Posted On:
24 SEP 2023 7:23PM by PIB Mumbai
केंद्रीय, बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग तसेच आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या हस्ते 23 सप्टेंबर 2023 रोजी गोव्यात पणजी इथल्या ऐतिहासिक अग्वादा किल्ल्यावर देशातल्या पहिल्या भारतीय प्रकाशस्तंभ उत्सवाचे उद्घाटन झाले.
भारतातील 75 महत्वपूर्ण ऐतिहासिक दीपगृहांचा समृद्ध सागरी इतिहास पुनरुज्जीवित करण्याच्या तसेच या दीपगृहांशी संबंधित कथा जगासमोर आणण्याच्या हेतूने, या उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या पहिल्या वहिल्या उत्सवाचे प्रमुख स्थळ, अग्वादा फोर्ट इथे, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी, जलमार्ग आणि पर्यंटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक, गोव्याचे पर्यटन मंत्री रोहन खौंटे, आमदार मायकेल लोबो यांच्यासह केंद्र आणि राज्य सरकारमधील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
यावेळी सर्बानंद सोनोवाल म्हणाले, “या उत्सवाचे उद्घाटन करुन, आपण भारताच्या विशाल किनारपट्टीवर असलेल्या प्राचीन दीपगृहांचे पुनरुज्जीवन करणार असून, ही सर्व स्थळे आपला ऐतिहासिक वारसा सांगणारी पर्यटन स्थळे म्हणून विकसित केली जाणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या द्रष्टया नेतृत्वाखाली आपण आत्मनिर्भर भारताच्या दिशेने वाटचाल करत आहोत. राष्ट्रबांधणीच्या या पवित्र कार्यात, आम्ही पंतप्रधान मोदी यांचा दृष्टिकोन प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न करत आहोत. त्याचाच भाग म्हणून ही दीपगृहे, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि पर्यटन केंद्रे म्हणून महत्वाची भूमिका पार पाडणार आहेत. पंतप्रधान मोदी यांनी आपल्या या वैशिष्ट्यपूर्ण दीपगृहांचे अत्यंत सुरेख अशा वारसा पर्यटन स्थळांमध्ये रूपांतर केले. अनेक काळोख्या रात्री कित्येक खलाशांना आणि जहाजांना आशेचा किरण आणि दिशा दाखवणाऱ्या या किनारपट्टीवरील मूक संरक्षकांकडे आजवर दुर्लक्ष केले गेले. ते बदलण्याचा आमचा प्रयत्न म्हणजेच हा "दीपस्तंभ महोत्सव" आहे. आपल्या देशाच्या इतिहासात या ऐतिहासिक दीपस्तंभांनी जी महत्त्वाची भूमिका बजावली आहे त्याबद्दल आपणा सर्वांना माहिती देणे, त्याकडे लोकांना आकर्षित करणे आणि त्यांना इतिहासाची जाणीव करून देणे, हे आमचे ध्येय आहे.”
सार्वजनिक खाजगी भागीदारीच्या माध्यमातून ऐतिहासिक स्थळे जागतिक दर्जाच्या पर्यटन स्थळांच्या रूपात विकसित करण्याच्या उद्देशाने,भारतीय दीपगृह महोत्सवाचे आयोजन, केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाने केले आहे. दीपगृह आणि दीपनौका (लाइटशिप्स) महासंचालनालयाने यापूर्वीच अशी 75 दीपगृहे महोत्सवासाठी निश्चित केली आहेत आणि हा महोत्सव म्हणजे आपला सागरी वारसा साजरा आणि जतन करण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेचा पुरावा आहे.
