पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांनी मध्य प्रदेशात बिना येथे केली 50,700 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विकास प्रकल्पांची पायाभरणी


बिना येथील रिफायनरीमध्ये पेट्रोकेमिकल संकुलाची केली पायाभरणी

नर्मदापुरम येथे केली ‘पॉवर अँड रिन्युएबल एनर्जी झोन’ची आणि रतलाम येथे मेगा इंडस्ट्रियल पार्कची पायाभरणी

इंदूर येथे दोन आयटी पार्क आणि संपूर्ण राज्यात सहा नव्या इंडस्ट्रियल पार्कची केली पायाभरणी

“आजचे प्रकल्प मध्य प्रदेशाविषयी केलेल्या संकल्पपूर्तीचा आमचा ध्यास व्यक्त करत आहेत”

“कोणतेही राज्य किंवा कोणत्याही देशाच्या विकासाकरता, शासन पारदर्शक असणे आणि भ्रष्टाचाराचे उच्चाटन होणे गरजेचे असते”

“भारताने गुलामगिरीची मानसिकता दूर सारली आहे आणि आता स्वतंत्र असल्याच्या आत्मविश्वासाने आगेकूच करत आहे”

“भारताला अखंड राखणारा सनातन ज्यांना तोडायचा आहे, अशांपासून लोकांनी सावध राहिले पाहिजे”

“भारताचे जी20 चे उल्लेखनीय यश, 140 कोटी भारतीयांचे यश आहे”

“भारत जगाला एकत्र आणण्याचे आपले कसब दाखवत आहे आणि विश्वमित्र म्हणून उदयाला येत आहे”

“उपेक्षितांना प्राधान्य देणे हा सरकारचा मूलभूत मंत्र आहे”

“मोदींच्या हमीचा गतइतिहास तुमच्या समोर आहे”

“5 ऑक्टोबर 2023 रोजी राणी दुर्गावती यांची 500 वी जयंती अतिशय भव्यतेने आणि उत्साहात साजरी केली जाईल”

“ ‘सबका साथ सबका विकास’ चे मॉडेल आज संपूर्ण जगाला मार्ग दाखवत आहे”

Posted On: 14 SEP 2023 4:15PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 14 सप्‍टेंबर 2023

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मध्य प्रदेशात बिना येथे 50,700 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विकास प्रकल्पांची पायाभरणी केली. या प्रकल्पांमध्ये भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या बिना रिफायनरीमधील 49,000 कोटी रुपयांच्या खर्चाने तयार होणारे पेट्रोकेमिकल संकुल, नर्मदापुरम येथे पॉवर अँड रिन्युएबल एनर्जी झोन’, इंदूरमध्ये दोन आयटी पार्क आणि रतलाम येथे मेगा इंडस्ट्रियल पार्क आणि मध्य प्रदेशात सहा नवी औद्योगिक क्षेत्रे यांचा समावेश होता.

बुंदेलखंड ही भूमी योद्ध्यांची होती, असे यावेळी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधानांनी सांगितले. मध्य प्रदेशात सागरला एका महिन्यामध्ये पुन्हा भेट देत असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले आणि ही संधी दिल्याबद्दल मध्य प्रदेश सरकारचे आभार मानले. संत रविदासजी यांच्या स्मारकाच्या पायाभरणी समारंभात सहभागी झाल्याची आठवण त्यांनी करून दिली. पंतप्रधान म्हणाले की आजचे प्रकल्प या भागाच्या विकासाला एक नवी ऊर्जा देतील. केंद्र सरकार या प्रकल्पांवर 50 हजार कोटी रुपये खर्च करत हे जी रक्कम अनेक राज्यांच्या अर्थसंकल्पीय तरतुदीपेक्षा जास्त असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. यामधून मध्य प्रदेशसाठी केलेल्या संकल्पांच्या पूर्ततेचा आम्ही घेतलेला ध्यास प्रदर्शित होत आहे, असे त्यांनी नमूद केले.

