वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी भारतातील व्यवसाय सुलभता सुधारण्याप्रति सरकारची वचनबद्धता केली अधोरेखित


गोयल यांनी बडा बिझनेस उद्योजक मंचाच्या मेळाव्यात सहभागी झालेल्या सर्वांना मोठे स्वप्न पाहण्यासाठी, लवचिक बनण्यासाठी आणि भारताच्या प्रगतीत योगदान देण्यासाठी प्रोत्साहित केले

भारताच्या जी 20 अध्यक्षतेने  देशातील विकासाचे जगासमोर प्रदर्शन करण्याची संधी दिली:  गोयल

गोयल यांनी भारतातील गतिमान विकासासाठी उत्सुक युवकांच्या महत्वाकांक्षी स्वभावाचा केला उल्लेख

Posted On: 23 SEP 2023 6:54PM by PIB Mumbai

 

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण आणि वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी भारतातील व्यवसाय सुलभता सुधारण्यासाठी, व्यवसाय सुरू करणे आणि चालवणे सोपे करण्याप्रति सरकारची वचनबद्धता अधोरेखित केली. नवी दिल्ली येथे आज आयोजित बडा बिझनेसच्या 'उद्योजक मंच ' कार्यक्रमाला संबोधित करताना, त्यांनी स्टार्टअप इंडिया उपक्रमाचे यश अधोरेखित केले.  देशातील स्टार्टअप्सची संख्या  2016 मधील  450 स्टार्टअप्सवरून आज 1 लाखांपेक्षा जास्त झाली असून भारत हा जगातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी स्टार्टअप परिसंस्था असलेला देश बनला आहे.

गोयल यांनी या कार्यक्रमात प्रेरक भाषण केले आणि त्यांच्या स्वत:च्या उद्योजकीय प्रवासातील अनुभव आणि त्यांच्या मार्गात आलेल्या आव्हानांबद्दल माहिती दिली. त्यांनी सर्व सहभागींना मोठी स्वप्ने पाहण्यासाठी, लवचिक राहण्यासाठी आणि भारताच्या प्रगतीत योगदान देण्यासाठी प्रोत्साहित केले. यशासाठी शुभेच्छा देताना त्यांनी भारताच्या उज्ज्वल भविष्याची कल्पना मांडली.

भारताच्या जी 20 अध्यक्षतेच्या काळात जगभरात मिळालेल्या मान्यतेचा उल्लेख करत गोयल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली देशात झालेल्या विकासाचे जगासमोर प्रदर्शन करण्याची संधी जी 20  अध्यक्षतेने कशी दिली, हे अधोरेखित केले. कठोर परिश्रम आणि समर्पणाद्वारे महत्त्वाकांक्षी लक्ष्ये साध्य करणे, स्वाभिमान आणि समृद्ध भविष्यावर भर देण्याची गरजही त्यांनी अधोरेखित केली.

भारतातील गतिमान विकासासाठी उत्सुक युवकांच्या महत्वाकांक्षी स्वभावाचा त्यांनी उल्लेख केला. "अमृत काल" मध्ये भारताच्या विकासाचा पाया म्हणून देशातील युवकांची महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित केली. भारताचे सरासरी वय 30 वर्षांपेक्षा कमी असल्याने आणि लोकसंख्येचा लाभ पुढील तीन दशके कायम राहील हे लक्षात घेऊन 2047 पर्यंत भारताच्या अर्थव्यवस्थेत मोठी वाढ होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

जग भारतात उपलब्ध असलेल्या संधी आणि त्यातील विविधता आणि आर्थिक विकासाकडे आकर्षित होत आहे याकडे पियुष गोयल यांनी लक्ष वेधले. भारतीय STEM पदवीधर हे जागतिक आकर्षण आहे  यावर त्यांनी भर दिला.

वसाहतवादी मानसिकता झुगारून भारताने पुढे मार्गक्रमण सुरु केल्याचे अधोरेखित करून त्यांनी भारत मंडपम, यशोभूमी, कर्तव्य पथ आणि प्रधानमंत्री संग्रहालय यासारख्या विविध प्रकल्पांचा उल्लेख, या परिवर्तनात्मक बदलाची चिन्हे म्हणून केला. पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली वीज जोडणी, डिजिटल कनेक्टिव्हिटी, स्वयंपाकाच्या गॅसची सुविधा, पाईपद्वारे पाणीपुरवठा आणि आरोग्य आणि शिक्षणातील प्रगती यासारख्या कल्याणकारी उपाययोजनांच्या माध्यमातून सर्व 140 कोटी भारतीयांचे जीवनमान सुधारण्याप्रति सरकारच्या वचनबद्धतेवर त्यांनी भर दिला.

गोयल यांनी सर्व नागरिकांना देशाच्या विकासासाठी कर्तव्य भावनेने आणि समर्पणाने काम करण्याचे आवाहन केले. उद्योजकता विकासाला चालना देण्यासाठी, सहभागींना ऊर्जादायी आणि ज्ञान प्रदान करणारा मंच म्हणून या उद्योजकता मंचाची त्यांनी प्रशंसा केली.

***

M.Pange/S.Kane/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1959987) Visitor Counter : 120