राष्ट्रपती कार्यालय
भारतीय प्रशासकीय सेवेतील 2021 च्या तुकडीतील अधिकाऱ्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेट
भारताला सर्वसमावेशक आणि विकसित राष्ट्र बनवणे हे तुमचे सामूहिक ध्येय आहे: राष्ट्रपती मुर्मू
Posted On:
25 SEP 2023 3:32PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 सप्टेंबर 2023
भारतीय प्रशासकीय सेवेच्या 2021 च्या तुकडीतील 182 अधिकार्यांच्या गटाने, आज (25 सप्टेंबर, 2023) राष्ट्रपती भवनातील सांस्कृतिक केंद्रात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. हे सर्व अधिकारी सध्या विविध केंद्रीय मंत्रालये आणि विभागांमध्ये सहाय्यक सचिव म्हणून कार्यरत आहेत.
या अधिकार्यांना संबोधित करताना राष्ट्रपती म्हणाल्या की, या अधिकाऱ्यांची सेवा अधिकार, भूमिका आणि जबाबदारीच्या बाबतीत इतर कोणत्याही सेवेपेक्षा वेगळी आहे. ही सेवा नसून एक मिशन असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. देशाला आणि देशातील जनतेला सुशासनाच्या चौकटीत पुढे नेणे हे या अधिकाऱ्यांचे ध्येय आहे, असेही त्या म्हणाल्या. देशाची आणि पर्यायाने जनतेची सेवा करणे ही त्यांची नियती आहे, असे त्यांनी सांगितले. भारताला सर्वसमावेशक आणि विकसित राष्ट्र बनवणे हे त्यांचे सामूहिक ध्येय आहे, असे त्या म्हणाल्या. आपल्याबरोबरच्या तरुणांना विविध क्षेत्रातील त्यांच्या क्षमता ओळखायला मदत करुन हे अधिकारी मोठे योगदान देऊ शकतात, असेही त्या म्हणाल्या. 2047 च्या विकसित भारताच्या उभारणीत योगदान देण्याची मोठी संधी या अधिकाऱ्यांकडे आहे, हे अधिकारी आपली वचनबद्धता आणि सर्जनशीलतेद्वारे आपल्या देशाचा कायापालट करण्यासाठी प्रभावी कार्य करु शकतात, असे राष्ट्रपती म्हणाल्या.
ज्यांचे हृदय गरीब आणि वंचितांसाठी धडधडते तोच खरा नागरी सेवक असतो, कारण तो केवळ सरकारी नोकरशहा असलेल्या कर्मचाऱ्यांच्यापेक्षा पूर्ण वेगळा असतो, असे त्या म्हणाल्या. समाजातील उपेक्षित वर्गातील लोकांचे उत्थान करणे हेच नागरी सेवकांसाठीचे ध्येय असावे, असे त्यांनी सांगितले. राष्ट्रपतींनी या अधिकाऱ्यांना ‘फाइल टू फील्ड’ आणि ‘फील्ड टू फाईल’ मधील दुवा समजून घेण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. ही लोककेंद्रित सतर्कता आणि संवेदनशीलता त्यांना फाइलींसंदर्भात योग्य काम करण्यासाठी प्रोत्साहित करेल असे राष्ट्रपती म्हणाल्या.
राष्ट्रपतींचे भाषण पाहण्यासाठी कृपया येथे क्लिक करा
* * *
S.Kane/S.Mukhedkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1960458)
Visitor Counter : 127