स्वातंत्र्याच्या अमृत काळात देशातील प्रत्येक नागरिकांने भारताला एका विकसित देशात रुपांतरित करण्याचा संकल्प केला आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले. आत्मनिर्भर भारताचे महत्त्व अधोरेखित करत पंतप्रधानांनी आयात कमी करण्याच्या आवश्यकतेवर भर दिला आणि पेट्रोल आणि डिझेल त्याबरोबरच  पेट्रोकेमिकल उत्पादनांसाठी भारताला परकीय देशांवर अवलंबून राहावे लागते याकडे निर्देश केला. बिना रिफायनरीमधील पेट्रोकेमिकल संकुलाचा संदर्भ देत मोदी म्हणाले की पेट्रोकेमिकल उद्योगात आत्मनिर्भरतेच्या दिशेने टाकलेले हे एक पाऊल आहे. पाईप, नळ, फर्निचर, रंग, मोटार चे भाग, वैद्यकीय उपकरणे, पॅकेजिंग आणि कृषी उपकरणे यासारख्या प्लास्टिक उत्पादनांची उदाहरणे पंतप्रधानांनी दिली आणि पेट्रोकेमिकल्सची त्याच्या उत्पादनात महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचे सांगितले. नवीन उद्योगांना चालना मिळण्याबरोबरच लहान शेतकरी आणि उद्योजकांना फायदा होईल आणि तरुणांसाठी हजारो संधी निर्माण होतील हे नमूद करताना पंतप्रधान म्हणाले की, “मी तुम्हाला हमी देतो की बीना रिफायनरी येथील पेट्रोकेमिकल संकुल संपूर्ण क्षेत्राच्या विकासाला चालना देईल आणि विकासाला नवी उंची देईल”. उत्पादन क्षेत्राच्या महत्त्वाविषयी बोलताना पंतप्रधानांनी आज 10 नवीन औद्योगिक प्रकल्पांवर काम सुरू झाल्याची माहिती दिली. नर्मदापुरम, इंदूर आणि रतलाममधील प्रकल्पांमुळे मध्य प्रदेशातील औद्योगिक प्राबल्य वाढेल ज्याचा सर्वांना फायदा होईल असे त्यांनी सांगितले.

कोणत्याही राज्याच्या किंवा देशाच्या विकासासाठी कारभारातील पारदर्शकता आणि भ्रष्टाचाराचा नायनाट करण्याच्या महत्त्वावर प्रकाश टाकून पंतप्रधानांनी मध्य प्रदेश हे देशातील सर्वात कमजोर आणि दुर्बल राज्यांपैकी एक मानले जात असे त्या काळाची आठवण करून दिली. “मध्यप्रदेशात अनेक दशके राज्य करणाऱ्यांकडे गुन्हेगारी आणि भ्रष्टाचाराशिवाय देण्यासारखे दुसरे काहीही नव्हते”, असा टोला मोदींनी लगावला. राज्यातील गुन्हेगार कसे मोकाट होते आणि कायदा आणि सुव्यवस्थेवर जनतेचा विश्वास नसल्याची आठवण करून देत मोदी म्हणाले की, अशा परिस्थितीमुळे राज्यातून उद्योग बाहेर गेले. विद्यमान सरकारने ते पहिल्यांदा निवडून आल्यापासून मध्य प्रदेशातील परिस्थिती बदलण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केल्याचे त्यांनी नमूद केले. या कामगिरीवर प्रकाश टाकताना पंतप्रधानांनी कायदा व सुव्यवस्था पूर्ववत करणे आणि नागरिकांच्या मनातील भीती दूर करणे, रस्ते निर्मिती आणि वीजपुरवठा आदी उदाहरणे दिली. ते म्हणाले की, सुधारित कनेक्टिव्हिटीमुळे राज्यात सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून मोठे उद्योग कारखाने उभारण्यास सज्ज आहेत. येत्या काही वर्षांत मध्य प्रदेश औद्योगिक विकासाची नवी उंची गाठेल, असा विश्वास मोदींनी व्यक्त केला.

