शिक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

धर्मेंद्र प्रधान यांनी भारतीय भाषा उत्सव आणि दोन दिवसीय तंत्रज्ञान आणि भारतीय भाषा शिखर परिषदेचे केले उदघाटन


भारतीय भाषा आणि तंत्रज्ञानाचा मिलाफ देशातील प्रतिभावंतांसाठी अमर्याद संधी खुल्या करेल  - धर्मेंद्र प्रधान

Posted On: 30 SEP 2023 4:05PM by PIB Mumbai

 

केंद्रीय शिक्षण आणि कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी 30 सप्टेंबर 2023 रोजी नवी दिल्ली येथे भारतीय भाषा उत्सव आणि  दोन दिवसीय तंत्रज्ञान आणि भारतीय भाषा शिखर परिषदेचे उद्घाटन केले.

राष्ट्रीय शिक्षण धोरण -2020 संकल्पनेच्या  धर्तीवर, सध्याच्या शैक्षणिक परिसंस्थेतून भारतीय भाषांमध्ये रुजलेल्या व्यवस्थेकडे वेगाने संक्रमण सुलभ करणे आणि  शिक्षणात भारतीय भाषांच्या तांत्रिकदृष्ट्या समृद्ध भविष्याचा मार्ग आखणे  हे या शिखर परिषदेचे उद्दिष्ट आहे. भारतीय भाषा तंत्रज्ञान उत्पादने आणि उद्योग, सरकारी संस्था आणि स्टार्ट-अप्सद्वारे त्यांचा वापर प्रदर्शित करण्यासाठी एक प्रदर्शन देखील आयोजित करण्यात आले होते. भारतीय भाषांच्या समृद्ध साहित्यिक वारशाचे प्रतीक म्हणून  विविध अधिकार्‍यांनी मान्यवरांना भेट दिलेले महत्त्वपूर्ण पुस्तक हा एक प्रेरणादायी क्षण होता.

2023-09-30 15:40:31.203000 2023-09-30 15:40:58.327000

यावेळी केंद्रीय विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी 22 वेगवेगळ्या भाषांमध्ये आपले अनुभव सामायिक केले.

शिखर परिषदेला संबोधित करताना  प्रधान म्हणाले की, जगातील सर्वात प्राचीन संस्कृतींपैकी एक असलेल्या भारताचे तंत्रज्ञानाशी अत्यंत जवळचे आणि अतूट नाते आहे. गेल्या अनेक शतकांपासून भारतीय ज्ञान समजून घेण्यासाठी जगभरातील विद्वान इथे आले आहेत असेही ते म्हणाले. भारतीय भाषा आणि तंत्रज्ञान यांचा मिलाफ  देशातील प्रतिभावंतांसाठी अमर्याद संधी खुल्या करेल  यावर त्यांनी भर दिला.

तंत्रज्ञानाच्या माध्यमातून भारतीय ज्ञान प्रणालीचे प्रासंगिकीकरण शक्य होईलअसेही त्यांनी नमूद केले. या परिषदेदरम्यान तंत्रज्ञानासाठी भाषा, तंत्रज्ञानातील भाषा आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून भाषा यावर होणाऱ्या विचारमंथनातून भारतीय भाषांसाठी एक मजबूत परिसंस्था निर्माण होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.  जागतिक वैद्यकीय क्षेत्रात भारतीय संसाधनांच्या महत्त्वपूर्ण योगदानाचा त्यांनी उल्लेख केला. जगातील एक तृतीयांश कोडर्स  भारतीय वंशाचे असून तंत्रज्ञान आणि नवोन्मेषातील देशाच्या सामर्थ्याचा दाखला  आहे असे त्यांनी अधोरेखित केले.

