विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
विज्ञान,तंत्रज्ञान आणि अभिनव कल्पना या क्षेत्रांसाठीच्या ‘राष्ट्रीय विज्ञान पुरस्कारांना’ केंद्र सरकारने दिले नवे स्वरूप
राष्ट्रीय विज्ञान पुरस्कारांना भारतातील विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष क्षेत्रामध्ये सर्वोच्च प्रतिष्ठा
Posted On:
21 SEP 2023 7:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 21 सप्टेंबर 2023
भारत सरकारने विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेषी कल्पना या क्षेत्रातील राष्ट्रीय पुरस्कारांना नवे स्वरूप दिले आहे. या प्रतिष्ठित पुरस्कारांना “राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार” म्हणून ओळखले जाते.
राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार (आरव्हीपी)चे उद्दिष्ट शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ आणि नवसंशोधकांनी विज्ञान, तंत्रज्ञान आणि अभिनव प्रयोग या क्षेत्रात तसेच नवोन्मेषाच्या विविध क्षेत्रात वैयक्तिकरित्या किंवा समूहामध्ये केलेल्या उल्लेखनीय आणि प्रेरणादायी योगदानाला गौरविणे आहे.
राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार हा भारतातील विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेषाच्या क्षेत्रातील सर्वात प्रतिष्ठित मानला जातो. सरकारी, खाजगी क्षेत्रातील संस्था किंवा कोणत्याही संस्थेबाहेर काम करणारे शास्त्रज्ञ/तंत्रज्ञानी /नवशोधक, ज्यांनी विज्ञान, तंत्रज्ञान किंवा तंत्रज्ञानाच्या नेतृत्वाखालील नवीन उपक्रम राबवले असतील. तसेच कोणत्याही क्षेत्रात पथदर्शक संशोधन किंवा नवकल्पना किंवा शोध या बाबतीत विशेष योगदान दिलेले असेल, ते या पुरस्कारांसाठी पात्र असतात. भारतीय वंशाच्या लोकांनी परदेशात राहून अमूल्य योगदान दिले असेल आणि भारतीय समुदाय किंवा समाजाला लाभ देणारे कार्य केले असेल तर अशा व्यक्तीही या पुरस्कारासाठी पात्र ठरतात.
खालील चार श्रेणींमध्ये आरव्हीपी पुरस्कार दिले जाणार आहेत:-
अ - विज्ञानरत्न(व्ही आर ) पुरस्काराने विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या कोणत्याही क्षेत्रात केलेल्या आजीवन कामगिरी आणि योगदानाची दखल घेतली जाईल.
ब- विज्ञान श्री (व्हीएस) पुरस्काराने विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या कोणत्याही क्षेत्रात विशिष्ट योगदान देणा-यांना दिला जाईल.
क- विज्ञान युवा-शांती स्वरूप भटनागर (व्हीवाय-एसएसबी) पुरस्कार 45 वर्षे वयापर्यंतच्या तरुण शास्त्रज्ञांना मान्यता आणि प्रोत्साहन देण्यसाठी आहे. ज्यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या कोणत्याही क्षेत्रात अमूल्य योगदान दिले आहे.
ड- विज्ञान संघ (व्हीटी) पुरस्कार तीन किंवा अधिक शास्त्रज्ञ/संशोधक/नवीन संशोधकांचा समावेश असलेल्या संघाला देण्यात येईल. ज्या समूहाने विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या कोणत्याही क्षेत्रात कार्य करून अतुलनीय योगदान दिले आहे.
या पुरस्कारांसाठी परदेशात कार्यरत असलेल्या भारतीय वंशाचे शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ आणि नवोन्मेषक, भारतीय समुदायांना किंवा समाजाला मोठ्या प्रमाणावर लाभ देणारे अमूल्य योगदान देणारेही पात्र असतील.
राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जैविक विज्ञान, गणित आणि संगणक विज्ञान, पृथ्वी विज्ञान, वैद्यक शास्त्र , अभियांत्रिकी विज्ञान, कृषी विज्ञान, पर्यावरण विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेषी उपक्रम , अणुऊर्जा, अंतराळ विज्ञान आणि तंत्रज्ञान या 13 क्षेत्रांमध्ये दिला जाईल. पुरस्कारासाठी विचार करताना लिंग समानतेसह प्रत्येक डोमेन/फील्डचे प्रतिनिधित्व सुनिश्चित केले जाईल.
राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार पुरस्कारांसाठी प्राप्त सर्व नामांकने भारत सरकारच्या प्रधान वैज्ञानिक सल्लागार (पीएसए) यांच्या अध्यक्षतेखालील आणि विज्ञान विभागांचे सचिव, विज्ञान आणि अभियांत्रिकी अकादमींचे सदस्य आणि राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार समितीच्या सदस्यांसमोर(आरव्हीपीसी) ठेवण्यात येतील. तसेच विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या विविध क्षेत्रातील काही प्रतिष्ठित शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञांचाही या पुरस्कार निवड समितीमध्ये समावेश असेल.
या पुरस्कारासाठी नामांकने दरवर्षी 14 जानेवारी रोजी मागविली जातील. दरवर्षी 28 फेब्रुवारी (राष्ट्रीय विज्ञान दिन) पर्यंत नामांकन पाठवण्यासाठी मुभा असेल. या पुरस्कारांची घोषणा दरवर्षी 11 मे रोजी (राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन) केली जाईल. 23 ऑगस्ट रोजी(राष्ट्रीय अंतराळ दिन) सर्व श्रेणीतील पुरस्कारांच्या वितरणाचा समारंभ आयोजित केला जाईल. सर्व पुरस्कारांमध्ये विजेत्यांना सनद आणि पदक प्रदान करण्यात येईल.
R.Aghor/S.Bedekar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1959482)
Visitor Counter : 673
Read this release in:
Kannada
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu