पंतप्रधान कार्यालय
व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिटला 20 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित कार्यक्रमाला पंतप्रधानांनी केले संबोधित
सायन्स सिटीच्या सक्सेस पॅव्हिलियन शिखर परिषदेचे केले उद्घाटन
पंतप्रधानांच्या दूरदृष्टीचे उद्योगपतींनी केले कौतुक
“व्हायब्रंट गुजरात हा केवळ ब्रँडिंगचा नाही, तर त्याहूनही अधिक तो बंध दृढ करण्याचा (बाँडिंगचा) कार्यक्रम”
"आम्ही केवळ पुनर्बांधणीचा विचार करत नव्हतो तर राज्याच्या भविष्यासाठी नियोजन करत होतो. त्यासाठी व्हायब्रंट गुजरात समिटला आम्ही बनवले मुख्य माध्यम"
"सुशासन, निष्पक्ष आणि धोरणाभिमुख शासन, वाढ आणि पारदर्शकतेची समान व्यवस्था" हे गुजरातचे मुख्य आकर्षण
“विचार, कल्पना आणि अंमलबजावणी हे व्हायब्रंट गुजरातच्या यशाचे मुख्य घटक"
"व्हायब्रंट गुजरात वार्षिक कार्यक्रम राहिला नसून त्याला संस्थात्मक रुप प्राप्त झाले आहे "
"भारताला जगाच्या वाढीचे इंजिन बनवण्याच्या 2014 च्या उद्दिष्टाचा आंतरराष्ट्रीय संस्था आणि तज्ञांमध्ये डंका"
"गेल्या 20 वर्षांपेक्षा पुढची 20 वर्षे महत्त्वाची"
Posted On:
27 SEP 2023 4:05PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 सप्टेंबर 2023
व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिटला 20 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त अहमदाबाद येथील सायन्स सिटी येथे आयोजित कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संबोधित केले. व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिट 20 वर्षांपूर्वी 28 सप्टेंबर 2003 रोजी गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली सुरू झाली होती. कालांतराने, त्याचे रूपांतर अस्सल जागतिक कार्यक्रमात झाले आणि भारतातील प्रमुख व्यावसायिक शिखर संमेलनांपैकी ते एक बनले.
उद्योग क्षेत्रातील प्रमुखांनी आपले विचार मांडले.
वेलस्पनचे अध्यक्ष बी के गोयंका यांनी व्हायब्रंट गुजरातचा प्रवास कथन केला. व्हायब्रंट गुजरात हा खऱ्या अर्थाने जागतिक कार्यक्रम बनला आहे असे ते म्हणाले. त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री आणि सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीचे कौतुक केले. गुंतवणूकीसाठीचा प्रचार हे मोदी यांच्यासाठी एक ध्येय होते असे ते म्हणाले. हा कार्यक्रम इतर राज्यांसाठी आदर्श ठरला असल्याचे त्यांनी सांगितले. नुकतेच भूकंपाने उद्ध्वस्त झालेल्या कच्छ प्रदेशात विस्तार करण्याचा सल्ला मोदींनी त्यांना दिला होता तेव्हाच्या पहिल्या व्हायब्रंट गुजरातमधील अनुभव त्यांनी सांगितला. पंतप्रधानांचा सल्ला ऐतिहासिक ठरला आणि सर्वांच्या पाठिंब्याने ते फार कमी कालावधीत उत्पादन सुरू करू शकले असे गोयंका यांनी सांगितले. सध्याच्या कच्छची प्रगती त्यांनी अधोरेखित केली. एक निर्जन क्षेत्र असलेला हा प्रदेश जगासाठी लवकरच ग्रीन हायड्रोजनचे केंद्र बनेल हा पट त्यांनी उलगडला. 2009 मधील जागतिक आर्थिक संकटाच्या काळात पंतप्रधानांच्या आशावादाची आठवणही त्यांनी करुन दिली. त्या वर्षीही व्हायब्रंट गुजरातला मोठे यश मिळाले. राज्यात 70 टक्क्यांहून अधिक सामंजस्य करार झाले आहेत, असे ते म्हणाले.