भारतीय भाषा उत्सवाचा एक भाग म्हणून आयोजित करण्यात आलेल्या या शिखर परिषदेमध्ये तीन महत्त्वाच्या संकल्पनांवर आधारित सत्रांचा समावेश आहे: (i) भारतीय भाषांसाठी तंत्रज्ञान; (ii) भारतीय भाषांमधील तंत्रज्ञान; आणि (iii) भारतीय भाषांद्वारे तंत्रज्ञान. आज, भारतीय भाषांसाठी तंत्रज्ञान या संकल्पने अंतर्गत दोन तांत्रिक सत्रे आयोजित करण्यात आली होती. या सत्रांमध्ये, वक्ते आणि तज्ञांनी भारतीय भाषांसाठी तंत्रज्ञानाचा लाभ घेण्याचे मार्ग आणि माध्यमांवर चर्चा केली. भारतीय भाषांच्या अध्यापन - शिक्षण प्रक्रियेत तंत्रज्ञानाची भूमिका, मशीन लर्निंगचा वापर, उच्चार ओळखण्यासाठी भाषा प्रारुपीकरण, भारतीय भाषा लिपींसाठी युनिकोड मानकीकरण आणि इतर महत्त्वाच्या बाबींवरही या सत्रांमध्ये सविस्तर चर्चा करण्यात आली. दोन्ही सत्रांमध्ये श्रोते आणि वक्ते, तज्ञ यांच्यात गहन चर्चा झाली.

शिखर परिषदेदरम्यान विषयपत्रिकेनुसार "भारतीय भाषांसाठी तंत्रज्ञानाचा लाभ घेणे", "ऑपरेटिंग सिस्टम्स आणि सॉफ्टवेअर लोकलायझेशन", "सर्च इंजिन लोकलायझेशन" आणि यासारख्या इतर बऱ्याच मुद्द्यांवर प्रमुख चर्चा होणार आहेत. शैक्षणिक क्षेत्र, विद्यार्थी, संशोधन विद्वान, एज्युटेक आणि इन्फोटेक उद्योगातील व्यावसायिक, तांत्रिक तज्ञ, माध्यम प्रतिनिधी आणि फ्रीलांसरसह विविध क्षेत्रातील भागधारकांच्या सक्रिय सहभागातून भारतीय भाषांमधील शिक्षणाची दृष्टी साकार करण्यासाठी एक व्यापक मार्गदर्शक आराखडा तयार केला जाणार आहे.

या शिखर परिषदेचे आयोजन शिक्षण मंत्रालय (MOE), कौशल्य विकास आणि नवउद्योजकता मंत्रालय (MSDE) आणि त्यांच्या केंद्रीय भारतीय भाषा संस्था (CIIL), विद्यापीठ अनुदान आयोग (UGC), राष्ट्रीय व्यावसायिक शैक्षणिक तंत्रज्ञान फोरम (NETF) अखिल भारतीय तांत्रिक शिक्षण परिषद (AICTE) राष्ट्रीय व्यावसायिक प्रशिक्षण परिषद (NCVTE), राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद (NCTE), भारतीय भाषा समिती (BBS) यासारख्या घटक संस्थांनी संयुक्तरित्या केले आहे. शैक्षणिक क्षेत्र तज्ञ, विद्यार्थी, संशोधन विद्वान, एज्युटेक आणि इन्फोटेक उद्योगातील व्यावसायिक, तांत्रिक तज्ञ, माध्यम प्रतिनिधी आणि फ्रीलान्सर्स यासह विविध क्षेत्रातील भागधारकांच्या सक्रिय सहभागाने, भारतीय भाषांमधील शिक्षणाची दृष्टी प्रत्यक्षात आणण्यासाठी एक सर्वसमावेशक मार्गदर्शक आराखडा दोन दिवसीय शिखर परिषदेत तयार केला जाईल. 

अधिक माहिती आणि नोंदणी तपशीलांसाठी, कृपया शिखर परिषद संकेतस्थळाला भेट द्या: https://technology-bharatiyabhasha.aicte-india.org

***

S.Patil/S.Kane/S.Mukhedkar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1962472) Visitor Counter : 191