गुलामगिरीच्या मानसिकतेतून मुक्त होण्याच्या आणि ‘सबका प्रयास’ द्वारे वाटचाल करण्याच्या त्यांच्या आवाहनाचा संदर्भ देत आजच्या नव्या भारताचे झपाट्याने परिवर्तन होत आहे, असे पंतप्रधान म्हणाले. "भारताने गुलामगिरीची मानसिकता मागे टाकली आहे आणि आता स्वतंत्र होण्याच्या आत्मविश्‍वासाने मार्गक्रमण सुरू केले आहे", असे ते म्हणाले. ते म्हणाले की नुकत्याच झालेल्या जी 20 मध्ये हे प्रतिबिंबित झाले जे प्रत्येकासाठी एक चळवळ बनले आणि सर्वांना देशाच्या कामगिरीचा अभिमान वाटला. जी 20 च्या अभूतपूर्व यशाचे श्रेय पंतप्रधानांनी जनतेला दिले. “हे 140 कोटी भारतीयांचे यश आहे,” ते म्हणाले. ते म्हणाले की विविध शहरांतील कार्यक्रमांद्वारे भारताची विविधता आणि क्षमता दिसून आली आणि अभ्यागत खूप प्रभावित झाले. त्यांनी खजुराहो, इंदूर आणि भोपाळमधील जी 20 कार्यक्रमांच्या फलनिष्पतीचा उल्लेख केला आणि सांगितले की यामुळे जगाच्या नजरेत मध्य प्रदेशची प्रतिमा उंचावली आहे.

पंतप्रधान म्हणाले की, एकीकडे नवा भारत जगाला एकत्र आणण्यात आणि विश्वामित्र म्हणून उदयास येण्यात आपले कौशल्य दाखवत आहे, तर दुसरीकडे अशा काही संघटना आहेत ज्या राष्ट्र आणि समाजात फूट पाडत आहेत. . नुकत्याच स्थापन झालेल्या युतीचा संदर्भ देत पंतप्रधान म्हणाले की, त्यांची धोरणे भारतीय मूल्यांवर आघात करणे आणि सर्वांना एकत्र आणणारी हजारो वर्षे जुनी विचारधारा, तत्त्वे आणि परंपरा नष्ट करण्यापुरती मर्यादित आहेत.

नव्याने स्थापन झालेल्या आघाडीला  सनातन संस्कृतीला  संपवायचे आहे, याकडे लक्ष वेधत, आपल्या सामाजिक कार्याने देशाच्या श्रद्धेचे रक्षण करणाऱ्या  देवी अहिल्याबाई होळकर , इंग्रजांना आव्हान देणाऱ्या  झाशीची राणी लक्ष्मीबाई, प्रभू श्रीरामाकडून प्रेरित होऊन अस्पृश्यता निवारण चळवळ हाती घेणारे महात्मा गांधी,समाजातील विविध कुप्रथांविरोधात लोकांना जागरुक  करणारे स्वामी विवेकानंद आणि   भारतमातेच्या रक्षणाचा विडा उचलणाऱ्या  आणि गणेशपूजेला स्वातंत्र्य चळवळीशी जोडणाऱ्या लोकमान्य टिळक यांचा पंतप्रधानांनी   उल्लेख केला.

संत रविदास, माता शबरी आणि महर्षी वाल्मिकी यांचे प्रतिबिंब असणाऱ्या सनातन संस्कृतीच्या  सामर्थ्याने   स्वातंत्र्यलढ्यातील योद्ध्यांना प्रेरणा दिली , असे पंतप्रधान म्हणाले. भारताला एकसंध ठेवणाऱ्या सनातन संस्कृतीला तोडू पाहणाऱ्यांविरोधात त्यांनी इशारा दिला आणि अशा प्रवृत्तींपासून जनतेनं सावध राहण्याचे आवाहन केले.

सरकार देशाप्रति एकनिष्ठता आणि लोकसेवेसाठी समर्पित आहे, यावर पंतप्रधानांनी  भर दिला.  वंचितांना प्राधान्य देणे हा या  संवेदनशील सरकारचा मूलभूत मंत्र आहे, असे ते म्हणाले. महामारीच्या काळात सहाय्यासाठी उचललेली  लोकाभिमुख पावले , 80 कोटी लोकांना मोफत रेशन याबद्दलही पंतप्रधानांनी यावेळी सांगितले. “मध्य प्रदेशला  विकासाच्या नव्या  उंचीवर पोहोचवण्यासाठी , मध्य प्रदेशातील प्रत्येक कुटुंबाचे जीवन सुकर  करण्यासाठी  आणि प्रत्येक घरात समृद्धी आणण्यासाठी  आमचे निरंतर  प्रयत्न सुरु आहेत, असे पंतप्रधान म्हणाले.  मोदींनी दिलेल्या वचनांचा ट्रॅक रेकॉर्ड तुमच्यासमोर आहे.” असे सांगत राज्यातील गरिबांसाठी 40 लाख पक्की घरे आणि शौचालये, मोफत वैद्यकीय उपचार, बँक खाती, धूरविरहित स्वयंपाकघर या वचनांची पूर्तता केल्याची माहिती त्यांनी दिली. रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर गॅस सिलिंडरच्या दरात कपात केल्याचा उल्लेखही त्यांनी केला. "यामुळे  उज्ज्वलाच्या लाभार्थी भगिनींना आता 400 रुपयांनी स्वस्त सिलिंडर मिळत आहे", असे ते म्हणाले.त्यामुळे काल केंद्र सरकारने आणखी एक मोठा निर्णय घेतला. आता देशातील आणखी 75 लाख भगिनींना मोफत गॅस जोडणी दिली  जाणार आहेत.कोणतीही भगिनी  गॅस  जोडणीपासून  वंचित राहू नये, हा आमचा उद्देश आहे,” असे पंतप्रधानांनी सांगितले.

