गृह आणि शहरी व्यवहार मंत्रालय

‘एक तारीख एक घंटा एक साथ’ हे स्वच्छ भारतासाठी पंतप्रधानांचे आवाहन जगातील सर्वात मोठा स्वयंसेवी उपक्रम ठरेल असे केंद्रीय मंत्री हरदीप पुरी यांचे प्रतिपादन

Posted On: 29 SEP 2023 6:01PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 29 सप्टेंबर 2023

एक तारीख एक घंटा एक साथ, म्हणजेच स्वच्छतेसाठी श्रमदान, हा स्वच्छतेला समर्पित असलेला उपक्रम आहे. प्रतिज्ञा, दौड, रांगोळी स्पर्धा, भित्तीचित्रे, नुक्कड नाटक यासारख्या उपक्रमांपेक्षा तो पूर्णपणे वेगळा आहे. श्रमदान हे केवळ देशभरातील स्वच्छता मोहिमेसाठी आहे, केंद्रीय गृहनिर्माण आणि नगर विकास आणि पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी हे अधोरेखित केले. 1 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता सर्व देशवासीयांनी एकत्र येऊन स्वच्छतेसाठी एक तास श्रमदान करावे, आणि महात्मा गांधी यांना त्यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला ‘स्वच्छांजली’ वहावी, असे आवाहन पंतप्रधानांनी मन की बात कार्यक्रमाच्या 105 व्या भागात केले आहे. या महा स्वच्छता मोहिमेमध्ये सर्व स्तरातील नागरिकांनी बाजारपेठा, रेल्वे मार्ग, जल साठे, पर्यटन स्थळे, प्रार्थनास्थळे यासारख्या  सार्वजनिक ठिकाणी प्रत्यक्ष स्वच्छता उपक्रमात सहभागी व्हावे, जेणे करून या जागा स्वच्छ दिसतील असे आवाहन त्यांनी केले आहे.

‘स्वच्छता ही सेवा’ या विषयावर प्रसार माध्यमांशी बोलताना ते आज म्हणाले की, देशाच्या  शहरी आणि ग्रामीण भागांतील 6.4 लाखाहून जास्त स्थळे  श्रमदानासाठी निश्चित करण्यात आली आहेत. रेल्वे मार्ग आणि स्थानके, विमानतळ आणि आजूबाजूचा परिसर, रस्त्याच्या लगतच्या जागा, राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांच्या कडेच्या जागा , जलसाठे, घाट, झोपडपट्ट्या, पुलांखालील जागा, बाजारपेठा, गल्ल्या, प्रार्थनास्थळे, पर्यटन स्थळे, बस स्थानके/टोल प्लाझा, प्राणीसंग्रहालय आणि वन्यजीव क्षेत्र, गोशाळा, टेकड्या, समुद्रकिनारे, बंदरे, निवासी क्षेत्रे, अंगणवाड्या, शाळा/महाविद्यालये, यासारख्या कचरा प्रवण जागा स्वच्छ करणे, हे या महा स्वच्छता अभियानाचे उद्दिष्ट आहे.

स्वच्छता कार्यक्रम सुरळीतपणे पार पडावेत, यासाठी शहरांमधील स्थानिक संस्था, शहरे, ग्रामपंचायती, मंत्रालयांनी स्वच्छता ही सेवा, https://swachhatahiseva.com/ या पोर्टलवर स्वच्छता श्रमदान कार्यक्रमांची माहिती दिली आहे. यासाठी खास तयार करण्यात आलेल्या या माहिती तंत्रज्ञान व्यासपीठावर नागरिकांना त्यांच्या जवळच्या परिसरातील स्वच्छता उपक्रमांची माहिती मिळेल आणि ते यामध्ये सहभागी होऊ शकतील. विविध ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या स्वच्छता उपक्रमांमध्ये सहभागी झालेले नागरिक स्वच्छतेसाठी श्रमदान करताना स्वतःची छायाचित्रे काढून या पोर्टल वर अपलोड करू शकतील. नागरिकांना आणि प्रभावशाली व्यक्तींना या आंदोलनात सहभागी होण्याचे आणि स्वच्छता दूत बनून या लोक चळवळीचे नेतृत्व करण्याचे आवाहन करणारा एक विभाग या पोर्टलवर आहे. जवळजवळ एक लाख निवासी भागांमध्ये स्वयंसेवक म्हणून श्रमदान  करण्यासाठी मोठ्या संख्येने रहिवासी कल्याणकारी संघटना पुढे आल्या असून, देशभरातील सुमारे 35,000 अंगणवाडी केंद्रांमध्ये स्वच्छतेसाठी श्रमदान करायला ग्रामीण भागातील नागरिक पुढे आले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.

देशाच्या ग्रामीण आणि शहरी भागांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या महा स्वच्छता मोहिमेत सहभागी होण्यासाठी ग्रामीण आणि शहरी भागांमधील स्वयंसेवी संस्था, बाजार संघटना, स्वयं सहाय्यता गट, धार्मिक गट, व्यापार मंडळे, खासगी क्षेत्र पुढे आले असून देशातील 22,000 बाजार पेठा, 10,000 जलसाठे, जवळजवळ 7,000 बस स्थानके/टोल प्लाझा, जवळजवळ 1000 गोशाळा, जवळजवळ 300 प्राणीसंग्रहालय आणि वन्यजीव क्षेत्र आणि अन्य ठिकाणच्या स्वच्छतेसाठी ते श्रमदान करतील.

केंद्रीय मंत्री पुढे म्हणाले की, लष्कर, नौदल, हवाई दल प्रथमच सर्वसामान्य नागरिकांबरोबर एकत्र येऊन रेल्वे मार्ग, हेरिटेज इमारती, पायऱ्यांच्या विहिरी, किल्ले या ठिकाणची स्वच्छता करतील.

देशभरातील संग्रहालये, स्मारके आणि किल्ले स्वच्छ करण्यासाठी विविध संघटना पुढे आल्याचे हरदीप सिंह पुरी यांनी नमूद केले.शाळा आणि महाविद्यालयांमधील स्वच्छता मोहिमेचा भाग म्हणून 1 ऑक्टोबर रोजी फिक्की, भारतीय उद्योग महासंघ क्रेडाई, श्री सत्य साई लोक सेवा, लायन्स क्लब, रोटरी क्लब, युनिसेफ, आगा खान फाउंडेशन यासारख्या इतर  संस्था या उपक्रमात सहभागी होतील अशी माहिती त्यांनी दिली.

महाराष्ट्रात 62,000 पेक्षा अधिक ठिकाणी स्वच्छता अभियान राबवले जाणार असून, चौपाट्या, धार्मिक स्थळे, शाळा, महाविद्यालये, जलसाठे आणि इतर सार्वजनिक स्थळांवरील स्वच्छता मोहिमेत सहभागी होऊन नागरिक श्रमदान करतील.

मागील काही वर्षांप्रमाणेच, या वर्षी देखील, गृहनिर्माण आणि नगर विकास मंत्रालय (MoHUA) आणि पेयजल आणि स्वच्छता विभागाने (DDWS) इतर सर्व केंद्रीय मंत्रालयांच्या सहयोगाने, स्वच्छता पंधरवडा – स्वच्छता हीच सेवा (SHS) 2023, चे आयोजन केले आहे.

 

N.Chitale/R.Agashe/P.Malandkar

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai(Release ID: 1962155) Visitor Counter : 123