विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
भारताच्या अध्यक्षतेखालील काल सांगता झालेल्या जी 20 परिषदेमधून भारताची तांत्रिक क्षमता आणि आर्थिक सामर्थ्याचे दर्शन घडले :केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंग
'एक सप्ताह एक प्रयोगशाळा' अभियानाच्या यशस्वीतेनंतर, वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद- सीएसआरआरच्या सर्व उपक्रमाची सांगड घालण्याच्या उद्देशाने ' एक महिना एक संकल्पना' अभियान सुरु करण्याचा डॉ जितेंद्र सिंग यांचा प्रस्ताव
Posted On:
11 SEP 2023 7:36PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 सप्टेंबर 2023
भारताच्या अध्यक्षतेखालील काल सांगता झालेल्या जी 20 परिषदेमधून भारताची तांत्रिक क्षमता आणि आर्थिक सामर्थ्याचे दर्शन घडले असे केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ.जितेंद्र सिंग यांनी म्हटले आहे.
"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली या सरकारने पारंपरिक ज्ञान आणि आधुनिक स्पर्धात्मक तंत्रज्ञानाचा उत्तम मिलाप केला आहे. आमच्याकडे असलेली पारंपरिक ज्ञानवाचनालये आता पारंपरिक ज्ञान डिजिटल लायब्ररी (टीकेडीएल) म्हणून ओळखली जातात. अगदी भारत मंडपम पासून ते सरकारने उभारलेल्या अलीकडच्या काळातील स्मारकांच्या निर्मितीमधून अद्ययावत वैज्ञानिक दृष्टिकोन, तंत्रज्ञान आणि आपण पिढ्यानपिढ्या जोपासलेला पारंपरिक वारसा दर्शवणारे स्थापत्य यांचा अद्भुत संगम प्रत्ययाला येतो,असे डॉ. सिंग म्हणाले. नवी दिल्लीच्या सीएसआयआर - राष्ट्रीय विज्ञान दूरसंचार आणि धोरण संशोधन संस्था (CSIR-NIScPR), ‘एक सप्ताह एक प्रयोगशाळा’ (OWOL) कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते आज बोलत होते.
जी 20 परिषदेतील नवी दिल्ली घोषणापत्राद्वारे भारताच्या नेतृत्वाखाली "पर्यावरणासाठी अनुकूल जीवनशैली" (लाईफ) या उपक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी आणि संयुक्त राष्ट्रांची शाश्वत विकास उद्दिष्टे (SDG) साध्य करण्याकरता कृत्रिम बुद्धिमत्तेला प्रोत्साहन देण्यासाठी वचनबद्धता व्यक्त केली आहे. 'हरित विकास करार' स्वीकारून, जी -20 ने शाश्वत आणि हरित वाढीसाठी आपल्या वचनबद्धतेची देखील पुष्टी केली आहे.
जी 20 परिषदेच्या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सिंगापूर, बांगलादेश, इटली, अमेरिका, ब्राझील, अर्जेंटिना, मॉरिशस आणि संयुक्त अरब अमिराती या राष्ट्रांनी जैव इंधन आघाडी उभारून एक महत्वपूर्ण टप्पा गाठला आहे. जैवइंधन निर्मितीच्या प्रगतीसाठी आणि व्यापक सहमतीसाठी जागतिक सहकार्य वाढवण्याच्या दिशेने जैव इंधन आघाडी एक व्यासपीठ म्हणून कार्य करेल.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने हे साध्य करण्यात अग्रणी भूमिका बजावल्याबद्दल मला आनंद वाटत आहे, असेही ते म्हणाले.
एक सप्ताह एक प्रयोगशाळा” अभियानाच्या यशस्वीतेनंतर, वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद- सीएसआरआर च्या सर्व उपक्रमाची सांगड घालण्याच्या उद्देशाने एक महिना एक संकल्पना अभियान सुरु करण्याचा प्रस्ताव डॉ जितेंद्र सिंग यांनी मांडला.
आदित्य मिशन देशाच्या ‘संपूर्ण विज्ञान’ दृष्टिकोनाचे प्रतीक असून या मोहिमेत सर्व विभागांसह भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रो, विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग, सीएसआयआरच्या राष्ट्रीय एरोस्पेस प्रयोगशाळा, टाटा इन्स्टिट्यूट इत्यादींनी संसाधनांचे एकत्रीकरण करण्यात मोलाचे योगदान दिले आहे,असे त्यांनी सांगितले.
राष्ट्रीय विज्ञान दूरसंचार आणि धोरण संशोधन संस्था NIScPR ही एक पथदर्शक म्हणून कार्य करू शकते आणि वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद- सीएसआरआर प्रयोगशाळा प्रत्येकी दहा यशोगाथा घडवण्यात सक्षम आहेत, असे ते म्हणाले.
* * *
G.Chippalkatti/B.Sontakke/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1956451)
Visitor Counter : 165