गृह मंत्रालय
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आज नवी दिल्ली येथे पीएचडी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या 118 व्या वार्षिक संमेलनाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहून ‘उदयोन्मुख भारत :अभूतपूर्व विकासाचा अमृत काळ’ या विषयावर केले संबोधित
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या 9 वर्षांमध्ये भारतात प्रत्येक क्षेत्रात परिवर्तन घडवून आणण्याचा प्रयत्न केला असून त्यात त्यांना यश देखील लाभले आहे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या 9 वर्षांत देशाच्या अर्थकारणाला नवी दिशा आणि सामर्थ्य देण्याचे कार्य केले आहे, मोदी सरकारची ही 9 वर्षे ‘वचने, कामगिरी आणि परिणाम’ यांची राहिली आहेत
अमृत काळात देशातील उद्योगांना नव्या शिखरावर घेऊन जाण्यात पीएचडीसीसीआयची भूमिका निर्णायक आहे
Posted On:
29 SEP 2023 5:43PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 29 सप्टेंबर 2023
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आज नवी दिल्ली येथे पीएचडी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या 118 व्या वार्षिक संमेलनाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहून ‘उदयोन्मुख भारत :अभूतपूर्व विकासाचा अमृत काळ’ या विषयावर भाषण केले.

या भाषणामध्ये केंद्रीय मंत्री अमित शाह म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतात आयोजित जी-20 शिखर परिषदे’नंतर केवळ व्यापार-उद्योगातच नव्हे तर संपूर्ण देशातील प्रत्येक क्षेत्रात नव्या उर्जेच संचार झाला आहे.ते म्हणाले की पीएचडी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीला येत्या काही वर्षांत देशातील व्यापार आणि उद्योगांची दिशा आणि स्थिती निश्चित करण्यासंदर्भात निर्णायक व्हावे लागेल. ते म्हणाले की आजच्या कार्यक्रमाची मध्यवर्ती संकल्पना आजच्या काळानुसार अत्यंत उपयुक्त आहे. पीएचडी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री ही संस्था देशभरातील लहान-मोठ्या दीड लाखापेक्षा जास्त उद्योगांचे प्रतिनिधित्व करते आणि एका अर्थाने उद्योग तसेच व्यापार क्षेत्राचा आवाज म्हणूनही या संस्थेचा लौकिक आहे.ते म्हणाले की वर्ष 2047 मध्ये भारत संपूर्णपणे विकसित राष्ट्र व्हावे, वर्ष 2026 मध्ये भारताची अर्थव्यवस्था 5 ट्रिलीयन डॉलर्सची व्हावी आणि 2027 मध्ये आपण जगातील पाचव्या क्रमांकावरून तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था म्हणून झेप घ्यावी असे लक्ष्य पंतप्रधान मोदी यांनी निश्चित केले आहे.ही तिन्ही उद्दिष्टे साध्य करण्यात उद्योग क्षेत्राची फार मोठी भूमिका आहे.व्यापार आणि उद्योग ही एका अर्थी देशाचे हृदय आहेत आणि संपूर्ण अर्थव्यवस्थेला उर्जा पुरवण्याचे काम ते करतात. पंतप्रधान मोदी यांच्या धोरणांमुळे आलेल्या परिवर्तनामुळे आज प्रत्येक ठिकाणी भारतातील घडामोडींची चर्चा होत आहे आणि संपूर्ण जगभरात भारताला आता चैतन्याचा केंद्रबिंदू म्हटले जात आहे.

आज घडीला दहशतवादाविरुद्धचा लढा, सौर आघाडी,हरित उर्जा यांसारख्या सर्वच क्षेत्रांच्या बाबतीत जगाचे लक्ष भारताकडे लागले आहे आणि आपले अनेक उपक्रम आज पूर्ण जगाला मार्गदर्शक ठरत आहेत असे केंद्रीय मंत्री शाह यांनी सांगितले. ते म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या 9 वर्षांमध्ये भारतात प्रत्येक क्षेत्रात बदल घडवून आणण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्यात त्यांना यश देखील लाभले आहे. पंतप्रधान मोदी यांनी गेल्या 9 वर्षांत देशाच्या अर्थकारणाला नवी दिशा आणि सामर्थ्य देण्याचे कार्य केले आहे. ते म्हणाले की मोदी सरकारची ही 9 वर्षे ‘वचने, कामगिरी आणि परिणाम’ यांची राहिली आहेत.
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह म्हणाले की पूर्वी आपल्या देशातून 96 दशलक्ष डॉलर्स किंमतीच्या खेळण्यांची निर्यात होत असे, तर 2022 मध्ये हीच निर्यात 326 दशलक्ष डॉलर्स वर नेण्याचे कार्य मोदी सरकारने केले आहे.

केंद्रीय मंत्री अमित शाह म्हणाले की टीम इंडिया म्हणजे देशातील प्रत्येक शेतकरी, लहानात लहान आणि मोठ्यात मोठे उद्योग यांनी मिळून बनलेला एक संघ आहे, असा संघ झाला की मगच आपण वर्ष 2047 मध्ये आपल्या उद्दिष्टापर्यंत पोहोचू शकू. अमित शाह म्हणाले की आज अमृतकाळाची सुरुवात आहे, तेव्हा आता संकल्प करण्याची वेळ आहे, आणि संकल्प साध्य करण्याचा आराखडा तयार करण्याची ही वेळ आहे, यासाठी हाच काळ आहे, योग्य काळ आहे.

N.Chitale/S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1962148)