आणि वाणिज्य विभागाद्वारे नियुक्त केलेले सचिव यांचा समावेश असेल.

भारत हा हळदीचा जगातील सर्वात मोठा उत्पादक, ग्राहक आणि निर्यातदार आहे. सन 2022-23 मध्ये, भारतात 3.24 लाख हेक्टर क्षेत्र हळद लागवडीखाली होते, ज्याचे उत्पादन 11.61 लाख टन (जगातील हळद उत्पादनाच्या 75% पेक्षा जास्त) इतके होते. भारतात हळदीच्या 30 पेक्षा जास्त जातींची लागवड केली जाते आणि देशातील 20 पेक्षा जास्त राज्यांमध्ये हळदीची शेती केली जाते. महाराष्ट्र, तेलंगणा, कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये हळदीचे सर्वात जास्त उत्पादन होते.

हळदीच्या जागतिक व्यापारात भारताचा वाटा 62% पेक्षा जास्त आहे. 2022-23 मध्ये, 380 पेक्षा जास्त निर्यातदारांनी 207.45 दशलक्ष डॉलर्स मूल्याची 1.534 लाख टन हळद आणि हळदीची उत्पादने निर्यात केली. बांगलादेश, युएई, युएसए आणि मलेशिया ही भारतीय हळदीच्या निर्यातीची प्रमुख बाजारपेठ आहे. हळद मंडळाच्या उद्दिष्ट केंद्रित उपक्रमांमुळे 2030 पर्यंत हळदीची निर्यात एक अब्ज डॉलर्सवर पोहोचेल अशी अपेक्षा आहे.

 

N.Chitale/R.Agashe/P.Malandkar

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1964356) Visitor Counter : 889