जेट्रोचे (दक्षिण आशिया) मुख्य महासंचालक ताकाशी सुझुकी यांनी व्हायब्रंट गुजरातच्या 20 व्या वर्धापनदिनानिमित्त गुजरात सरकारचे अभिनंदन केले. मेक इन इंडिया उपक्रमात जपानचे सर्वात मोठे योगदान असल्याचेही सांगितले. जेट्रोची 2009 पासून गुजरातसोबत भागीदारी आहे. गुजरातशी सांस्कृतिक आणि व्यावसायिक संबंध काळाबरोबर अधिक घट्ट झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनानुसार जेट्रोने 2013 मध्ये गुंतवणुकीसाठी अहमदाबादमध्ये आपले प्रकल्प कार्यालय उघडले आहे असे सुझुकी यांनी सांगितले. गुंतवणुकीला प्रोत्साहन देणार्या भारतातील देश-केंद्रित शहरी वसाहतींवरही त्यांनी प्रकाश टाकला. गुजरातमधील प्रकल्प कार्यालय 2018 मध्ये प्रादेशिक कार्यालयात श्रेणीसुधारित करण्यात आल्याचा उल्लेख त्यांनी केला. गुजरातमध्ये जवळपास 360 जपानी कंपन्या आणि कारखाने आहेत. सेमीकंडक्टर, ग्रीन हायड्रोजन, नूतनीकरणक्षम ऊर्जा आणि फार्मास्युटिकल क्षेत्रासारख्या भारतातील भविष्यातील व्यावसायिक क्षेत्रांमध्ये प्रवेश करण्याचाही त्यांनी उल्लेख केला. पुढील व्हायब्रंट गुजरातमध्ये सेमीकंडक्टर इलेक्ट्रॉनिक्सवर लक्ष केंद्रित करणार्या जपानी व्यावसायिक शिष्टमंडळाला आमंत्रित करण्याबद्दल माहिती त्यांनी दिली. भारताला गुंतवणुकीसाठी सुयोग्य ठिकाण बनवण्याकरता मार्गदर्शन केल्याबद्दल पंतप्रधान मोदींचे त्यांनी आभार मानले.
आर्सेलर मित्तलचे कार्यकारी अध्यक्ष लक्ष्मी मित्तल म्हणाले की व्हायब्रंट गुजरातने सुरू केलेल्या पायंड्यामुळे इतर राज्यांमध्येही असे उपक्रम होत आहेत. यामुळे जागतिक गुंतवणूकदारांसाठी भारत हे एक पसंतीचे ठिकाण बनले. त्यांनी याकरता पंतप्रधानांच्या दूरदृष्टीला आणि कार्यक्षमतेला श्रेय दिले. पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली जागतिक सहमती घडवून आणणारा म्हणून उदयास आलेल्या जी20 साठी त्यांनी पंतप्रधानांचे अभिनंदन केले. गुजरातचा अग्रगण्य औद्योगिक राज्य म्हणून दर्जा आणि ते जागतिक स्पर्धात्मकतेचे प्रभावी प्रदर्शन कसे करते हे मित्तल यांनी अधोरेखित केले. त्यांनी आर्सेलर मित्तलच्या राज्यातील प्रकल्पांची माहिती दिली
वीस वर्षांपूर्वी पेरलेल्या बिजाने एका भव्य आणि वैविध्यपूर्ण व्हायब्रंट गुजरातचे रूप धारण केले आहे असे पंतप्रधान यावेळी म्हणाले. व्हायब्रंट गुजरात समिटच्या 20 व्या वर्धापन दिनाच्या समारंभाचा एक भाग बनल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. व्हायब्रंट गुजरात हे केवळ राज्यासाठी ब्रँडिंग नसून बंध दृढ करण्याचा एक प्रयत्न आहे, याचा पुनरुच्चार त्यांनी केला. हे शिखर संमेलन त्यांच्याशी निगडित दृढ बंधनाचे आणि राज्यातील 7 कोटी लोकांच्या क्षमतांचे प्रतीक आहे यावर पंतप्रधानांनी भर दिला. "हा बंध लोकांच्या माझ्यावरील अपार प्रेमाचे निदर्शक आहे", असेही ते म्हणाले.
