संरक्षण मंत्रालय
चांद्रयान-3 अपवाद नसून , भारताच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि वैज्ञानिक क्षेत्रात सध्या भारताची जी वाटचाल सुरू आहे, त्यामध्ये झालेल्या विकासाचा हा परिपाक : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे लोकसभेत प्रतिपादन
“गेल्या नऊ वर्षांत 424 परदेशी उपग्रहांपैकी भारताने 389 प्रक्षेपित केले; अंतराळ क्षेत्राला जगामध्ये प्रमुख स्थान मिळविण्यासाठी भारताची वेगवान वाटचाल सुरू ”
Posted On:
21 SEP 2023 3:17PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 21 सप्टेंबर 2023
चांद्रयान- 3 ला मिळालेले यश काही अपवादाने मिळालेले नाही तर, सामाजिक, सांस्कृतिक आणि वैज्ञानिक क्षेत्रामध्ये भारताची सध्या जी वाटचाल सुरू आहे, आहे, त्यामध्ये झालेल्या विकासाचा परिणाम आहे, असे प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज - 21 सप्टेंबर 2023 लोकसभेत चांद्रयान-3 मोहिमेचे यश आणि अंतराळ क्षेत्रातील राष्ट्राच्या इतर कामगिरीविषयी झालेल्या चर्चेच्या वेळी केले.
चांद्रयान-3 च्या यशामुळे देशातील बळकट वैज्ञानिक व्यवस्थेचा परिचय होतो, असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यावेळी म्हणाले. “चांद्रयान-3 मुळे स्पष्ट कल्पना येते की, आमच्या शाळा आणि महाविद्यालयांमध्ये विज्ञान शिक्षणाचा दर्जा सुधारत आहे. उद्योगांकडून दर्जेदार उत्पादनांचे उत्पादन आणि पुरवठा केला जात आहे. यापूर्वीच्या सरकारांनीही असे प्रयत्न केले होते, असे राजनाथ सिंह यावेळी म्हणाले.
चांद्रयान-3 चे यशस्वी लँडिंग, ही संपूर्ण देशासाठी मोठी कामगिरी असल्याचे राजनाथ सिंह यांनी म्हटले. अनेक विकसित देश आहेत,जे संसाधनांनी समृद्ध असून चंद्रावर पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहेत, तर भारत मर्यादित संसाधनांसह चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा पहिला देश ठरला आहे. त्यांनी या यशाचे श्रेय राष्ट्राच्या विकासासाठी इस्रोच्या वैज्ञानिकांच्या बौद्धिक पराक्रमाला आणि समर्पणाला दिले.
राजनाथ सिंह यांनी चांद्रयान-3 मोहिमेच्या यशाचे श्रेय भारताच्या नारी शक्तीलाही दिले आणि राष्ट्राला एक नवीन ओळख देण्यासाठी त्यांच्या समर्पणाची आणि त्यागाची प्रशंसा केली. 'नारी शक्ती वंदन विधेयक’ हे संपूर्ण महिला वैज्ञानिक समुदायासह इस्रोच्या महिला वैज्ञानिकांना कृतज्ञ राष्ट्राने दिलेली भेट असल्याचे त्यांनी म्हटले.
अंतराळ क्षेत्रामध्ये मिळवलेल्या यशाचा सामान्य लोकांवर काहीही परिणाम होत नाही, असे म्हणणे सर्वस्वी अयोग्य आहे, असे सांगून या म्हणण्याला संरक्षण मंत्र्यांनी विरोध केला. “आपल्याकडे अंतराळ मोहिमांचा बहुआयामी वापर केला जातो. त्यामुळे त्याचा लोकांवरही खूप मोठा प्रभाव पडतो. उदाहरणार्थ, ढगफुटी इत्यादी घटनांचे चांगले पूर्वअंदाज आपल्या शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरतील. किनारपट्टीवरील भागात राहणाऱ्या आणि मच्छिमारांसाठी चक्रीवादळांविषयी वर्तवला जाणारा अंदाज लाभदायक ठरेल. महत्त्वाचे म्हणजे, चंद्र किंवा सूर्य याविषयी राबविण्यात येणार्या अंतराळ मोहिमांमुळे दुर्गम गावात राहणाऱ्या मुलांमध्ये विज्ञान, संशोधन याविषयांची गोडी लागण्यास मदत होते. त्यामुळे युवार्गातील मुलांच्या मनाला भविष्यात काहीतरी वेगळे करण्याची प्रेरणा मिळते,” असे मंत्री राजनाथ सिंह म्हणाले.
R.Aghor/S.Bedekar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1959357)
Visitor Counter : 104