प्रत्येक वचन  पूर्ण करण्यासाठी सरकार पूर्ण प्रामाणिकपणे काम करत असल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले.  प्रत्येक लाभार्थ्याला पूर्ण लाभ मिळवून देणे सुनिश्चित करण्यासाठी मध्यस्थांना दूर केल्याचा  उल्लेख त्यांनी केला आणि   लाभार्थी असलेल्या प्रत्येक शेतकर्‍याला त्याच्या थेट   बँक खात्यात 28,000 रुपये मिळाले आहेत, अशा पंतप्रधान किसान सन्मान निधीचे उदाहरण दिले.  या योजनेवर सरकारने 2,60,000 कोटी रुपयांहून अधिक खर्च केल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली.

गेल्या 9 वर्षात केंद्र सरकारने शेतकर्‍यांचा खर्च कमी करत स्वस्त दरात खते देण्यासाठी प्रयत्न केले असून यासाठी  9 वर्षात 10 लाख कोटी रुपयांहून अधिक खर्च केल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली.अमेरिकी शेतकर्‍यांसाठी 3000 रुपयांपर्यंत किंमत असलेली युरियाची पिशवी भारतीय शेतकर्‍यांना 300 रुपयांपेक्षा कमी किंमतीत  उपलब्ध करून दिली जाते, असे त्यांनी नमूद केले. त्यांनी भूतकाळातील हजारो कोटी रुपयांच्या युरिया घोटाळ्यांकडे लक्ष वेधले आणि तोच युरिया आता सर्वत्र सहज उपलब्ध होत आहे, असा टोला लगावला.

"सिंचनाचे महत्त्व बुंदेलखंडपेक्षा चांगले कोणाला  माहित आहे", असे सांगत पंतप्रधानांनी बुंदेलखंडमधील सिंचन प्रकल्पांवर डबल इंजिन सरकारने केलेल्या कामावर प्रकाश टाकला. पंतप्रधानांनी केन-बेतवा जोडणी  कालव्याचा उल्लेख केला आणि बुंदेलखंडसह या प्रदेशातील अनेक जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होईल, असे ते म्हणाले.  अवघ्या 4 वर्षात देशभरातील अंदाजे 10 कोटी नवीन कुटुंबांना नळाने  पाणी पुरवठा करण्यात आला आहे, तर मध्य प्रदेशात 65 लाख कुटुंबांना जलवाहिनीद्वारे  पाणी मिळाले आहे, अशी माहिती देत पंतप्रधानांनी प्रत्येक घरात जलवाहिनीद्वारे  पाणी पोहोचवण्याच्या सरकारच्या प्रयत्नांवर प्रकाश टाकला. “बुंदेलखंडमध्ये अटल भूजल योजनेंतर्गत जलस्रोत निर्माण करण्याचे कामही मोठ्या प्रमाणावर केले जात आहे”, असे पंतप्रधान म्हणाले.

या प्रदेशाच्या विकासासाठी सरकार पूर्णपणे कटिबद्ध आहे. आणि राणी दुर्गावती यांच्या 500 व्या जयंतीचा शुभ सोहळा 5 ऑक्टोबर 2023 रोजी मोठ्या थाटामाटात साजरा केला जाईल असे पंतप्रधानांनी सांगितले.