2001 च्या भूकंपानंतर गुजरातच्या स्थितीची कल्पना करणे कठीण होते असे ते म्हणाले. भूकंपाच्या आधीही गुजरातमध्ये मोठा दुष्काळ पडला होता. माधवपुरा मर्कंटाईल सहकारी बँक बुडाल्याने स्थिती आणखीच बिकट झाली. इतर सहकारी बँकांमध्येही त्याचे पडसाद उमटले. त्यावेळी प्रशासकीय भूमिकेत ते नवीन असल्याने त्यांच्यासाठी हा एक नवीन अनुभव होता, असे मोदींनी सांगितले. अशा परिस्थितीत, हृदयद्रावक गोधरा घटनेच्या पार्श्वभूमीवर गुजरातमध्ये हिंसाचार उसळला होता. मुख्यमंत्री म्हणून अनुभव नसतानाही गुजरात आणि तेथील जनतेवर त्यांचा पूर्ण विश्वास असल्याचे मोदी म्हणाले. गुजरातला बदनाम करण्याचे षडयंत्र रचले जात होते. त्यावेळच्या अजेंडा चालवणाऱ्यांचाही त्यांनी उल्लेख केला.
“परिस्थिती कशीही असो, मी गुजरातला या परिस्थितीतून बाहेर काढेन अशी मी शपथ घेतली. आम्ही केवळ पुनर्बांधणीचा विचार करत नव्हतो तर त्याच्या भविष्यासाठीही नियोजन करत होतो आणि त्यासाठी व्हायब्रंट गुजरात समिट हे एक प्रमुख माध्यम बनवले”, असे पंतप्रधान म्हणाले. व्हायब्रंट गुजरात हे राज्याला अधिक विकसित करण्याचे आणि जगाशी संवाद साधण्याचे माध्यम बनले आहे, यावर त्यांनी प्रकाश टाकला. ही शिखर परिषद राज्य सरकारची निर्णयक्षमता आणि केंद्रीत दृष्टिकोन जगासमोर दर्शविण्यासाठी एक माध्यम बनले आहे. त्याचबरोबर देशातील उद्योग क्षमताही त्याने पुढे आणली आहे. व्हायब्रंट गुजरातचा उपयोग अनेक क्षेत्रांमध्ये अगणित संधी उपलब्ध करण्यासाठी, देशातील प्रतिभा जगापुढे आणण्यासाठी तसेच देशाचे पावित्र्य, भव्यता आणि सांस्कृतिक परंपरा अधोरेखित करण्यासाठी प्रभावीपणे केला गेला आहे असे म्हणाले. शिखर परिषदेच्या आयोजनाच्या वेळेबद्दल बोलताना पंतप्रधानांनी नमूद केले की व्हायब्रंट गुजरात हा राज्याच्या औद्योगिक विकासाचा उत्सव बनला आहे कारण तो नवरात्री आणि गरबाच्या गजबजलेल्या काळात आयोजित केला जातो.