केंद्रीय मंत्री म्हणाले, "हा "दीपगृह महोत्सव" , गतकाळाचा सौंदर्यपूर्वक मनमोहक प्रवास उलगडणारा एक भव्य उत्सव आहे, एक असा प्रवास जो आपल्या सागरी इतिहासात दडलेली व्यक्तिमत्त्वे आणि आपल्या ऐतिहासिक दीपगृहांच्या कधीही पुढे न आलेल्या कथा प्रकाशात आणतो. रिफॉर्म टू ट्रान्सफॉर्म (सुधारणांमधून परिवर्तन) उपक्रमाचा एक भाग म्हणून, नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने, भारतातील सागरी नेव्हिगेशनला पूरक ठरणाऱ्या विकास, देखभाल आणि व्यवस्थापनासाठी एक आराखडा प्रदान करण्याकरता, दीपगृह कायदा, 1927 रद्द करून मरीन एड्स टू नेव्हिगेशन अॅक्ट, 2021 हा सागरी मार्गक्रमणेसाठी सहाय्यभूत ठरणारा कायदा लागू केला. या अंतर्गत सरकारने, हेरिटेज लाइटहाऊसची (दीपगृह वारसा) नाविन्यपूर्ण संकल्पना सादर केली ज्याद्वारे केंद्र सरकार, आपल्या नियंत्रणाखालील नेव्हिगेशनसाठी कोणतीही मदत, हेरिटेज लाइटहाऊसच्या माध्यमातून उपलब्ध करू शकते. नेव्हिगेशनसाठी सहाय्यकारक म्हणून त्यांच्या कार्याव्यतिरिक्त, अशी दीपगृहे शैक्षणिक, सांस्कृतिक आणि पर्यटन हेतूंसाठी विकसित केली जातील. हा महोत्सव केवळ ज्ञानाचा नाही, तर मूल्य आणि संधी निर्मिती करण्याबद्दल आहे. महोत्सवाच्याही पुढे जाऊन, दीपगृहांना पर्यटन स्थळे म्हणून चालना देणे, या ऐतिहासिक वास्तूंमध्ये नवे प्राण फुंकणे आणि स्थानिक समाज आणि व्यवसायांसाठी संधी निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे”असे मंत्री म्हणाले.
दिवसभर चाललेल्या कार्यक्रमादरम्यान, भारत प्रवाह या इन्स्टिट्यूट फॉर गव्हर्नन्स, पॉलिसी अँड पॉलिटिक्सच्या पुढाकाराने आयोजित 'व्हॅनगार्ड्स ऑफ अवर शोर्स: लाइटहाऊसेस अॅज टेस्टामेंट्स ऑफ इंडियाज पास्ट अँड प्रेझेंट' या सत्राचे आयोजन करण्यात आले होते. या सत्रात राखीगढी फेम प्रसिद्ध इतिहासकार आणि पुरातत्वशास्त्रज्ञ प्रा. वसंत शिंदे यांनी भारताच्या सागरी इतिहासातील दीपगृहांचे ऐतिहासिक महत्त्व सांगितले. डॉ सुनील गुप्ता, सागरी पुरातत्वशास्त्रज्ञ आणि OSD, प्रधानमंत्री संग्रहालय, नवी दिल्ली आणि गोवा राज्य संग्रहालयाचे संचालक डॉ. वासू उसपाकर यांनीही या सत्रात भाषण केले. बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाच्या संयुक्त सचिवांनी दीपगृह वारसा पर्यटन विकासाबाबत असलेला मंत्रालयाचा दृष्टिकोन आणि या टप्प्यातील 75 दीपगृहांमधील गुंतवणुकीच्या संधींचे सादरीकरण केले.
सांस्कृतिक प्रदर्शने, सागरी इतिहास आणि संस्कृतीवर प्रकाशझोत टाकणारी सत्रे, शास्त्रीय आविष्कार, प्रकाश-ध्वनी खेळ , ख्यातनाम गायकांच्या गायनाने बहरलेली संगीतमय संध्याकाळ, मत्स्य पाककृती आणि स्थानिकांचा सहभाग ही भारताच्या पहिल्या दीपगृह महोत्सवाची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत.
***
N.Chitale/R.Aghor/A.Save/P.Kor