आमच्या सरकारच्या प्रयत्नांचा सर्वाधिक फायदा गरीब, दलित, मागासवर्गीय आणि आदिवासींना झाला आहे.  "वंचितांना प्राधान्य देण्याचे, 'सबका साथ सबका विकास' हे प्रारुप आज जगाला मार्ग दाखवत आहे" असे मोदी म्हणाले. देश जगातील अव्वल-3 अर्थव्यवस्थांपैकी एक बनण्याच्या उद्दिष्टासाठी काम करत आहे. “भारताला अव्वल-3 बनवण्यात मध्य प्रदेशची मोठी भूमिका असेल”, यामुळे शेतकरी, उद्योग आणि तरुणांसाठी नवीन संधी निर्माण होतील असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. आज पायाभरणी झालेले प्रकल्प राज्याच्या जलद विकासाला अधिक गती देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. “पुढील 5 वर्षे मध्य प्रदेशच्या विकासाला नवीन उंची देतील”, असे सांगत मोदी यांनी भाषणाचा समारोप केला.

यावेळी मध्य प्रदेशचे राज्यपाल मंगुभाई पटेल, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी आदी मान्यवर उपस्थित होते.

 

पार्श्वभूमी

राज्यातील औद्योगिक विकासाला मोठी चालना देणार्‍या उपक्रमां अतंर्गत भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या (BPCL) बीना रिफायनरी येथे पेट्रोकेमिकल संकुलाची पायाभरणी पंतप्रधानांनी केली. सुमारे 49,000 कोटी रुपये खर्चून विकसित होणारी ही अत्याधुनिक रिफायनरी सुमारे 1200 KTPA (किलो-टन प्रतिवर्ष) इथिलीन आणि प्रोपिलीनचे उत्पादन करेल. वस्त्रोद्योग, पॅकेजिंग, औषध उद्योग यासारख्या विविध क्षेत्रांसाठी ते महत्त्वाचे घटक आहेत. यामुळे देशाचे आयात अवलंबित्व कमी होईल आणि पंतप्रधानांच्या 'आत्मनिर्भर भारत' या संकल्पनेच्या पूर्ततेच्या दिशेने एक पाऊल ठरेल. या अतिशय मोठ्या प्रकल्पामुळे रोजगाराच्या संधी निर्माण होतील आणि पेट्रोलियम क्षेत्रातील आकाराने छोट्या उद्योगांच्या विकासाला चालना मिळेल.

नर्मदापुरम जिल्ह्यात ‘उर्जा आणि नवीकरणीय उर्जा निर्मिती क्षेत्र’ चे दहा प्रकल्प;  इंदूरमध्ये दोन आयटी पार्क;  रतलाममधील मेगा इंडस्ट्रियल पार्क;  आणि मध्य प्रदेशात सहा नवीन औद्योगिक क्षेत्रे यांची पायाभरणीही पंतप्रधानांनी यावेळी केली.

नर्मदापुरम जिल्ह्यातील ‘उर्जा आणि नवीकरणीय उर्जा निर्मिती क्षेत्र’ 460 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करून विकसित केला जाईल. या प्रदेशात आर्थिक वाढ आणि रोजगार निर्मितीच्या दिशेने हे एक दमदार पाऊल ठरेल. इंदूरमधील ‘आयटी पार्क 3 आणि 4’, सुमारे 550 कोटी रुपये खर्चून बांधले जाईल, माहिती तंत्रज्ञान आणि ITES क्षेत्राला यामुळे चालना मिळेल तसेच तरुणांसाठी रोजगाराच्या नवीन संधी खुल्या होतील.

रतलाममधील मेगा (औद्योगिक) इंडस्ट्रियल पार्क, 460 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करून बांधले जाईल आणि वस्त्रोद्योग, वाहन उद्योग, औषध उद्योग यासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांसाठी हे एक प्रमुख केंद्र बनेल. हे औद्योगिक पार्क, दिल्ली मुंबई द्रुतगती मार्गाशी चांगले जोडले जाईल आणि संपूर्ण क्षेत्राच्या आर्थिक विकासाला मोठी चालना देईल. तरुणांसाठी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे रोजगाराच्या संधीही निर्माण करेल.

राज्यात संतुलित प्रादेशिक विकास आणि समान रोजगार संधींना चालना देण्याच्या उद्देशाने, शाजापूर, गुना, मौगंज, आगर माळवा, नर्मदापुरम आणि मक्सी येथे सुमारे 310 कोटी रुपये खर्चून सहा नवीन औद्योगिक क्षेत्रे विकसित केली जातील.

 

 

 

 

 

 

 

* * *

JPS/SRT/NC/ST/Shailesh P/Vasanti/Sonal C/Vinayak/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1957346) Visitor Counter : 132