पंतप्रधानांनी तत्कालीन केंद्र सरकारनं गुजरातला दिलेल्या सापत्न वागणुकीचा उल्लेख केला. गुजरातच्या विकासामधून देशाचा विकास साध्य करणे असे आपले अभिवचन असूनही त्यांना गुजरातचा विकास हा एका राजकीय दृष्टिकोनातूनच दिसत होता. परकीय गुंतवणूकदारांनी कोणत्याही धमक्यांना बळी न पडता गुजरातला पसंती दिली. आणि यासाठी कोणतेच विशेष प्रोत्साहन दिले गेले नव्हते. उत्तम प्रशासन, निःपक्ष आणि धोरण-आधारित प्रशासन आणि वाढ आणि पारदर्शकतेची समान व्यवस्था हे या आकर्षणामागील कारण होते, असे पंतप्रधान म्हणाले
2009 मधील व्हायब्रंट गुजरात उपक्रमाविषयी बोलताना पंतप्रधान म्हणाले की ज्यावेळी संपूर्ण जग मंदीच्या सावटाखाली होते, आपण गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री या नात्याने पुढे मार्गक्रमण करत हा कार्यक्रम आयोजित करण्याचा ठाम निर्धार केला होता. परिणामी 2009 च्या व्हायब्रंट गुजरात परिषदेमुळे गुजरातच्या यशोगाथेचा एक नवीन अध्याय रचला गेला.
पंतप्रधानांनी या परिषदेच्या यशस्वितेचा प्रवास उलगडताना सांगितले की व्हायब्रंट गुजरात परिषदेच्या 2003 च्या आवृत्तीमध्ये केवळ काही शेकडो लोक सहभागी झाले होते. आज 40,000 हून अधिक सहभागी आणि प्रतिनिधी आणि 135 देश शिखर परिषदेत भाग घेत आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. प्रदर्शकांची संख्या देखील 2003 मधील 30 वरून आज 2000 पेक्षा जास्त झाली आहे.
व्हायब्रण्ट गुजरात परिषदेच्या यशाचे खरे आधारस्तंभ आहेत ते म्हणजे नाविन्यपूर्ण विचार, कल्पना आणि अंमलबजावणी. व्हायब्रंट गुजरातमागील धाडसी विचार आणि कल्पकता त्यांनी अधोरेखित केली आणि इतर राज्यांमध्येही त्याचे अनुकरण झाल्याचे सांगितले.
कल्पना कितीही चांगली असली तरी तिचे यश हे यंत्रणेच्या एकत्रित प्रयत्नांवर आणि फलनिष्पत्तीवर अवलंबून असते. अशा प्रकारच्या संस्थेला अतिशय विचारपूर्वक केलेले नियोजन आणि क्षमता वाढीसाठी गुंतवणूक , सूक्ष्म निरीक्षण आणि समर्पण यांची गरज असते. व्हायब्रंट गुजरातमुळे राज्य सरकारने तेच अधिकारी, तेच स्रोत आणि समान नियमांचे पालन करून कोणत्याही सरकारला अशक्य वाटेल असे अकल्पनीय यश संपादन केले आहे, असे पंतप्रधान म्हणाले
पंतप्रधान म्हणाले की, व्हायब्रंट गुजरात चे स्वरूप आता केवळ एका कार्यक्रमापुरते मर्यदित राहिले नसून अंतर्बाह्य सरकार असलेली एक अखंड यंत्रणा आणि निरंतर प्रक्रियेत त्याचे रूपांतर झाले आहे.
व्हायब्रंट गुजरात चे चैतन्य देशातील प्रत्येक राज्याच्या लाभासाठी असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. या परिषदेने देऊ केलेल्या संधींचा लाभ सर्व राज्यांनी घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
साधारण विसाव्या शतकात गुजरातची ओळख ही मुख्यतः व्यापारावर आधारलेली होती, मात्र विसाव्या शतकातून एकविसाव्या शतकाकडे जाताना झालेल्या परिवर्तनात गुजरात राज्य कृषी आणि आर्थिक केंद्र म्हणून नावारूपाला आले, आणि राज्याला औद्योगिक आणि उत्पादक परिसंस्था म्हणून एक नवीन ओळख मिळाली, असे पंतप्रधान म्हणाले. व्यापारी राज्य म्हणून प्रसिद्ध असलेल्या गुजरातची ही ओळख आणखी दृढ होत गेली.
