जलशक्ती मंत्रालय
जम्मू काश्मीर मध्ये ‘वॉर अगेन्स्ट वेस्ट’ म्हणजेच ‘कचऱ्याविरुद्ध लढा’ अभियानाचे सदिच्छादूत म्हणून परमवीर चक्र विजेते कॅप्टन बाना सिंग यांची नियुक्ती
Posted On:
30 SEP 2023 4:08PM by PIB Mumbai
जम्मू काश्मीरच्या ग्रामीण भागातील सार्वजनिक स्वच्छताविषयक आव्हानांचा सामना करण्यासाठी, जम्मू काश्मीरच्या ग्रामीण सार्वजनिक स्वच्छता संचालनालयाने एक अभिनव मोहीम हाती घेतली आहे. देशातील सर्वोच्च शौर्य पुरस्कार परमवीर चक्र ने सन्मानित, कॅप्टन बाना सिंग, हे माजी जवान, ‘वॉर अगेन्स्ट वेस्ट’ म्हणजे ‘कचऱ्याविरुद्ध युद्ध’ या मोहिमेचे सदिच्छादूत असतील, अशी घोषणा संचालनालयाने केली आहे. जम्मू काश्मीरच्या ग्रामीण सार्वजनिक स्वच्छता विभागाचे संचालक, चरणदीप सिंग यांनी आज आर. एस. पुरा इथल्या कॅप्टन बाना सिंग स्टेडियमवर ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानादरम्यान ही घोषणा केली.
स्वच्छ भारत अभियान 2023, देशभरात 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत साजरे केले जात आहे. स्वच्छता या संकल्पनेचा आपल्या दैनंदिन आयुष्यात अंगिकार करण्याची संकल्पना घट्ट रुजवण्याच्या हेतूने, स्वच्छ भारत दिनापर्यंत हे अभियान राबवले जात आहे.
कॅप्टन सिंग, यांची लष्करातील कारकीर्द यांचे अपार शौर्य आणि समर्पण यासाठी ओळखली जाते, त्यांनी आता ह्या नव्या लढाईची धुरा आपल्या खांद्यांवर घेतली आहे. – एक असे अभियान जे कचरा आणि प्रदूषणाशी लढा देत, जम्मू-काश्मीरच्या आरस्पानी निसर्गसौंदर्याचे रक्षण करणार आहे. ‘वॉर अगेन्स्ट वेस्ट’ चे सदिच्छादूत म्हणून, कॅप्टन बाना सिंग त्यांचा अनुभव आणि या कार्याप्रतीच्या कटिबद्धतेचा या प्रदेशाला मोठा लाभ मिळेल. सीमेवर उभे राहून देशाचे संरक्षण करण्याइतकीच पर्यावरण संरक्षणातली त्यांची भूमिका आणि समर्पण महत्वाचे ठरेल.
स्वच्छता ही सेवा कार्यक्रमासाठी उपस्थित विशाल जनसमुदायाला संबोधित करतांना, कॅप्टन सिंग यांनी या नव्या भूमिकेसाठीचा उत्साह व्यक्त केला. “जसे मी माझ्या देशाचे संरक्षण करण्यासाठी माझे आयुष्य समर्पित केले होते, तसेच मी आता पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी कटिबद्ध आहे. जम्मू काश्मीरचे निसर्गसौन्दर्य आपला राष्ट्रीय ठेवा आहे आणि म्हणूनच पुढच्या पिढ्यांसाठी देखील हा निसर्ग असाच ठेवणे ही आपली जबाबदारी आहे.”
विद्यार्थी, खेळाडू, एनसीसी कॅडेट, पीआरआय, आजूबाजूच्या परिसरातील प्रतिष्ठित लोक, अधिकारी आणि दुकानदार यांच्यासह सुमारे 2000 लोकांनी स्वच्छता प्रतिज्ञा उत्सवात सहभाग घेतला. त्यानंतर सायकल शर्यत आणि चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. सायकल शर्यत आणि चित्रकला स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांना संचालकांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली.
***
S.Patil/R.Aghor/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1962515)
Visitor Counter : 113