अभिनव कल्पना, नवोन्मेष आणि उद्योगांचे माहेरघर म्हणून कार्य करणाऱ्या व्हायब्रंट गुजरातला पंतप्रधानांनी राज्याच्या विद्यमान यशाचे श्रेय दिले. गेल्या 20 वर्षातील यशोगाथा आणि अभ्यास प्रबंधाचा संदर्भ देत प्रभावी धोरणे आणि कार्यक्षम प्रकल्प अंमलबजावणीमुळे हे शक्य झाले आहे, असे सांगून पंतप्रधानांनी वस्त्रोद्योग आणि परिधान उद्योगातील गुंतवणूक, निर्यातीतील विक्रमी वाढ आणि रोजगारातील वाढीचे उदाहरण दिले आणि त्याचा उल्लेखही केला.
राज्यातील विविध क्षेत्रांच्या प्रगतीबद्दल बोलताना पंतप्रधान म्हणाले की वाहनउद्योग क्षेत्रात 2001 च्या तुलनेत गुंतवणूक 9 पटीने वाढली, उत्पादकतेत 12 पटींनी उसळी, भारतातील रंग आणि सहाय्यक उत्पादनात 75 टक्के योगदान, देशातील कृषी आणि अन्न प्रक्रिया उद्योगातील गुंतवणुकीत सर्वाधिक वाटा, 30,000 हून अधिक कार्यरत अन्न प्रक्रिया युनिट्स, वैद्यकीय उपकरणांच्या निर्मितीमध्ये 50 टक्क्यांहून अधिक वाटा आणि कार्डियाक स्टेंट्स निर्मितीमध्ये सुमारे 80 टक्के वाटा, जगातील 70 टक्क्यांहून अधिक हिऱ्यांवर प्रक्रिया, भारताच्या हिऱ्यांच्या निर्यातीत 80 टक्के वाटा आणि सिरेमिक टाइल्स, सॅनिटरी वेअर आणि वेगवेगळ्या सिरॅमिक उत्पादनांच्या सुमारे 10 हजार उत्पादन युनिट्ससह देशातील सिरॅमिक बाजारपेठेत 90 टक्के वाटा आहे. गुजरात हा भारतातील सर्वात मोठा निर्यातदार असून त्याचे सध्याचे व्यवहार मूल्य 2 अब्ज अमेरिकन डॉलर आहे. “संरक्षण उत्पादन हे आगामी काळात खूप मोठे क्षेत्र असेल”, असे पंतप्रधान म्हणाले.
ज्यावेळी आम्ही व्हायब्रंट गुजरातचा प्रारंभ केला त्यावेळी हे राज्य देशाच्या विकासाचे इंजिन बनावे असा त्यामागील हेतू होता. देशाने हे स्वप्न प्रत्यक्षात साकार होताना पहिले आहे, असे त्यांनी सांगितले. 2014 मध्ये देशाला जगाच्या प्रगतीचे इंजिन बनवण्याचा केलेल्या निर्धाराचे पडसाद आंतरराष्ट्रीय संस्था आणि तज्ञांमध्ये उमटत आहेत. आज भारत जगातील झपाट्याने विकसित होणारी अर्थव्यवस्था आहे. आपण आता अशा एका निर्णायक टप्प्यावर उभे आहोत, जिथे जागतिक आर्थिक सत्तास्थान बनण्याकडे भारत आगेकूच करत आहे. आता भारताला जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था व्हायचे आहे.” असे सांगून त्यांनी उद्योगपतींना अशा क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले जे भारताला नवीन संधी आणि शक्यता उपलब्ध करून देण्यास मदत करतील. स्टार्टअप परिसंस्था, अॅग्री-टेक, अन्न प्रक्रिया आणि श्री अन्न या घटकांना गती देण्याच्या मार्गांवर उद्योगपतींनी विचारमंथन करावे असे आवाहन त्यांनी केले.
आर्थिक सहकार्य संस्थांच्या वाढत्या गरजेबद्दल बोलताना पंतप्रधानांनी गिफ्ट सिटीच्या वाढत्या समर्पकतेविषयी भाष्य केले. गिफ्ट सिटी मधून आपल्या संपूर्ण शासन या दृष्टिकोनाचे प्रतिबिंब दिसून येते. येथे केंद्र सरकार, राज्य सरकार आणि आय एफ एस सी चे प्रमुख जगातील सर्वोत्तम नियामक वातावरण निर्मितीसाठी एकत्र कार्य करतात. या स्थानाला जागतिक स्तरावर स्पर्धात्मक पातळीवरील वित्तीय बाजारपेठ बनवण्यासाठी आपण आपले प्रयत्न अधिक वाढवले पाहिजेत, असे पंतप्रधान म्हणाले.
ही वेळ आता थांबण्याची नाही. गेल्या वीस वर्षांपेक्षाही आगामी वीस वर्षांचा काळ हा अधिक महत्वाचा आहे. जेव्हा व्हायब्रंट गुजरात आपली 40 वर्षे पूर्ण करेल तेव्हा भारत आपल्या स्वातंत्र्याच्या शतक महोत्सवी वर्षांपासून फारसा दूर नसेल, हीच वेळ आहे जेव्हा भारताला 2047 पर्यंत एक विकसित आणि आत्मनिर्भर राष्ट्र म्हणून ओळख मिळवण्यासाठी पथदर्शक धोरण आखावे लागेल, असे सांगून ही परिषद या दिशेने कार्य करेल असा विश्वास व्यक्त करून पंतप्रधानांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.
यावेळी गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, खासदार सी आर पाटील, गुजरात सरकारचे मंत्री आणि उद्योग क्षेत्रातील नेते उपस्थित होते.
पार्श्वभूमी
व्हायब्रंट गुजरात जागतिक शिखर परिषदेला 20 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त अहमदाबादमध्ये सायन्स सिटी येथे आयोजित कार्यक्रमात उद्योग संघटना, व्यापार-उदीम क्षेत्रातील नामवंत , तरुण उद्योजक, उच्च व तंत्रशिक्षण महाविद्यालयांचे विद्यार्थी, आणि इतर मान्यवर सहभागी झाले.
व्हायब्रंट गुजरात जागतिक शिखर परिषदेचा प्रारंभ 20 वर्षांपूर्वी गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली झाला. 28 सप्टेंबर 2003 या दिवशी व्हायब्रंट गुजरात जागतिक शिखर परिषदेचा प्रवास सुरु झाला. कालानुक्रमे, त्याला खऱ्याखुऱ्या जागतिक कार्यक्रमाचे स्वरूप प्राप्त झाले आणि भारतातील सर्वात प्रमुख अशा व्यवसाय परिषदांमध्ये त्याने स्थान पटकावले. वर्ष 2003 मध्ये त्यात आंतरराष्ट्रीय स्तरावरील अंदाजे 300 तज्ज्ञांचा सहभाग होता. तर 2019 मध्ये सहभागाचे प्रमाण प्रचंड वाढून याच परिषदेने 135 देशांतील सहस्रावधी जणांना सामावून घेतले.
गेल्या 20 वर्षांत व्हायब्रंट गुजरात जागतिक शिखर परिषदेने कात टाकली आहे. गुंतवणूक आकर्षित करण्याच्या दृष्टीने गुजरातला प्राधान्य मिळवून देण्याच्या उद्देशापासून सुरु झालेली ही परिषद, आता 'नवभारताला आकार देईपर्यंत पोहोचली आहे. 'व्हायब्रंट गुजरात' परिषदेचे अतुलनीय यश हे संपूर्ण देशासाठी आदर्श ठरले असून इतर राज्यांनाही त्यातूनच, अशाप्रकारच्या गुंतवणूक-प्रधान परिषदा भरवण्यासाठी प्रेरणा मिळाली आहे.
* * *
S.Kane/Vinayak/Bhakti/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1961265)
Visitor Counter : 142
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam